नुकत्याच महाराष्ट्रात संपन्न झालेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणूक निकालाची तीन वैशिष्ट्ये सांगता येतील. एक म्हणजे भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय, दुसरं म्हणजे एम.आय.एम. पक्षाने मारलेली मुसंडी, तिसरं म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला १९ महानगरपालिकात मिळालेल्या ‘शून्य ‘ जागा. हे तीनही निकाल म्हटले तर स्वतंत्र आहेत आणि म्हटले तर एकाशी एक संबंधित आहेत. भाजपाने आता उघड उघड हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे आणि त्याबद्दल त्यांच्या मनात कुठलाही अपराधीपणा नाही. भाजपच्या या नीतीमुळे हिंदू भाजपच्या झेंड्याखाली एक होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. भाजपच्या हिंदुत्वाची प्रतिक्रिया म्हणून मुसलमान एम.आय.एम. प्रमुख असदुद्दीन ओवेसींच्या मागे एकवटू लागले आहेत किंवा ओवेसींना उत्तर म्हणून हिंदूंचे ध्रुवीकरण भाजपच्या झेंड्याखाली होऊ लागले आहे असेही म्हणता येईल. याच निवडणुकीत पहायला मिळालं की, राष्ट्रवादी (शरद पवार गट) या पक्षावरून मुसलमानांचा विश्वास आता उडू लागला आहे, कारण त्यांनी मतांसाठी मुसलमानांचा वापर केला, हे या समाजाच्या लक्षात आले आहे. एम. आय. एम. पक्षाला २९ पैकी २५ महानगरपालिकात मिळून १२५ जागा मिळाल्या आहेत. छत्रपती संभाजी नगर आणि सोलापूर येथे एम. आय. एम. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयाला आला आहे.

एम. आय. एम. च्या या धडाक्यामुळे अनेक विचारवंत, विश्लेषक धोक्याची घंटा वाजली असल्याचा इशारा देत आहेत. असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाचे मूळ हे निजामाच्या हैदराबाद संस्थांनातील ‘रझाकार’ या ‘ चळवळीत आहे. या रझाकारांनी हिंदूवर केलेल्या अत्याचाराच्या कहाण्या सर्वश्रुत आहेत. असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सल्लाउद्दीन ओवेसी हे पूर्वी हैदराबादमधून लोकसभेवर निवडून जात असत. त्यांच्या निधनानंतर असदुद्दीन यांनी त्यांची जागा घेतली. विशेष म्हणजे एम.आय.एम. हा तेलंगणा राज्यातील एकमेव हैदराबाद मतदारसंघातून वर्षानुवर्षे निवडून येत आहे. त्याव्यतिरिक्त तेलंगणातील इतर कुठल्याही मतदारसंघातून ते आजपर्यंत निवडून आलेले नाहीत. एकदा टी.व्ही. वरील चर्चेत सुब्रमण्यम स्वामी यांनी ओवेसीना त्यांची मुळे हिंदू असल्याचे सांगताना त्यांच्या कुळाच्या मूळपुरुषाचे नाव ‘तुलसी राम’ असल्याची आठवण करून दिली होती. म्हणजेच काश्मीर मधील अब्दुल्ला कुटुंबियांप्रमाणे ओवेसी हे सुद्धा ‘धर्मांतरित मुस्लिम’ आहेत. आता ओवेसी यांच्या पक्षाच्या विस्तारामुळे अनेकजण भयभीत झाले आहेत कारण ओवेसी उघडपणे मुस्लिम धर्मांधतेचा करत असलेला पुरस्कार ! यामध्ये असदुद्दिन यांचे बंधू अकबराउद्दीन यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. यातून एक प्रश्न असा निर्माण होतो की सध्या भारतात ओवेसी हे एकमेव असे पुढारी आहेत का?
हे देखील वाचा
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना केलं क्लीन बोल्ड !
ओवेसी हे ट्रिपल तलाक, समान नागरी कायदा, वक्फ बोर्ड सुधारणा कायदा, नागरिकत्व सुधारणा कायदा (सी. ए. ए.), एन.आर.सी, एस.आय.आर. इत्यादी सर्व कायद्यांना कडाडून विरोध करतात. त्यांचा वंदे मातरमला विरोध असून ते वंदे मातरम गाणार नाही असे जाहीरपणे सांगतात. मुसलमानांना हिंदू धर्मियांविरुद्ध भडकवतात आणि या सर्व कारवाया ते उघडपणे करतात. तोंडाशी भांडे नेऊन लपवायचा प्रयत्न करत नाहीत म्हणून त्यांचा धोका अधिक जाणवतो का ? आता ओवेसी यांची वरील भूमिका आणि सध्या काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, द्र.मु.क., शिवसेना उबाठा, राष्ट्रीय जनता दल, इत्यादी पक्ष घेत असलेली भूमिका यात काय फरक आहे? धर्मनिरपेक्षतेची झूल पांघरून हे सर्व ओवेसींसारखीच भूमिका घेतात ना मग त्यांची आपल्याला का भीती वाटत नाही ? कुठल्याही चर्चेत वरील सर्व पक्ष व ओवेसी यांचे प्रवक्ते यांचे वरील सर्व मुद्द्यांवर एकमत असते. मतभिन्नता कुठल्या मुद्यावर असते तर भाजपची’बी’ टीम कोण आहे काँग्रेस की एम.आय.एम. !

पाहायला गेले तर काँग्रेस, तृणमूल कॉग्रेस, समाजवादी वगैरे धर्मानिरपेक्ष पक्ष हे ओवेसी यांच्यापेक्षा अधिक कट्टर धर्मांधतेला खतपाणी घालतात. पश्चिम बंगाल, कर्नाटक, तेलंगणा इ. राज्ये ओवेसी यांचाच तर अजेन्डा चालवताना दिसतात. तेलंगणाचे मुख्यमंत्री तर उघडपणे काँग्रेस मिन्स मुस्लिम आणि मुस्लिम मिन्स काँग्रेस असे बिनदिक्कतपणे जाहीर करतात. कर्नाटकमध्ये काँग्रेसने मुसलमानांना धर्माच्या आधारे स्वतंत्र आरक्षण दिले आहे. ही यादी खूप लांबत जाईल म्हणून देत नाही. वक्फ बोर्ड सुधारणा कायदा संसदीय समितीच्या परीक्षणार्थ पाठवला गेला होता. या समितीत ओवेसी यांच्याबरोबरच इतर सर्व पक्ष सामील होते. या समितीच्या एका बैठकीत समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्यावर काचेचा ग्लास फेकून मारणारे ओवेसी नव्हते तर तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी होते. ओवेसी भले कायद्याच्या विरोधात असले तरी त्यांनी सभ्यतेच्या मर्यादांचे पालन केले. ओवेसी यांनी ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दिला. एवढेच नव्हे तर भारताने परदेशात पाठवलेल्या एका शिष्टमंडळाचे ते सदस्य होते. त्यांनी किती राफेल पडली असा प्रश्न विचारला नाही. तो प्रश्न विचारणारे कोण होते तर राहुल गांधी, तृणमूल काँग्रेस, अखिलेश यादव, आणि तत्सम विरोधक !
हे देखील वाचा
Mumbai BMC : मुंबईत नक्की कुणाचा महापौर होणार ?
पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यानी हिंदूंना धर्म विचारून गोळ्या घातल्या हे त्यांनी संसदेतील भाषणात स्पष्टपणे सांगितले. त्याउलट धर्म विचारून गोळ्या घातल्या नाहीत, असे धादांत खोटे बोलणारे कोण होते तर शरद पवार. ओवेसी जो काय विरोध करायचा तो देशातच करतात. पण राहुल गांधींप्रमाणे त्यांनी परदेशात जाऊन देशाची बदनामी केल्याचे वाचनात आले नाही. टी.व्ही. वरील एका चर्चेत त्यांनी पाकिस्तानी पत्रकाराचे पुरते वस्त्रहरण केले होते. त्या चर्चेत भारताला कमीपणा येईल असे एकही वाक्य ते बोलले नाहीत.ओवेसीनी संसदेत अथवा बाहेर कधीही पाकिस्तान अथवा चीनचे समर्थन केले नाही. त्यांनी कधीही लष्करावर अविश्वास दाखवलेला नाही. अशी लाजिरवाणी कृत्ये कोण करते तर काँग्रेस, टी. एम. सी., समाजवादी, द्र. मु. क. इत्यादी धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरलेले ‘धर्मांध ‘पक्ष ! वरील विवेचनाचा उद्देश ओवेसीना ‘ग्लोरिफाय’ करण्याचा मुळीच नाही. समोरासमोर येऊन छातीवर वार करणाऱ्याचा प्रतिकार करता येतो पण पाठीमागून वार करणाऱ्याचा प्रतिकार करता येत नाही. ओवेसी हे समोरासमोर येऊन लढत आहेत पण काँग्रेस आणि त्यांची समाजवादी पिलावळ हे देशाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत आहेत. ओवेसीचा वाढता प्रभाव जरूर चिंतेचा विषय आहेच पण त्याहून जास्त धोकादायक आहेत ते हिंदूंमध्ये फूट पाडून मुस्लिम तुष्टिकरणाचा अजेन्डा चालवणारे ‘सुडो सेक्युलर ‘ राजकीय पक्ष, संघटना, विचारवंत. मग अधिक धोका कुणाकडून आहे,ओवेसी की छद्म निधर्मी राजकीय पक्ष?ज्याचे त्यानी ठरवावे.
लेखक – रघुनंदन भागवत
२० जानेवारी २०२६
