बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या भारताच्या आश्रयाला आल्या आहेत. आता बांगलादेशमध्ये मुहम्मद हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली नवे सरकार येईल अशी आशा आहे. आरक्षणा विरोधात सुरु झालेल्या आंदोलनात ७६ वर्षीय शेख हसीना यांची १५ वर्षाची सत्ता गेली. आता त्यांनी ही सत्ता १५ वर्ष कशी चालवली होती, याची उदाहरणे समोर येत आहेत. त्यातीलच एक चर्चेचे नाव म्हणजे आयना घर किंवा मिरर हाऊस आयना घर म्हणजे नरकाचे द्वार असल्याचा उल्लेख शेख हसीना यांचे विरोधक करत असत. त्याचे वास्तव आता शेख हसीना बांगलादेश सोडून गेल्यावर समोर येत आहे. आयना घर म्हणजे जिथे शेख हसीना यांना विरोध करणा-यांचा छळ केला जात असे. हसीना यांची सत्ता गेल्यावर प्रथम या आय़ना घर मधील कैद्यांची सुटका करण्यात आली. त्यातील भयानक वास्तव म्हणजे, या यातनागृहात ६०० कैद्यांना डांबण्यात आले होते, त्यातील १०० कैदीच जिवंत हाती लागले होते. त्यावरुन या आयना घरात कुठल्याप्रकारचा छळ होत असेल याची कल्पना येते. (Aina House Bangladesh)
बांगलादेशमध्ये आयना घराचे रहस्य आहे. आयना घर हा गुप्त तुरुंग राजधानी ढाक्यातील मीरपूर येथे आहे. त्यात ६०० कैदी ठेवण्यात आले होते. यातील बहुतांश कैदी हे राजकीय होते. बांगलादेशातील सत्तापालटानंतर विरोधकांनी प्रथम याच आयना घरातील कैद्यांना मुक्त केले. त्यात शेख हसीनाविरोधी नेते, अधिकारी आणि पत्रकार यांचाही समावेश होता. दुर्दैवानं ६०० पैकी फक्त १०० कैदीच हाती लागले आहेत. बाकी कैदी कुठे गेले किंवा कसे मारले गेले याची कसलीही माहिती अद्याप उपलब्ध नाही. (Aina House Bangladesh)
आयना घर नावाचा तुरुंग माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या आदेशानुसार बांधला गेला. या आयना घराचे रहस्य बाहेर आल्यावर बांगलादेशमध्ये औपचारिकरीत्या लोकशाही असली तरी, हसीना या आयना घरातून तिच्याविरोधात उठलेला प्रत्येक आवाज कशापद्धतीनं चिरडून टाकत होत्या, हे पुढे आलं आहे. आयना घर हा तुरुंग म्हणजे एक मोठे तळघर आहे. तिथे शेख हसीनाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांना कुठलेही नियम ना पाळता बंद करण्यात येत असे. बांगलादेशची गुप्तचर संस्था, डायरेक्टोरेट जनरल ऑफ फोर्स इंटेलिजेंस ही देशात अशी एकूण २३ आयना घर चालवत असल्याची माहिती आहे. या सर्वांतील कैद्यांना आता सोडण्यात आले आहे.
या आयना घरासंदर्भात अनेक किस्से आता बाहेर येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे, २१ ऑगस्ट २०१६ रोजी बॅरिस्टर अहमद बिन कासिम अरमान यांना ढाका येथील मीरपूर येथील त्यांच्या घरातून कोणतीही कायदेशीर कारवाई न करता अटक करण्यात आली. त्यानंतर बांगलादेशचे माजी ब्रिगेडियर जनरल अब्दुल्लाही अमान आझमी यांना १९७१ च्या बांगलादेश मुक्ती संग्रामातील मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी ताब्यात घेण्यात आले. या दोघांची रवानगी आयना घरात कऱण्यात आली, आणि त्यांचा हरप्रकारे छळ करण्यात आला. जमात-ए-इस्लामीचे नेते मीर कासिम यांचा मुलगा बॅरिस्टर अहमद याला तब्बल ८ वर्षे आयना घरामध्ये ठेवण्यात आले होते. शेख हसीना बांगलादेशमधून गेल्यावर अहमद यांची प्रथम सुटका करण्यात आली. या ८ वर्षात अहमद यांना मरणयातना सहन कराव्या लागल्या आहेत. अहमद सांगतात की, प्रत्येक दिवस त्यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस वाटत होता. त्यांना बाहेरच्या जगाची काहीच माहिती नव्हती. (Aina House Bangladesh)
====================
हे देखील वाचा : ढाका विद्यापीठ, बांगलादेशचे राजकारण
===================
७ ऑगस्टला जेव्हा त्यांची सुटका झाली, तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनाही ते जिवंत आहेत, यावर विश्वास बसला नाही. याच आयना घरात विद्यार्थी चळवळीतील नेत्यांनाही डांबून ठेवण्यात आले होते. त्यांची नखंही काढण्यात आली आहेत. आयना घरातील कैद्यांना तासनतास उलटे टांगले होते. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या अतिकची सुमारे दीड महिन्यानंतर सुटका झाली, तेव्हा त्याची प्रकृतीही गंभीर होती. ढाक्यातील मीरपूर येथील आयना घर हे २० फूट उंचीचे आहे. यातील प्रत्येक अंधारकोठडीत तीन कैदी ठेवण्यात येत. येथे सूर्यप्रकाश जायलाही जागा नव्हती. या अंधारकोठडीच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या व्यासपीठावर कैद्यांचा छळ केला जात असे. या आयना घराची सर्व सत्ता प्रभारी मेजर जनरल झिया उल अहसान यांच्याकडे होती. सत्ता बदलानंतर त्यांनी बांगलादेशमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना ढाका विमानतळावर पकडले गेले. अहसान आता लष्कराच्या ताब्यात आहेत. त्यांच्यावर आता कोर्ट मार्शल होणार आहे. (Aina House Bangladesh)
सई बने