अयोध्येत होणारे राममंदिर पुढील वर्षी मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर भक्तांसाठी खुले होणार आहे. मात्र आतापासूनच या सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या 23 एप्रिल रोजी प्रभू श्री रामांना जगभरातील 155 देशातील पाण्यापासून अभिषेक घालण्यात येणार आहे. यामध्ये पाकिस्तानमधील रावी नदीच्या पाण्याचाही समावेश आहे. राम मंदिरात पाकिस्तान, चीन, इराण, अरब देश, अमेरिकेसह 155 देशांतील नद्यांचे पाणी अर्पण करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत होणा-या या कार्यक्रमात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि योगगुरू रामदेव सहभागी होणार आहेत. याशिवाय देशभरातील मान्यवर संत-साधूही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्याबाबत श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री राम मंदिराची पायाभरणी केली, त्यावेळी देशभरातून सुमारे 1000 ठिकाणाहून पाणी आणण्यात आले होते. आता प्रभू रामांच्या अभिषेकासाठी 155 देशातून पाणी आणण्यात आले आहे. या पवित्र नद्यांचे पाणी अयोध्येत मोठ्या श्रद्धेनं आणण्यात आले आहे. भाजप नेते डॉ. विजय जॉली यांच्या पुढाकारानं हे काम करण्यात आले. साधारण ऑगस्ट 2020 पासून जगभरातील पवित्र नद्यांचे पाणी जमा करायला सुरुवात केली. कोरोनाच्या काळातही ही योजना थांबली नाही. जगातील 155 देशांतून पाणी गोळा करण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओ फिल्मही बनवण्यात आली आहे. हा व्हिडिओ 23 एप्रिल रोजी दाखवण्यात येणार आहे. प्रत्येक देशातून पाणी आणल्यानंतर ते हरिद्वारच्या पायथ्याशी असलेल्या तांब्याच्या भांड्यात बंद करुन ठेवण्यात आले आहे. प्रत्येक पाण्याच्या तांब्यावर त्या देशाचे नाव आणि त्या देशाचा ध्वजही लावण्यात आला आहे. या सर्वात पाकिस्तानमधील रावी नदीतून पाणी आणण्यासाठी खास परिश्रम करावे लागले. त्यासाठी पाकिस्तानमधील काही हिंदूनी मदत केली. यासाठी त्यांना त्रासही सहन करावा लागला. पण हे रावी नदीचे पाणी त्यांनी दुबईला पाठवले. त्यानंतर दुबईहून ते भारतात आणण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. ताजिकिस्तानचे मुस्लिम सहकारी ताज मोहम्मद, कॅनडातील शीख बांधव आणि तिबेटमधील बौद्ध सहका-यांनीही राममंदिराच्या अभिषेकासाठी पाणी पाठवण्यात मदत केली आहे. 23 एप्रिल रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ ‘जल कलश’ची पूजा करतील. या कार्यक्रमात अनेक देशांचे राजदूतही सहभागी होणार आहेत.
अयोध्येतील या भगवान रामलल्लांच्या भव्य मंदिराचा पहिला मजला या वर्षी ऑक्टोबरपर्यंत तयार होणार आहे. जानेवारी 2024 मध्ये रामलल्ला त्यांच्या दिव्य भव्य मंदिरात विराजमान होतील. जानेवारी 2024 मध्ये मकर संक्रांतीनंतर प्रभू रामचंद्रांचा त्यांच्या भव्य आणि दिव्य मंदिरात अभिषेक केला जाईल. यादरम्यान मंदिरात मोठा कार्यक्रमही होणार आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन विधी पार पडला आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. मंदिर संकुलात सूर्य, गणेश, शिव, दुर्गा, विष्णू आणि ब्रह्मा या देवतांना समर्पित देवस्थानांचा समावेश असेल. या राममंदिराची प्रतीक्षा देशातीलच नव्हे तर परदेशातील रामभक्त करीत आहेत. एकीकडे पुढील वर्षी होणा-या लोकसभेच्या निवडणुका आणि राममंदिर यांचा संबंध विरोधक लावत आहेत. मात्र याचा काहीही परिणाम न होता अयोध्येत मात्र राममंदिराच्या निर्माण कार्यात मोठा उत्साह आलेला आहे. काही दिवसांपूर्वीच या रामंदिराच्या गर्भारगृहासाठी महाराष्ट्राताली चंद्रपूर येथून खास लाकूड पाठवण्यात आल्याची माहिती आहे. राममंदिराची उभारणी ही अत्यंत आधुनिक पद्धतीनं करण्यात येत आहे. पुढील हजार वर्ष तरी मंदिरात कुठलिही दुरुस्ती करावा लागणार नाही याची काळजी घेतली जात आहे. प्रभू रामचंद्र आणि माता सिता यांच्या मुर्ती करण्यासाठी नेपाळहून खास शिळा आणण्यात आल्या आहेत.
========
हे देखील वाचा : AI चॅटबॉट तुम्हाला फसवू शकतात, वापरण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जरुर वाचा
========
फक्त राममंदिरच नाही तर उत्तरप्रदेश सरकारतर्फे हा संपूर्ण परिसर विकसित करण्यात येत आहे. अयोध्येत विमानतळ आणि रेल्वेस्थानकही हायटेक करण्यात आले आहे. तसेच येणा-या हजारो भाविकांना राहण्यासाठी योग्य सुविधा असेल याचीही काळजी घेण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच अयोध्येत हेलिकॉप्टरवरुन सफर करण्याची संधीही भाविकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एकूण पुढील वर्षी होण-या राममंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आतापासूनच अयोध्यानगरी सजू लागली आहे.
सई बने