सध्या दाक्षिणात्य चित्रपटांसाठी सोनेरी काळ चालू आहे. प्रत्येक साऊथचा सिनेमा सुपरहिट होत असून, बक्कळ कमाई देखील करत आहे. याचा अर्थ असा नाही की, बॉलिवूड सिनेमा मागे पडत आहे. बॉलिवूडचे सिनेमे देखील विविध रेकॉर्ड करतात. मात्र सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना मिळणाऱ्या यशामुळे कन्नड आणि साऊथ स्टार असणाऱ्या किच्चा सुदीपने राष्ट्रभाषेवर एक वक्तव्य केले आणि आता त्यावरून वाद सुरू झाला आहे. ‘केजीएफ चॅप्टर २’ या सिनेमाला मिळालेल्या तुफान यशानंतर किच्चा सुदीपने म्हटले होते की, ‘हिंदी आता राष्ट्रभाषा नाही.’ त्याच्या या विधानावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. यावर आता अजय देवगणने (Ajay Devgn) त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
अजय देवगणने सोशल मीडियावर किच्चा सुदीपला एक प्रश्न विचारला आहे. किच्चा सुदीपने केलेल्या विधानावर अजयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून किच्चा सुदीपला टॅग करत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये अजयने (Ajay Devgn) किच्चा सुदीपला विचारले की, “हिंदी राष्ट्रभाषा नाही मग साऊथ सिनेमांना हिंदीमध्ये डब का केले जाते?”
अजयने (Ajay Devgn) त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत लिहिले, “किच्चा सुदीप माझ्या भावा तुझ्या नुसार जर हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही तर तू तुझ्या मातृभाषेत तयार होणाऱ्या चित्रपटांना हिंदीमध्ये डब करून का प्रदर्शित करतो? हिंदी आपली राष्ट्रभाषा होती आहे आणि नेहमीच असेल. जन गण मन.” अजयने त्याचे हे ट्विट किच्चा सुदीपला उत्तर देण्यासाठी हिंदीमध्ये लिहून पोस्ट केले आहे.
नक्की प्रकरण काय आहे?
‘आर: द डेडलिएस्ट गँगस्टर एव्हर’ चित्रपटाच्या लाँच इव्हेंटला कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपने हजेरी लावली होती. यावेळी त्याने सांगितले की, “बॉलिवूड आज पॅन इंडिया सिनेमे बनवत आहे. हिंदी आता राष्ट्रभाषा नाही. बॉलिवूड इंडस्ट्री आता तेलगू आणि तामिळ भाषांमध्ये चित्रपटांना डब करून यश मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र असे होत नाही. आज आपण असे सिनेमे बनवत आहोत जे सर्वत्र प्रदर्शित होत आहे.” किच्चा सुदीपच्या या वक्तव्यानंतर त्याला सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. आता यावरच अजयने (Ajay Devgn) त्याचे मत मांडले आहे.
=======
हे देखील वाचा – दीपिका पादुकोणच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा, यावर्षी करणार कान फिल्म फेस्टिवलमध्ये परीक्षण
=======
अजय देवगणच्या (Ajay Devgn) वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लवकरच त्याचा ‘रनवे ३४’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यात त्याच्यासोबत रकुल प्रीत सिंह, अमिताभ बच्चन, बोमन ईरानी आदी कलाकार असून हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे.