Home » श्रावणी रविवारी व्रत आणि माहिती

श्रावणी रविवारी व्रत आणि माहिती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Aditya Ranubai Vrat
Share

आज श्रावणातला पहिला रविवार. श्रावण म्हटले की, वातावरण एकदम भक्तिमय असते. एकापाठोपाठ एक सणावारी नुसती रेलचेल सुरु असते. सोबतच वातावरण देखील आल्हादायक झालेले असते. भगवान शंकरांना समर्पित असणारा हा श्रावण महिना अतिशय पवित्र आणि मोठा समजला जातो. या महिन्यात शंकरांसोबतच इतरही देवांची आराधना केली जाते. व्रत वैकल्यांचा महिना अशी ओळख असलेल्या या महिन्यात अतिशय वेगवेगळे व्रत करण्याची परंपरा आहे.

श्रवणात प्रत्येक वाराला एक खास महत्व आहे. त्याची एक खास ओळख आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध-बृहस्पती पूजन, श्रावणी शुक्रवार, श्रावणी शनिवार हे तर आपल्याला माहीतच आहे. मात्र याच श्रावणात येणाऱ्या रविवारला देखील मोठे महत्व आहे. रविवार हा सूर्याचा वार म्हणून ओळखला जातो. या दिवशी सूर्याची आराधना करण्याची पद्धत आहे. श्रावणात देखील रविवारी सूर्याची पूजा केली जाते. मात्र त्याआधी पूजा केली जाते ती सूर्याची पत्नी असणाऱ्या आदित्य राणूबाई यांची. श्रावणी रविवारी याच पूजेचे जास्त महत्व असते. चला जाणून घेऊया या पूजेबद्दल अधिक माहिती.

श्रावणातील रविवारी हे व्रत करता येते. हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. स्त्रियांनी साक्ली लवकर उठावे. स्नान आदी नित्यकर्म केल्यानंतर, देवाजवळ जावे. एका विड्याच्या पानावर सूर्याचे रक्तचंदनाने चित्र काढावे. बाजूला एका वर्तुळात षटकोन काढावा. नंतर सहापदरी डोरा तयार करावा. या दोऱ्याला सहा गाठी माराव्यात. सूर्यचित्र, षटकोन आणि सहा गाठी मारलेला सहापदरी दोरा या सर्वांची एकत्रित मनोभावे पूजा करावी.

पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गूळ-खोबरे-याचा नैवेद्य दाखवावा. नंतर आदित्यराणूबाईची कहाणी करावी. या पूजेच्या दिवशी रविवारी एका सवाष्णीला जेवावयास बोलवावे. काही ठिकाणी हे व्रत मौन बाळगत सूर्योदय होण्यापूर्वीच करायची पद्धत आहे, तर काही ठिकाणी हे व्रत सकाळी केले जाते. व्रत करणे शक्य नसल्यास स्नानादी नित्यकर्म करून सूर्य आणि राणूबाईंची मानसपूजा करून गायत्री मंत्र जप करावा.

Aditya Ranubai Vrat

खासकरून महाराष्ट्रातील खान्देश या प्रांतात हे व्रत विशेष प्रचलित आहे. खान्देशातील अनेक घरांमध्ये मंगलकार्याच्या आधी राणूबाई आणि सूर्याचे लग्न लावण्याची रीत आहे. कुठल्या ना कुठल्या रूपात सूर्यपूजा करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे. त्यापैकी ही एक प्रथा म्हणावी लागेल. ज्यांना शक्य असेल, त्यांनी विधिवत हे व्रत करावे.

आदित्य राणूबाई व्रत करणे शक्य नसल्यास श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्याची पूजा करुन त्याला खिरीचा नैवेद्य दाखवावा. केवळ श्रावणातील रविवारी नाही, तर वर्षभरातील सर्व रविवारी सूर्यपूजा करावी. मात्र, शास्त्रोक्त पूजन शक्य नसल्यास केवळ भक्तिपूर्वक नमस्कार करावा. दुपारी बारा वाजण्याच्या आधी गायत्री मंत्राचा यथाशक्ती जप करावा, असे सांगितले जाते.

आदित्य राणूबाईची कथा

ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा, आणायला रानांत जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, “काय ग बायांनों, कसला वसा वसतां? तो मला सांगा.” ” तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील.” ब्राह्मण म्हणाला, “उतत नाहीं, मातत नाहीं, घेतला वसा टाकीत नाहीं.” तेव्हा त्या म्हणाल्या, “श्रावणमास येईल, तेव्हां पहिल्या आदितवारीं मौन्यान (मुकाट्यान) उठावं, सचीळ (वस्त्रासहित) स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्यराणूबाई काढावी.

सहा रेघांचं मंडळ करावं, सहा सुतांचा तातू करावा. त्याला सहा गाठी द्याव्या. पानफूल वहाव, पूजा करावी. पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळाखोबर्‍याचा नैवेद्य दाखवावा, सहा मास चाळावी, सहा मास पाळावी, माघी रथसप्तमीं संपूर्ण कराव. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकड तूप, मेहूण जेवू सांगाव. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाच उद्यापन कराव.” असा वसा ब्राह्मणान केला.

त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावण धाडलं, ब्राह्मण जाते वेळेस भिऊं लागला. कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीन सांगितलं, ” भिऊ नका, कापू नका, तुमच्या मुली आमचे येथे द्या” “आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरीं कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल.” राणी म्हणाली, ” दासी करीत नाही, बटकी करीत नाहीं. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू.”

मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या, एक राजाचे घरीं दिली. दुसरी प्रधानाचे घरीं दिली. गेल्या पावलीं मुलींचा समाचार घेतला नाहीं. बारा वर्षांनीं समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीन बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. “बाब बाबा, गूळ खा पाणी प्या.” गूळ खात नाहीं, पाणी पीत नाहीं. माझी कहाणी करायची आहे ती तूं ऐक.” तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाहीं. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याचे मनांत राग आला. तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला. म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं.

“बाबा, बाबा, गूळ खा, पाणी प्या.” ” गूळ खात नाही पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, ती तूं अगोदर ऐक. ” तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू?” घरांत गेली, उतरडीची सहा मोत्ये आणली. तीन आपण घेतलीं. तीन बापाच्या हातांत दिलीं. त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीनं चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, ” मुलींचा समाचार कसा आहे?” जिनं कहाणी ऐकली नाहीं, ती दारिद्रयाने पीडली. दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती, ती भाग्यनं नांदत आहे.” इकडे दरिद्री जी झाली होती, तिनं आपल्या लेकाला सांगितले. “मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये.”

Aditya Ranubai Vrat

पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला.” अग अग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या?” ” आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे.” “कसा आला आहे? तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे.” ‘परसदारन घेऊन या.’ परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊ माखू घातलं, पीतांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं. कोहोळा पोखरला, होनमोहोरा भरल्या. “वाटेस आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहोळा काढून नेला. घरी गेला. आईनं विचारलं, ” काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” दैवे दिलं, कर्मानं नेलं. कर्माच फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं. पण सर्व गेलं.

पुढं दुसर्‍या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. “अग अग दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या?” “आम्ही दासी प्रधानाच्या.” प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं पीतांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं. काठी पोखरून होनामोहोरांनीं भरून दिली. ” बाबा, ठेवू नको. विसरू नको. जतन करून घरी घेऊन जा, ” म्हणून सांगितल. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला, हातची काठी काढून घेतली. घरी गेला, झालेली गोष्ट राणीला सांगितली. “दैवे दिलं, ते सर्व कर्मानं नेलं.”

पुढं तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासरखं प्रधानाचे घरी नेऊन न्हाऊं माखू घातलं, पीतांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, नारळ पोखरून होनमोहोरांनी भरून दिला. ” ठेवू नको, विसरू नको.” म्हणून सांगितलं, घरी जाताना विहिरीत उतरला. तो गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं. ” काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं तें सर्व बुडालं.”

चवथ्या आदितवारी चवथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरीं नेऊन न्हाऊ माखू घातलं, पीतांबर नेसायला दिला. जेवूं खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होनामोहोरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपान आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, “काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” “आई मावसशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं.”

पाचव्या आदितवारीं आपण उठली, तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरीं नेलं. न्हाऊं घातलं माखूं घातलं, पाटाच बेसायला दिला. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. ” काय वसा करतेस तो मला सांग.” बहीण म्हणाली, “अंग अंग चांडाळणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहींस, म्हणून तुला दरिद्र आलं.” राजाच्या राणीनं विचारलं, “याला बहिणीच्या घरीं राहिली. श्रावणास आला. सांगितल्याप्रमाणं सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं.

राजानं बोलावूं धाडलं. “मावशी मावशी, तुला छत्रं आलीं, चामरं आलीं, पाईक आले, परवर आले.” “मला रे पापिणीला छत्रं कोठली? चामरं कोठलीं? पाईक कोठले? परवर कोठे?” बाहेर जाऊन दाराशीं बघतात, तो राजा बोलावूं आला आहे. राजा आला तशी घरीं जायला निघाली. एकमेकींना बहिणीबहिणींनीं आहेर केले. वाटेनं जाऊ लागलीं. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं, तो कहाणीची आठवण झाली. ” करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” “तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे.” असं म्हणून तो राणीकडे आला.

तशी सहा मोत्ये राणीनं घेऊन तीन त्याला दिलीं. तीन आपल्या हातांत ठेवलीं. मनोभावें कहाणी सांगितली, चित्त भावें त्यान ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, “बाई बाई! कहाणी ऐकल्याचं एवढं फळं, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा.” ” तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील,” उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही.” तेव्हां वसा सांगितला.

पुढं दुसर्‍या मजलेस गेली. स्वंयपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हां कहाणीची आठवण झाली. ” करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याच शोध करा.” “उपाशी नाहीं, काही नाही” माळ्याचा मळा पिकत नाहीं, विहिरीला पाणी लागत नाहीं, असा एक माळी चिंतेन बसला आहे त्याला हाक मारली. ‘आमच्या बाईची कहाणी ऐक.” तो आला.

राणीनं सहा मोत्ये घेऊन तीन आपण घेतलीं, तीन माळ्याला दिलीं. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकूं लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, ” बाई बाई! कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा.” मग राणीनं त्याला वसा सांगितला.

पुढं तिसर्‍या मजलेस गेली स्वंयपाक केला. राजाला वाढलं. मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हा कहाणीची आठवण झाली. ” करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” “उपाशी नाहीं, काही नाहीं.” एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनांत गेला होता, एक डोहांत बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता, त्यामुळं चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, ” आमच्या बाईची कहाणी ऐकू.” ती म्हणाली, ” कहाणी ऐकून मी काय करूं? मी मुलांसाठी रडते आहें. बरं येते” मग ती राणीकडे आली.

राणीनं पहिल्याप्रमाणं तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनांत गेला होता तो आला. डोहांत बुडाला होता तो आला. सर्पानं खाल्ला होता तो आला. ती म्हणाली,” बाई बाई! कहाणी ऐकल्याचं हें फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा.” मग राणीनं तिलाही वसा सांगितला.

पुढं चौथ्या मजलेस गेलीं. स्वंयपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हां कहाणीची आठवण झाली. “करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” “उपाशी नाहीं, काही नाहीं.” काणा डोळा, मांसाचा गोळा, हात नाहीं, पाय नाहीं, असा एक मनुष्य रस्त्यामध्यें होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उताणा केला.

======

हे देखील वाचा : श्रावणी शुक्रवारचे महत्व, पूजाविधी आणि कथा
======

सहा मोत्ये होतीं. तीन मोत्ये त्याच्या बेंबीवर ठेवलीं, तीन मोत्ये आपण घेतलीं, राणीनं मनोभावे कहाणी सांगितली; ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, “कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला.

पांचव्या मुक्कामाला घरी आलीं. स्वंयपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. साती दरवाजे उघडले. लोहघंगाळं पाणी तापवलं. पड्रस पक्कान्नं जेवायला केलीं. सूर्यनारायण भोजनाला बसले, त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, “अग अग, कोणाच्या पापणीचा केस आहे?” राजाच्या राणीला बारा वर्षं दरिद्र आलं होतं. तिनं आदितवारीं वळचणीखालीं बसून केस विंचरले. “काळं चवाळं, डोईचा केंस, वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे.” राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला, तसा कोणाला होऊ नये.

ब्राह्मणाला, मोळीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा मांसाचा गोळा, इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा होवों. ही साठां उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.