पद्मश्री पुरस्काराने गौरविलेले डॉ. मोहन आगाशे हे 23 जुलै रोजी 73 वर्ष पूर्ण करीत आहेत. डॉ. आगाशे हे मानसोपचारतज्ञ… तरीही हा माणूस रंगभूमीवर रमला… कायम नेपाळी गुरखा टोपी घालणा-या आगाशे यांचा सगळा प्रवासच विलक्षण आहे…
अभिनयाचा महामेरु…
डॉ. मोहन आगाशे… हे नाव आलं की समोर येतं ते घाशिराम कोतवाल नाटक. जैत रे जैत मधला नाग्या… अग्निहोत्र मालिकेतील शिस्तबद्ध अप्पा… अशाच दर्जेदार भूमिका रंगवणारे मोहन आगाशे… डॉ. आगाशे. पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्था… उत्तम मानसशास्त्रज्ञ… समोर वैद्यकीय क्षेत्रातलं उज्ज्वल यश दिसत असून हा माणूस रंगभूमीच्या प्रेमात पडला. नुसता प्रेमात पडला नाही तर रसिकांना अनेक दर्जेदार नाटकं, चित्रपट त्यांनी दिले. मोहन आगाशे म्हणजे हौशी व्यक्तिमत्व… नेहमी नेपाळी गुरखा टोपी घालणा-या आगाशेंच्या सर्वंच भूमिकांचा मागोवा घेतला तर कदाचित एक सविस्तर लेखमाला चालवावी लागेल… कारण प्रत्येक भूमिकेत त्यांनी वेगळे रंग भरलेत. मराठी बरोबर हिंदीमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.
सामना, जैत रे जैत, सिंहासन, वळू, देऊळ या चित्रपटांचा आणि त्यात मोहन आगाशे यांनी केलेल्या भूमिकांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. वास्तविक रंगभूमीच्या प्रेमात असलेले आगाशे आणि घाशीराम कोतवाल या नाटकाचे अनोखे नाते आहे. तब्बल वीस वर्ष त्यांनी हे नाटक केलं. बेगमबर्वे, सावररे, काटकोनत्रिकोण, अत्यंत सशक्तपणे सादर करणारे मोहन आगाशे यांचा मुळ व्यवसाय इथे कामी आला. आगाशे हे डॉक्टर.. पुण्याच्या बी.बी.जे. मेडीकल कॉलेजमधून त्यांनी एमबीबीएस केलं. त्यानंतर मानसोपचार शास्त्रात पीएचडी केली. डॉ डीएन नंदी हे देशातील मान्यवर मानसोपचारतज्ञ त्यांचे मार्गदर्शक होते. पुण्यातील भॉय जीजीभॉय वैद्यकीय महाविद्यालयात आणि ससून रुग्णालयात मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. महाराष्ट्र मानसिक स्वास्थ्य संस्थेचे ते संस्थापक आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी आज देशात आणि परदेशात मानसोपचारतज्ञ म्हणून काम करत आहेत.
1993 मध्ये लातूर मध्ये झालेल्या भूकंपानंतर भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदने मोठे काम केले. आगाशे या प्रोजेक्टचे प्रमुख म्हणून काम पहात होते. मानसोपचारतज्ञ म्हणून त्यांचे काम चालू असतांनाच रंगभूमीवरही त्यांचा वावर सुरु होता. फार नाही पण नाटकात त्यांची भूमिका असायची. जब्बार पटेल त्यांचे मित्र… एखादं नवीन नाटक बसवण्याचा ही मंडळी प्रयत्न करीत होती. त्यांना विजय तेंडूलकरांनी एक स्क्रिप्ट दिली. हे होतं घाशिराम कोतवाल नाटक… या नाटकांनं इतिहास केला. स्वतः मोहन आगाशे या नाटकाबरोबर वीस वर्ष जोडले गेले. त्यानंतर रंगभूमी आणि चित्रपटात त्यांचा मुक्त वावर सुरु झाला. सुनसान, मंथन, फस्ट बाईट, अस्क, मिसिसिपी मसाला, द परफेक्ट मर्डर, सरपंच भागिरथ, गारंभीचा बापू, एक होता विदुषक, फिर, भूमिका, शर्वरी, जॉली एल एल बी, डान्स लाईक अ मॅन, विहीर, जोर, पर, धुरंधर भाटवडेकर, अकल्पित, मशाल, निशांत, वळू, लॉस्ट अॅँण्ड फाऊंड, सिंहासन, गुडीया, सद्गती, हू तू तू, असंभव, द फायर अॅण्ड द रेन, डॉ. प्रकाश आंबेडकर, रंग दे बसंती, दऊळ, देवराई, गन्स ऑफ बनारस, रिहाई, पाप, सामना, देऊळ बंद, आक्रोश, त्रिमुती, ट्रेन टू पाकिस्तान, गंगाजल, ये है इंडीया, जैत रे जैत, अस्तु, अब तक छप्पन, अब तक छप्पन-2, कासव, मृत्यूदंड, 706, अपहरण हा असा त्यांचा हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील मुक्त प्रवास…
छोट्या पडद्यावरही मोहन आगाशे यांचा दबदबा राहीला. अग्निहोत्र, एका लग्नाची तिसरी गोष्ट, गुंतता ह्रदय हे, रुद्रम अशा मालिकांमधून मोहन आगाशे छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरले. एफ.टी.आय.आय. या संस्थेचे संचालक म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
त्यांच्या कारकीर्दीमधील सामना, सिंहासन, जैत रे जैत, मंदिर,वळू या चित्रपटांचा मागोवा घेणयाचा प्रयत्न केला तरी आगाशे यांच्या अभिनयतील विविधतेचा कल्पना येते.
मारुती कांबळेचं काय झालं.. हा प्रश्न घेऊन मोहन आगाशेंचा आलेला चित्रपट सामनाही तिकीट खिडकीवर चांगलाच चालला. जब्बार पटेल हे या चित्रपटाचे दिग्दर्शक. रामदास फुटाणे निर्माते… तर विजय तेंडूलकरांची कथा. 18 एप्रिल 1975 रोजी आलेल्या या चित्रपटाला भास्कर चंदावरकर यांनी संगित दिलं. यात निळू फुले, श्रीराम लागू, स्मिता पाटील, उषा नाईक हे प्रमुख कलाकार… यात मोहन आगाशे अगदी काही मिनिटासाठी आहेत.. एका लंगड्या जवानाची भूमिका त्यांची आहे… एका खुनाचा शोध घेण्यासाठी हा जवान गावात फिरतोय… मग तोच गायब होतो… आणि उरतो एकच प्रश्न मारुती कांबळेचं काय झालं. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे… या टोपीखाली दडलंय काय… सख्या रे घायाळ रे हरिणी… अशा एकापेक्षा एक गाण्यांनी गाजलेला हा चित्रपट भारतातर्फे बर्लिन चित्रपट महोत्सावात गेला.
जैत रे जैत हा चित्रपट म्हणजे चिरतरुण… कधीही पाहिला तरी त्यात गुंतवूऩ ठेवणारा. 1977 मध्ये आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल. ना. धों. महनोर यांच्या गीतांना ह्दयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलं. कथा गो. नी. दांडेकर यांची. खालापूर येथील एका ठाकर वस्तीत या चित्रपटाचं प्रत्यक्ष चित्रिकरण झालं. जैत रे जैत म्हणजे गाणी आणि अभिनयाची अप्रतिम मेजवानी. यातली नभ उतरु आलं… जांभूळ पिकल्या झाडाखाली… आम्ही ठाकर ठाकर… ही गाणी आजही पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात. स्मिता पाटील, मोहन आगाशे, निळू फुले, सुलभा पटवर्धन यांच्या प्रमुख भूमिका यात आहेत. नाग्या हा ठाकरवाडीच्या भगताचा मुलगा. रांगडा गडी… बेधुंद होऊन ढोल वाजवणारा… मध गोळा करण्याचं त्याचं काम. त्याला एकदा राणी मावशी चावते. त्यात त्याचा एक डोळा निकामी होतो. त्यामुळे त्याला लिंगोबाच्या डोंगरावर जाऊन राणी माशीला मारायचे आहे. हा तरणा नाग्या चिंधीच्या प्रेमात पडतो. या चिंधीला तिच्या नव-यानं सोडून दिलीय. ही चिंधी नाग्याच्या प्रेमापोटी त्याला मदत करते.. नाग्या लिंगोबाच्या डोंगरावर चढतो… आणि राणी माशीला मारतो… पण त्याच्या चिंधीला गमावतो… नाग्या, म्हणजेच मोहन आगोशे यांची अप्रतिम भूमिका आहे. रांगडा, एका डोळ्याला पट्टी बांधून आदिवासींसारखा वावरणारा नाग्या रंगवणं मोहन आगाशेंसाठी आव्हान होतं. कारण पुण्यासारख्या शहरात वाढलेले आगाशे… त्यात डॉक्टर… आदिवासी बोली… आणि ठाकर वस्तीमधलं शूट… मोहन आगाशे यांच्यातील कलाकाराचा इथे कस लागला. त्यांनी जैत रे जैत मध्ये हा नाग्या जिवंत केला… आजही हा चित्रपट मोहन आगाशे, स्मिता पाटील यांच्या अभिनयासाठी पाहिला जातो..
सिंहासन हा चित्रपट मोहन आगाशे यांच्या कारकिर्दीमधला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. 1979 मध्ये आलेल्या या चित्रपटात त्यांची भूमिका छोटी होती. पण त्याकाळी सिंहासन हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. दिग्दर्शक जब्बार पटेल, अरुण साधू यांची कथा आणि पटकथाकार विजय तेंडूलकर या मराठी चित्रपट सृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट देणा-या त्रिकुटाच्या सिंहासनला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यात श्रीराम लागू, निळू फुले, अरुण सरनाईक, सतिश दुभाषी, मधुकर तोरडमल, रिमा लागू, नाना पाटेकर, श्रीकांत मोघे यांच्या भूमिका आहेत. यात मोहन आगाशे यांनी बुधाजीराव ही भूमिका साकारली आहे… हा बुधाजी बेरकी आहे. आपला फायदा कशात आहे. याचा अंदाज घेऊन चालणारा… या छोट्या भूमिकेतही मोहन आपटे यांनी स्वतःची छाप सोडली आहे.
कुसवडे गावात एक डुरक्या नावाचा बैल उधळतो… या बैलाला पकडण्यासाठी एका फॉरेस्ट ऑफीसरला पाठवण्यासाठी येतो.. मग हा वळू आणि तो ऑफिसर यांचा खेळ सुरु होतो. त्यात कुसवडे गावच्या सरपंच, पाटील यांच्यापासून सर्वजण सामिल होतात… उमेश कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात मोहन आगाशे सरपचांच्या भूमिकेत आहेत. 25 जानेवारी 2008 रोजी आलेला हा हलकाफुलका चित्रपट चांगला लोकप्रिय झाला. त्यात गावातल्या सरपंचाची अस्सल भूमिका मोहन आगाशे यांनी साकारली आहे. छोटेखानी संवाद आणि मोहन आगाशे यांचा परिपक्व अभिनय यामुळे वळूही कधिही बघितला तरी कंटाळवाणा वाटत नाही.
उमेश कुलकर्णी यांनी 4 नोव्हंबर 2011 रोजी आणखी एक चित्रपट आणला, देऊळ नावाचा. गिरीश कुलकर्णी, नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात देवळाभोवती फिरणा-या गावचे राजकारण, अर्थकारण गुंफण्या आले आहेत. यात मोहन आगाशे आमदार म्हणून दिसतात. गावच्या पुढा-याला राजकारणाचे डावपेच ते शिकवतात. ही सुद्धा काही मिनिटांची भूमिका… दोन-चार सडोतोड वक्तव्य… पण त्यातही मोहन आगाशेंचा अंदाज बघण्यासारखाचा…
डॉ. मोहन आगाशे आज वयाच्या 73 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या वयातही डॉक्टरॉंकडे भूमिकांचा ओघ चालू आहे. आता अलिकडे ते पुन्हा रंगभूमीकडे वळले आहेत. हा माणूस सदैव गुंतलेला… मग ते नाटक असो… चित्रपट असो… की एखादी मालिका असो… यात मोहन आगाशे आपलं सर्व कसब लावतात… कधी खलनायक म्हणून तर कधी एखादी हास्य कलाकाराची भूमिका करुन… त्यांच्या चिरतारुण्याचे हेच वैशिष्ट्य आहे. या ज्येष्ठ अभिनेत्याला लाखो शुभेच्छा….
सई बने….