Home » आता पुरे झाले संघात ‘राहणे’

आता पुरे झाले संघात ‘राहणे’

by Correspondent
0 comment
Ajinkya Rahane | K Facts
Share

शेक्सपियरने म्हटले आहे की ‘नावात काय आहे?’ त्याला कदाचित असा संदेश द्यावयाचा असेल की नावाला महत्व नसून कर्तुत्वाला महत्व आहे. शेक्सपियरच्या या सुप्रसिद्ध वचनाची आठवण व्हायचे कारण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा उपकप्तान अजिंक्य रहाणे. केवळ नावात ‘अजिंक्य’ आहे म्हणून हा संघात राहतो की काय असा प्रश्न भारतीय क्रिकेट चाहत्यांना सध्या पडला असेल.

सध्या रहाणे (Ajinkya Rahane) ‘बॅड पॅच’ मधून जात आहे ही रेकॉर्ड गेले कित्येक दिवस इतकी वाजवली जात आहे की त्यातील नावीन्य आता संपले आहे. आता ही रेकॉर्ड ‘ब्रेक’ करण्याची वेळ आली आहे असे वाटते. केवळ रहाणेच्या धावा होत नाहीत म्हणून मी असे म्हणत नाही तर तो ज्या पद्धतीने वारंवार बाद होत आहे ते आता बघवत नाही. प्रत्येक वेळेला रहाणे फलंदाजीला येतो तेव्हा त्याची परदेशी भूमीवर कशी उत्तम कामगिरी होते आणि आता भारतीय संघाला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे याची समालोचक चर्चा सुरु करतात.

ही चर्चा चालू असतानाच खाली मान घालून पॅव्हेलियनमध्ये परतणारा ‘अजिंक्य’ आपण बघतो आणि समालोचक त्याच्या बाद होण्याच्या ‘पॅटर्न’वर गुऱ्हाळ चालू करतात. हे आता नेहमीचेच झाले आहे. अजिंक्य केवळ हजेरी लावण्यापुरतंच फलंदाजीला येतो की काय असे दर्शकांना वाटू लागले आहे. २०२० च्या न्यूझीलंड दौऱ्यापासून अजिंक्यला सूर गवसलेला नाही. त्या दौऱ्यात दुसऱ्या कसोटीत अजिंक्यला खेळपट्टीवर उभे राहणे मुश्किल झाले होते. बोल्ट, सौदी, जेमिसन यांनी उसळते चेंडू टाकून त्याला हैराण करुन सोडले होते. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील भाव दर्शवत होते की एकदा आऊट झालो तर बरे होईल.

२०२०-२१ च्या ऑस्ट्रेलियन मालिकेमध्ये त्याला सूर गवसल्यासारखे वाटले. दुसऱ्या कसोटीत शतक ठोकण्याबरोबरच त्याने सामनाही जिंकला. पण त्याच डावात सत्तरीत असताना त्याने ज्या ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूचा पाठलाग केला तसा प्रयत्न ११व्या क्रमांकावरील फलंदाज सुद्धा करणार नाही. सुदैवानं स्टिव्ह स्मिथने त्याचा झेल सोडला म्हणून बरे. पण या डावानंतर पुनः मागचे पाढे पंचावन्न सुरु झाले. ऑफ स्पिनर नॅथन लियन त्याचा कर्दनकाळ ठरू लागला.

इंग्लंडविरुद्ध भारतातील मालिकेत सुद्धा एक अर्धशतक वगळता बाकी पाटी कोरीच राहिली. एकदा तर तो ऑफ स्पिनर डोम बेस च्या फुलटॉसवर बाद झाला तर एकदा मोईन अलीच्या ऑफ स्टंप बाहेरील चेंडूला स्वीप मारण्याचा त्याचा प्रयत्न अंगलट आला. जून मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध तो किवीजच्या सापळ्यात अलगद अडकला. आदला चेंडू कसाबसा पूल केल्यावर पुढच्या तशाच चेंडूवर त्याने square लेगला हातात झेल कोलून दिला.

इंग्लंडमधील मालिकेत तर लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटीतील रडतखडत अर्धशतक सोडता बाकी सगळा उजेडच होता. बैरस्टोव्हने ३२ धावांवर सोपा झेल सोडला म्हणून हे अर्धशतक तरी झाले. पण याच डावात मोइनच्या ऑफ स्टंप बाहेरील एका निरुपद्रवी चेंडूशी नाहक छेडछाड करून तो जसा बाद झाला ते बघणे क्लेशदायक होते. इतर डावात तो अँडरसन, रॉबिन्सन या तेज गोलंदाजांसाठी पायचितचा आदर्श उमेदवार होता.

आताच्या न्यूझीलंड विरुद्ध कानपुर कसोटीत सुद्धा पहिल्या डावात त्याने कट मारण्याच्या प्रयत्नात चेंडू यष्ट्यांवर ओढवून घेतला तर दुसऱ्या डावात स्पिनर एजाज पटेलच्या सरळ चेंडूवर ऍक्रोस खेळताना पायचीत झाला. व्ही व्ही एस लक्ष्मण ने लगेच त्याच्या तंत्राची अचूक चिरफाड केली. आतापर्यंत द्रविड, तेंडुलकर, गावस्कर, सेहवाग यासारख्या महान खेळाडूंचा सुद्धा फॉर्म काही काळ गेला होता आणि हे नैसर्गिक आहे. पण या खेळाडूंनी लवकरच गेलेला फॉर्म सराव करून परत मिळवला. द्रविड तर त्यासाठी रणजी सामने खेळला.

अजिंक्यला झुकते माप देताना इतर होतकरू खेळाडूंवर अन्याय होतो. २०१६ मध्ये अजिंक्य जखमी होता म्हणून त्याच्या जागी करूण नायरला संधी मिळाली आणि त्याने संधीचे सोने करताना इंग्लंडविरुद्ध नाबाद त्रिशतक झळकावले. पुढच्याच मुंबई कसोटीत अजिंक्यला जागा करून देण्यासाठी करुण नायरला संघातून वगळण्यात आले.

त्यानंतर करुण जेमतेम हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेच सामने खेळला आणि आता तर त्याच्या कारकिर्दीचा ‘करुण’अंत होत असलेला आपण बघतोय. पदार्पणाच्या कसोटीतील दैदिप्यमान कामगिरीनंतर श्रेयस अय्यरचा करुण नायर होऊ नये हीच अपेक्षा. मुंबई कसोटीतून बाजूला होऊन अजिंक्यने विराट कोहलीसाठी जागा खाली करावी हे उत्तम. अजिंक्य जरी उपकप्तान असला तरी २०१८ च्या इंग्लंडमधील मालिकेत सुद्धा त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले होते.

अजिंक्यच्या हितासाठी सुचवावेसे वाटते की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेऊन त्याने रणजी सामने खेळावेत म्हणजे त्याला तंत्रात सुधारणा करून गेलेला फॉर्म परत मिळवता येईल. एक वर्ष आईपिएल पासून त्याने दूर राहावे. त्याच्याकडे अजून भरपूर क्रिकेट शिल्लक आहे त्यामुळे एक पाऊल मागे घेऊन दोन पावले त्याला पुढे जाता येईल आणि कसोटी संघात अजून काही काळ राहताही येईल. नाही तर क्रिकेट रसिक म्हणतील ‘रहाणे… संघात राहणे आता पुरे’.

– रघुनंदन भागवत
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.