बशर अल-असदच्या हुकूमशाही आणि गृहयुद्धाने उद्ध्वस्त झालेल्या सीरियामध्ये 14 वर्षांनंतर संसदीय निवडणुका झाल्या आहेत. दमास्कसमध्ये झालेल्या या मतदानानंतर अहमद अल-शारा आता सिरियाचा अध्यक्ष होणार हे स्पष्ट झाले आहे. याच अहमद अल-शाराला अमेरिकेने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. मात्र अमेरिकेनं त्याच्यावरचा दहशतवादी शिक्का पुसून टाकला असून त्याच्याशी आता मैत्री केली आहे. नुकत्याच अमेरिका दौ-यावर गेलेल्या अहमद अल-शाराचे आणि अमेरिकेच्या बदललेल्या नात्याबद्दल अनेक तर्क वर्तवण्यात येत आहेत. ट्रम्प यांच्यासोबत शारानं गुप्त करार केल्याची चर्चा आहे. आता याच शाराच्या नेतृत्वाखाली सिरियात निवडणुका झाल्या तरी त्यात प्रत्यक्ष सिरीयन नागरिकांचा सहभाग नव्हताच. त्यामुळे या मतदान प्रक्रियेवरही “कठपुतळी निवडणुका” असा शिक्का मारला गेला आहे. या निवडणुकीचा निकाल एक-दोन दिवसात जाहीर होणार असून अहमद अल-शारा याचेच एकमेव नाव अध्यक्षपदासाठी असल्यानं आता सिरियामध्ये शारा युग चालू होणार आहे. (Ahmed al-Sharaa)
गेल्या वर्षी सिरियामध्ये डिसेंबर महिन्यात झालेल्या बंडानं अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. सिरियाचा सर्वेसर्वा झालेल्या बशर अल-असद यांच्या दहशतवादाची एकेक प्रकरणे जगासमोर येऊ लागली. जनतेचा रोष वाढल्यावर बशर आपला जीव वाचवण्यासाठी कुटुंबियांसोबत रशियाला पळून गेले. त्यानंतर या बंडाचे नेतृत्व करणा-या अहमद अल-शारा यांनी अंतरिम अध्यक्ष म्हणून सिरियाची सत्ता स्वीकारली. सिरियाची सत्ता हाती घेतल्यावर अहमद अल-शारा यांनी प्रथम त्यांचे आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यावर भर दिला. (International News)

कारण मे 2013 मध्ये अमेरिकेने अल-शाराला स्पेशली डेजिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट म्हणून घोषित केले होते. हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी शिक्का पुसण्यासाठी अहमद अल-शारा यांनी अमेरिकेबरोबर मैत्रीचा हात पुढे केला. त्यात झालेल्या घडामोडीनंतर जुलै 2025 मध्ये अमेरिकेने त्यांचे नाव दहशतवादी यादीतून काढून टाकले. यावर अमेरिकेला जाबही विचारण्यात आला, मात्र अमेरिकेनं फक्त शाराचे नाव दहशतवादी यादीतून काढून टाकले नाही तर त्याचे न्यूयॉर्कमध्ये स्वागतही केले. अहमद अल-शारा च्या रुपानं 58 वर्षांत प्रथमच सीरियाला संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सहभागी होता आले. आता हाच अहमद अल-शारा सिरियाचा अध्यक्ष होत आहे. यामागेही अमेरिकेचा अप्रत्यक्ष हात असल्याची चर्चा आहे. (Ahmed al-Sharaa)
गेल्या वर्षी अंतरिम अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर, आपण देशात लोकशाही आणणार असे आश्वासन अहमद अल-शाराने दिले होते. त्यानुसार देशात निवडणुका झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात जनतेला मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला. या निवडणुकीत 210 सदस्यांच्या संसदेपैकी 140 जागांसाठी मतदान झाले. 7000 निवडून आलेल्या इलेक्टोरल कॉलेज सदस्यांनी मतदान केले. या सदस्यांची निवड सरकारने नियुक्त केलेल्या जिल्हा समित्यांनी केली होती. आता ज्या 70 जागा शिल्लक राहिल्या आहेत, त्या अध्यक्ष अहमद अल-शारा आपल्या अधिकारानुसार भरणार आहेत. यामध्ये महिला, अल्पसंख्याक आणि सहयोगी गटांना प्रतिनिधित्व देण्यात येईल, अशी शक्यता आहे. (International News)
या निवडणूक प्रक्रियेतून जनता आणि राजकीय पक्ष दोघांनाही वगळण्यात आले आहे. युद्ध आणि विस्थापनामुळे जनगणना करणे आणि मतदार याद्या तयार करणे अशक्य असून सिरियातील लाखो लोक कागदपत्रांशिवाय असल्याचे कारण यासाठी देण्यात आले आहे. या सर्वांमुळे या निवडणुकीवर टीकाही होत आहे. मात्र याबाबत अहमद अल-शारा यांनी कुठलेही वक्तव्य केलेले नसून 7 ऑक्टोबरला ते यासंदर्भात माहिती देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
=================
हे देखील वाचा : Rakesh Kishore : सरन्यायाधीशांवर बूट फेकणारा राकेश किशोर आहे तरी कोण?
=================
या सर्वात अहमद अल-शारा यांच्या नावावर सिरियाचे अध्यक्ष म्हणून शिक्का मारण्यात आला आहे. 43 वर्षीय अहमद अल-शारा यांच्याकडे आधुनिक विचारसरणीचे नेता म्हणून बघण्यात येत आहे. त्यातही अहमद अल-शारा यांच्या कुटुंबाचा वंश पैगंबर मुहम्मद यांच्यापासून सुरू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला समाजात मोठा मान आहे. त्यांचे वडिल हुसेन अल-शरा, पेट्रोलियम मंत्रालयात तेल अभियंता म्हणून काम करत होते तर आई भूगोल शिक्षिका होती. हे कुटुंब 1989 मध्ये सीरियामध्ये आले. इथेच अहमद अल-शारा याचे विचार धार्मिक झाले. पॅलेस्टीनी नागरिकांसाठी त्यांनी चळवळ उभारली. दरम्यान अल-शाराने दमास्कस विद्यापीठात मीडिया स्टडीज अँड मेडिसिन फॅकल्टीमध्ये दोन वर्षे शिक्षण घेतले. (Ahmed al-Sharaa)
यानंतर अहमद अल-शारा 2003 मध्ये त्याच्या कुटुंबाला न कळवता इराकला पळून गेला. इराकमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल सीरियन मिलिटरी इंटेलिजेंस डायरेक्टरेटने ताब्यात घेतले आणि चौकशी केली, परंतु कोणत्याही राजकीय पक्ष किंवा अतिरेकी गटाशी कोणताही संबंध नाकारल्यानंतर त्याला सोडण्यात आले. त्यानंतर अल-शारा हा तेथील हदशतवादी संघटनांमध्ये काम करु लागला. AQI नेता अबू मुसाब अल-झरकावीचा जवळचा सहकारी म्ङणून त्याचा उल्लेख होत होता. अमेरिकेनं त्याला काही काळासाठी अटकही केली. सुटल्यानंर अहमद अल-शारानं अनेक दहशतवादी संघटनांसोबत काम केले. शेवटी अमेरिकेनं त्यालाआंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. आता तोच अहमद अल-शारा अमेरिकेचा मित्र झाला असून तो सिरियाचा अध्यक्ष होत आहे.
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
