पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्यादिनी भारतात चित्ते आणण्यात आले. दक्षिण आफ्रिकेहून 8,405 किलोमीटरचा प्रवास करून 5 मादी आणि 3 नर असे एकूण 8 चित्ते भारतात दाखल झाले. नामबियाहून खास कार्गो फ्लाईटनं या चित्त्यांना भारतात आणलं. आता हे चित्ते मध्य प्रदेशातल्याच कुनो नॅशनल पार्कमध्ये रहात आहेत. हा एकूणच चित्ते आणण्याचा सोहळा तमाम भारतीयांनी टिव्हीच्या माध्यमातून लाईव्ह बघितला. विमानानं प्राणी आणण्याचा हा अनोखा प्रयोग यशस्वी झाल्यावर आता पक्षांच्या प्रवासाची वेळ आली आहे. हे पक्षी म्हणजे साधारण नसून अन्न साखळीतील महत्त्वाचा दुवा मानण्यात येणारे गिधाड (journey of the Vulture) आहे.
गिधाडे ही नैसर्गिकरीत्या कचरा निर्मूलन करतात. त्यांना निसर्गातील सफाई कर्मचारी म्हणतात. असे गिधाड कन्याकुमारीहून जोधपूरला आणले जाणार आहे. अतिशय दुर्मिळ प्रजातीचे हे गिधाड असून त्याचा सर्व प्रवास रात्रीचा होणार आहे. गिधाडांना काही त्रास होऊ नये म्हणून गाडीचा वेगही मर्यादित ठेवण्यात येणार आहे. गिधाडांना आणण्यासाठी खास डिझाइनचे पिंजरे आणि वाहने तयार करण्यात आली आहेत.
राजस्थानच्या जोधपूरमधील माचिया बायोलॉजिकल पार्क मध्ये या गिधाडला ठेवण्यात येणार आहे. माचिया पार्कमध्ये सरडा, ससा, वाळवंटी मांजर, जंगली मांजर, यांच्यासह सिंह, अस्वल, हरणं, मोर असे अनेक प्राणी आहेत. आता त्यात गिधाडाची भर पडणार आहे.
या सर्वांची सुरुवात जानेवारी 2022 पासून झाली. सिनेरियस प्रजातीचे गिधाड कन्याकुमारीमध्ये जानेवारी 2022 मध्ये जखमी अवस्थेत दिसले होते. त्याला नागरिकांनी वनविभागाच्या ताब्यात दिले. या गिधाडाला (journey of the Vulture) कन्याकुमारीच्या उदयगिरी पार्कमध्ये ठेवून उपचार सुरू करण्यात आले. हे गिधाड कुठून आले याचा शोध सुरु झाला. त्यावर तज्ज्ञांना असे कळले की, या प्रजातीची गिधाडे ऑक्टोबर महिन्यात जोधपूरला येतात.
जोधपूरमधील माचिया पार्कच्या अधिकाऱ्यांबरोबर संपर्क केल्यानंतर असे आढळून आले की, त्यांचा एक समूह गेल्या वर्षी 2020 मध्ये येथे आला होता. त्यातीलच एक गिधाड परतीच्या वाटेवर असतांना अपघातानं कन्याकुमारीला मिळाल्याचा अंदाज आहे. यानंतर उदयगिरी पार्कचे अधिकारी आणि तज्ज्ञांनी सिनेरियस प्रजातीच्या या गिधाडाची त्याच्या प्रजातीच्या गिधाडांशी जुळवाजुळव करण्याची मोहीम सुरू केली. आता हा प्रवास 25 सप्टेंबरला सुरु झाला आहे.
कन्याकुमारी येथील गिधाडाला(journey of the Vulture) जोधपूरला नेण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे. कन्याकुमारी ते जोधपूर हा 2610 किमीचा प्रवास या गिधाडांसाठी खूप कठीण मानला जातो. अशा परिस्थितीत गिधाडाला जोधपूरला सुरक्षितपणे नेण्यासाठी उदयगिरी पार्कच्या तज्ज्ञांनी खास पिंजरे डिझाईन केले आहेत. गिधाडांना वाटेत कमीत कमी धक्का बसेल अशा पद्धतीने या वाहनाची रचना करण्यात आली आहे. वाहनाचा वेगही ताशी 50 किलोमीटर असेल. हा प्रवास सुरुळीत झाल्यास 4 दिवसांच्या प्रवासानंतर गिधाड जोधपूरच्या माचिया सफारी पार्कमध्ये पोहोचेल, असा अंदाज आहे.
या भेटीदरम्यान वन्यजीव संस्थेचे तज्ज्ञ, पक्षी तज्ज्ञ डॉक्टर आणि आत्तापर्यंत कन्याकुमारीमध्ये या गिधाडाला दररोज चारा देणारे कर्मचारी सोबत असतील. रात्रभर प्रवास केल्यानंतर सहज लक्ष देता येईल अशा ठिकाणी वाहन थांबवले जाईल. गिधाडाला फक्त रात्री प्रवास करण्याची परवानगी असेल. रात्रीच्या वेळी वाहनांच्या कमी आवाजामुळे गिधाडाला त्रास होणार नाही, हे या मागचे कारण आहे . एका दिवसात या गिधाडाचा जास्तीत जास्त 600 किलोमीटरचा प्रवास होईल. या प्रवासात पुणेही येणार असून पुण्यातील गिधाड पुनर्वसन केंद्रात त्याची तपासणी केली जाईल. त्यानंतर बडोदा आणि मग जोधपूर असा प्रवास असेल.
जोधपूरच्या माचिया पार्कमध्ये महिनाभर तज्ज्ञांच्या देखरेखीखाली गिधाडाला ठेवण्यात येईल. जोधपूरच्या हवामानाबरोबर हे गिधाड मिळते जुळते झाल्यावर मात्र त्याची ड्युटी जोधपूरच्या कैरू गावातील महापालिकेच्या डम्पिंग यार्डमध्ये लावण्यात येईल. या डम्पिंग यार्डमध्ये अन्यही गिधाडे येतात. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे चित्त्यांना जीपीएस यंत्रणा लावण्यात आली आहे. त्याप्रमाणे या गिधाडाच्या शरीरावरही जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. (journey of the Vulture)
भारतात एकेकाळी गिधाडांची संख्या चांगली होती. परंतु गेल्या काही वर्षात त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. ती इतकी कमी झाली आहे की आता गिधाडे भारतातून नामशेष होणार की काय अशी भीती पक्षीप्रेमींना वाटते आहे. गिधाडांचे खाद्य कमी झाल्यानं त्यांची वाढ मंदावल्याची माहिती आहे. पाळीव प्राण्यांमुळेही गिधाडे कमी होत असल्याचे पक्षीमित्र सांगतात.
========
हे देखील वाचा : ‘या’ देशांमध्ये सिंह-चित्ता घरात पाळण्यास परवानगी मिळते?
========
पाळीव प्राण्यांना डायक्लोफिनॅक नावाचे औषध देतात. औषध घेतलेले प्राणी मेल्यावर त्यांचे मांस गिधाडांनी खाल्ले तर गिधाडांच्या शरीरात अनेक व्याघी होतात आणि ते मरतात. गिधाडं (journey of the Vulture) दिसायला अत्यंत कुरुप असतात. वरुन ती मेलेले प्राणी खातात. त्यामुळे त्यांच्याबद्दल किळसवाणी भावना आहे. परंतु गिधाडे ही निसर्गचक्रातील प्रमुख आहेत. त्यांचे अस्तित्व संपल्यास मृतदेह सडून रोगराई निर्माण होण्याची शक्यता असते. सध्या हरियाणा, पश्चिम बंगाल, आसाम या राज्य सरकारांनी गिधाड संवर्धन प्रजनन केंद्रे चालू केले आहे. अन्य राज्यातही असेच केंद्र चालू व्हावे म्हणून पक्षीमित्र संघटना प्रयत्नशील आहेत.
– सई बने