जम्मू आणि काश्मीर सध्या देवीच्या जयघोषांनी निनादून गेले आहे. गेल्या अनेक वर्षापासून उध्वस्त अवस्थेत असलेल्या शारदा माता देवीच्या मंदिराला (Sarada Mata Temple) नवे रुप मिळाले आहे. काश्मिर खो-यातील शारदा मातेचे मंदिर समस्त हिंदू धर्मियांचे आस्थेचे स्थान होते. हे मंदिर काही वर्षापूर्वी पूर्णपणे उध्वस्त करण्यात आले होते. मात्र नियंत्रण रेषेवरील कुपवाडा शारदा माता मंदिर आता नव्या रुपात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी तयार झाले आहे. दशकांनंतर नवनिर्मित मंदिरात माता शारदाच्या पंचधातूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. चैत्र नवरात्रौत्सवाच्या मुहूर्तावर हे मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले, ही मोठी घटना आहे. यामुळे अनेक वर्ष विस्थापित आयुष्य जगत असलेल्या काश्मीरी बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला. अनेक भक्त देवीची गाणी म्हणत या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. कुपवाडा शारदा माता मंदिराचा (Sarada Mata Temple) उद्घाटन सोहळा झाल्यावर काश्मिरी पंडितांनी आनंद व्यक्त केला आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या शारदा मंदिरात (Sarada Mata Temple) मूर्तीच्या स्थापनेच्यावेळी अनेक भाविक भावूक झाले होते. हे मातेचे मंदिर किशनगंगा नदीच्या काठावर बांधले गेले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह या शारदा माता मंदिराचे ऑनलाईन उद्घाटन केले. नियंत्रण रेषेवर असलेल्या या माता शारदेच्या नव्याने बांधलेल्या मंदिरात पंचधातूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. हा घटना एखाद्या ऐतिहासिक घटनेसारखी मोठी असल्याची प्रतिक्रीया स्थानिक देत आहेत. शारदा मातेचे मंदिर (Sarada Mata Temple) भाविकांसाठी खुले होताच स्थानिकांनी नृत्यावर ठेका धरुन आनंद व्यक्त केला. यावेळी काश्मिरी पंडितांचे फुलांचा वर्षाव करुन स्वागत करण्यात आले. शारदा मातेचे मुळ मंदिर पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे. हे मूळ मंदिर करतारपूर-कॉरिडॉरच्या धर्तीवर विकसित करण्याचे आश्वासनही केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहे. त्यामुळे काश्मीरी पंडितांनी आनंद व्यक्त केला आहे. शारदा पीठ मुझफ्फराबादमध्ये आहे आणि तेथेही लवकरच भक्तांना जाता येईल अशी भावना भक्तांनी व्यक्त केली. शारदा मातेच्या नव्यानं स्थापन झालेल्या मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी परदेशात गेलेले स्थानिकही आवर्जुन उपस्थित होते. हा क्षण जम्मू काश्मिरच्या भाविकांसाठी मोठा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
काश्मिरी पंडित अनेक वर्षांपासून धार्मिक यात्रेसाठी करतारपूरसारख्या कॉरिडॉरची मागणी करत आहेत. या ऐतिहासिक परिसरात तब्बल 76 वर्षांनंतर शारदा देवीचे मंदिर (Sarada Mata Temple) बांधले गेले आहे. कर्नाटकातील शृंगेरी मठातून देवीची पंचधातूची मुर्ती या मंदिरासाठी खास आणण्यात आली. ज्या जमिनीवर हे शारदा मातेचे मंदिर (Sarada Mata Temple) बांधले आहे, ती जागा स्थानिक लोकांच्या सहकार्याने परत घेण्यात आली. त्या जागी धर्माशाळा होती. 1947 मध्ये येथे मोठ्याप्रमाणात जाळपोळ झाली. फाळणीनंतर 1948 मध्ये शारदा पीठाची यात्रा बंद करण्यात आली. गतवर्षी धर्मशाळेची जमीन स्थानिक मुस्लिम समाजाने काश्मिरी पंडितांना परत केली. त्यानंतर सेव्ह शारदा समिती काश्मीरच्या सदस्यांनी येथे शारदा मंदिराची उभारणी केली आहे.
======
हे देखील वाचा : 51 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या ‘या’ मंदिराची पौराणिक कथा
======
कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या टीटवाल येथे या शारदा मातेच्या मंदिरासाठी श्री शारदा पीठम शृंगेरी मठानेही सहाय्य केले. या मंदिरामुळे शारदा पीठाची प्राचीन तीर्थक्षेत्रे पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने एक आणखी पाऊल पडल्याची भावना भक्तांची आहे. या मंदिराला जोडणाऱ्या लिंक रोडचेही उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे भक्तांना अधिक सुलभरित्या मातेच्या मंदिरात जाता येणार आहे जम्मू आणि काश्मीर हे प्राचीन काळापासून धर्मग्रंथ आणि आध्यात्मिक ज्ञानाचे केंद्र राहिले आहे. एकेकाळी शारदा पीठ हे भारतीय उपखंडातील ज्ञानाचे केंद्र मानले जात असे. आदि शंकराचार्यांनी स्वतः येथे मातेची आराधना केल्याची माहिती आहे. शारदा लिपीचे नाव आईच्या नावावरून ठेवले गेल्याचे दाखले आहेत. जगभरातून भाविक येऊन मंदिरात धर्म, संस्कृत, वेद, शास्त्र यांची पूजा करत असत. फाळणी झाल्यावर हे मंदिर आणि मठ उद्ध्वस्त करण्यात आले. आता स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर, पुन्हा नव्या रुपातील शारदा माता मंदिर भाविकांसाठी खुले झाल्यावर स्थानिकांनी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगितले आहे.
सई बने