Home » मराठीमधील हजरजबाबी नट राजा गोसावी

मराठीमधील हजरजबाबी नट राजा गोसावी

by Correspondent
0 comment
Raja Gosavi | K Facts
Share

राजाराम शंकर गोसावी म्हणजे राजा गोसावी यांचा जन्म २८ मार्च १९२५ रोजी सिद्धेश्वर कुरोलीचा-खटाव तालुक्यात झाला. राजा गोसावी हे  मराठीतले नाट्य-चित्रपट अभिनेते तर होतेच परंतु ते प्रचंड हजरजबाबी होते. खरे तर त्यांना मराठीमधील डॅनी के असे म्हटले जाते. प्रफुल्ल पिक्चर्समध्ये त्यांनी आधी ऑफिस बॉयचे,  नंतर सुतारकाम केले पुढे मेक-अप, प्रकाश योजना आदी खात्यांत काम करत ते ’एक्स्ट्रा’ नट बनले. दामुअण्णा मालवणकर यांच्या प्रभाकर नाट्य मंदिरात ते ’प्रॉम्प्टर’ झाले. त्यांना ’भावबंधन’ या नाटकात रखवालदाराची भूमिका मिळाली. तीच त्यांची नाटकातली पहिली भूमिका. नंतर ते पुण्याच्या भानुविलास चित्रपटगृहात चित्रपटाची तिकीटबारीवर तिकिटे विकायचे काम करू लागले

त्यांनी भूमिका केलेला पहिला मराठी चित्रपट ’अखेर जमलं’ आणि ’लाखाची गोष्ट’ जेव्हा पुण्यातल्या भानुविलास चित्रपटगृहात लागले, तेव्हाही राजा गोसावींनी आपल्याच चित्रपटाची तिकिटे विकली होती. लाखाच्या वेळची गोष्ट आहे हा चित्रपट खूप चालला म्हणून त्यांनी राजा परांजपे याना विनंती केली की मी ह्या चित्रपटात जो कोट घातला होता तो मला द्याल का ? राजाभाऊंनी तो कोट राजा गोसावी याना दिला. राजा गोसावी यांनी तो कोट शेवटपर्यंत जपून ठेवला होता.

राजा गोसावी (Raja Gosavi) यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले असले तरी त्यांच्या शब्दांत ते स्वतःला बी.ए. म्हणजे ‘बॉर्न आर्टिस’ समजत.  ते सुरुवातीला कामगार म्हणून नाट्य क्षेत्रात शिरले. मराठी सिनेमात निरोगी विनोदाची मुहूर्तमेढ मास्टर विनायकांनी रोवली असली, तरी ती पुढे समर्थपणे चालवली राजा गोसावी यांनी. राजा गोसावी खर्‍या अर्थाने चतुरस्र कलावंत होते. त्यांनी रंगविलेला मध्यमवर्गी, शहरी नायक रसिकांना मनापासून भावला. त्यांच्या चित्रपटाची घोडदौड एकोणीसशे पन्नासच्या दशकापासूनच सुरू होती. त्यांचा बोलबाला एवढा होता की, १९५८ मध्ये पुण्याच्या बाबुराव गोखलेंनी राजा गोसावीला तिहेरी भूमिकेत चमकवत  ‘राजा गोसावीची गोष्ट’ नावाचा चित्रपटही काढला होता. ठाण्यातील नाटककार, लेखक शशिकांत कोंनकर यांच्या ‘हनिमून एक्सप्रेस’ ह्या नाटकात त्यांनी काम केले होते.

Raja Gosavi

ते म्हणत की राजा गोसावी एकदा रंगमंचावर आले की जी धमाल उडायची त्याचे  शब्दात वर्णन करू शकत नाही. ज्यांनी ज्यांनी ते नाटक बघीतले आहे, त्यांनाच ते माहीत असेल. एकदा तर नाशिकला ‘हनिमून एक्सप्रेस’ चा प्रयोग चालू असताना लोकांनी पैसे उधळले होते. अशी घटना मराठी नाटकाच्या बाबतीत कदाचित आधी घडली नसावी. त्या नाटकाबद्दल सुप्रसिद्ध समीक्षक मंगेश तेंडुलकर यांनी राजा गोसवीचे उत्तम नाटक म्ह्णून प्रशंसा केली होती. एका चित्रपटाच्यावेळी राजाभाऊ चरित्रअभिनेता अशोककुमार बरोबर काम करत होते. अशोककुमार समोर म्हटल्यावर  त्याच्यावर थोडे दडपण आले तेव्हा अशोककुमार त्यांना म्हणाले ‘ गोसावी एक लक्षात ठेव समोरचा कितीही कलाकार मोठा असला तरी तो आपल्यासमोर कस्पटाप्रमाणे समजून काम करावे, म्हणजे दडपण येत नाही’. हा कानमंत्र राजा गोसावी यांनी आयुष्यभर लक्षात ठेवला.

ठाण्याला मो.ह. विद्यालयाच्या खुल्या रंगमंचावर त्यांचे वरचा मजला रिकामा हे नाटक होते. कारण त्यावेळी गडकरी रंगायतन बांधले नव्हते, नाटक सुरु झाल्यानंतर काही वेळात जोराचा पाऊस सुरु झाला. आम्ही  सगळे डोक्यावर खुर्च्या घेऊन नाटक बघत होतो परंतु पाऊस खूपच पडू लागला. तेव्हा नाटक थांबवले. असे एकदोनदा झाले. परंतु राजाभाऊंनी दोनदा नाटक परत सुरु केले ते त्याच डायलॉगवर. हे मला खूप महत्वाचे वाटले. शेवटी पावसामुळे ते नाटक बंद झाले. तरी पण ते काही वेळ लोकांशी मस्तपणे गप्पा मारत होते.

राजा गोसावी यांनी सुमारे २६ नाटकातून कामे केली होती त्यांची  काही नावे अशी आहेत  उधार उसनवार, एकच प्याला, कनेक्शन, करायला गेलो एक, कवडीचुंबक,घरोघरी हीच बोंब, डार्लिंग डार्लिंग, तुझे आहे तुजपाशी ,नटसम्राट,नवरा माझ्या मुठीत गं, नवर्‍याला जेव्हा जाग येते, पुण्यप्रभाव , प्रेमसंन्यास, भाऊबंदकी, भावबंधन,भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी, वरचा मजला रिकामा,  संशयकल्लोळ, हा स्वर्ग सात पावलांचा इत्यादी . त्यांची अनेक नाटके, चित्रपट आहेत परंतु बोलता बोलता कोट्या करणे त्या सुद्धा काही क्षणात हा हजरजबाबी पणा स्टेज वर अनेक वेळा दिसून येत असे.

Raja Gosavi

त्याचप्रमाणे त्यांनी सुमारे २४ ते २५ चित्रपटातून कामे केली त्यातील काही चित्रपटांची नावे अशी आहेत  अखेर जमलं, अवघाची संसार, आंधळा मागतो एक डोळा, आलिया भोगासी, उतावळा नवरा, कन्यादान, काका मला वाचवा, कामापुरता मामा, गंगेत घोडं न्हायलं, गाठ पडली ठकाठका, गुरुकिल्ली, चिमण्यांची शाळा, देवघर, दोन घडीचा डाव, पैशाचा पाऊस, बाप माझा ब्रह्मचारी, येथे शहाणे राहतात, लग्नाला जातो, लाखाची गोष्ट,  वरदक्षिणा, वाट चुकलेले नवरे, सौभाग्य, हा खेळ सावल्यांचा इत्यादी. प्रत्येक नटाची एक मनातली इच्छा असते की आपण नटसम्राट नाटक करावे . राजा गोसावी यांनी नटसम्राटमध्ये सुप्रसिद्ध गणपतराव बेलवलकरांची भूमिका समर्थपणे केले. त्याचप्रमाणे १९९५ साली बारामती यथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्याचा शेवटही रंगमंचाची सेवा करतानाच झाला.

राजा गोसावी यांना २८ फेब्रुवारी १९९८ रोजी नाटकाची तयारी करताना मेकअपच्या खोलीतच चेहर्‍याला रंग लावताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

-सतीश चाफेकर


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.