Home » अभिजित सावंत कुठे गंडला ?

अभिजित सावंत कुठे गंडला ?

by Team Gajawaja
0 comment
Abhijeet Sawant
Share

लोकं बिगबॉस मधे का जातात? कोण म्हणतं नाव कमवायला, कोण म्हणतं पैसे कमवायला  तर कोण म्हणतं अशा एका टप्प्यावर लोक बिग बॉसमध्ये जातात जिथे करिअरला ब्रेक लागलेला असतो. आता गल्लत करू नका  करिअरमध्ये ब्रेक मिळतो तो वेगळा आम्ही म्हणतोय करिअरला ब्रेक लागण्याबद्दल हां आता तुम्हाला हळूहळू लक्षात येऊ लागलंच असेल. हळूहळू नावं, चेहरे तुम्हाला आठवायला, दिसायला लागले असतील थोडक्यात मी आत्ताच्या मराठी बिगबॉस मधल्या अभिजित सावंत बद्दल बोलते आहे हे तुमच्या लक्षात आलच असेल तर आज पाहूया या पहिल्या इंडियन आयडॉलच्या करिअरला नेमका ब्रेक कुठे लागला? (Abhijit Sawant)

तर सुरुवात करूया आधी ब्रेक मिळण्यापासून आणि मग ब्रेक लागण्यावर येऊ आपल्या सगळ्यांना इंडियन आयडॉल या गाण्याच्या एका रियलिटी शो बद्दल माहितीच असेल.आता या शो च्या कंटेंटचा एकूण कचरा झालेला आपण पाहतो. याच काय कोणत्याही रियलिटी शो चा नंतर कचराच होतो पण इंडियन आयडॉल या रियलिटी शोचा पहिला सिझन भारी गाजलेला सोबतच शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धकसुद्धा प्रचंड लोकप्रिय झाले होते. मराठमोळा स्पर्धक अभिजित सावंत या शोच्या पहिल्या सीजनचा विजेता ठरला होता. आता पहिलाच सिझन त्यात पहिला विजेता म्हणजे खरतर कसला हटके करिअर ग्राफ वरच्या दिशेने जायला हवा होता या पोराचा पण मग अडलं नेमकं काय आणि कुठे? अभिजित सावंत गेला कुठे?

इंडियन आयडॉल’च्या पहिल्या सीजनचा विजेता बनून अभिजीतने नवा इतिहास रचला होता. या शोमुळे अभिजीत सावंत रातोरात स्टार बनला होता. पण त्याचं स्टारडम फार काळ टिकू शकलं नाही. शोच्या काही वर्षांनंतर तो केव्हा आणि कुठे गायब झाला हे लोकांना कळलंही नाही. अभिजीत सावंत हा मूळचा अस्सल मराठी मुलगा त्याचा जन्म 7 ऑक्टोबर 1981 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला होता पण तो होता मुळचा मुंबईचा. अभिजीतला गाण्याची आवड होती. आणि याला कारण होतं अभिजीतचे काका. ते एका संगीत पार्टीचे सहकारी होते आणि स्टेज शो मध्ये गायचे. त्यांचं सुरूवातीपासूनच अभिजित या क्षेत्राकडे वळला. घरच्यांना अभिजीतने सांगितलच नव्हतं की त्याला संगीत क्षेत्रात काम करायचं आहे घरचे त्याला सपोर्ट करतील याबद्दल काहीच शाश्वती नव्हती पण अभिजितच्या काकांनी त्याला या क्षेत्रातले बारकावे आणि संधी दाखवून दिल्या होत्या. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये अभिजित दणकेबाज गायचा, मुलाचं वेड बघून वडिलांनी अभिजीतला सपोर्ट करायचा निर्णय घेतला. संगीत क्लास वैगरे सगळं केलं आणि अभिजितला या क्षेत्रात काम कर म्हणून प्रवृत्त केलं.(Abhijeet Sawant)

तो साधारण २१ वर्षांचा असेल जेव्हा त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू होतं. सोबतच गाणं ही सुरू होतं. अभिजितला तेव्हा म्युजिकमध्येच करिअर करायचं होतं, पण ते तितकंच अवघड पण होतं. तो त्यावेळी गणपती आणि नवरात्री उत्सवात गाणी म्हणायचा छोट्या छोट्या सोसायटीज मध्ये जाऊन तो त्याचे शो करायचा. या शोजमधून त्याची थोडीफार कमाई व्हायची आणि गाणं शिकण्यासाठी जी फी लागायची त्या फीची सुद्धा सोय व्हायची. एक दिवशी मुंबईतल्या दादरमध्ये कसल्या तरी ऑडिशन्स सुरु होत्या. नेमका हा शो कुठला असणारे, कुठे लागणारे काहीच माहीत नव्हतं. नंतर गाण्याशी रिलेटेड काहीतरी आहे हे एवढच अभिजीत आणि त्याच्या सोबतच्या मित्रांना कळलं आणि ते तिथे ऑडिशन द्यायला आलेल्यांच्या गर्दीत थांबले, लाइन लाऊन उभे राहिले हळूहळू एक एक करत, कंटाळून अभिजित चे सगळे मित्र तिथून निघून गेले. पण अभिजितने ठरवलंच होतं की ही ऑडिशन देऊन बघायची त्याने त्यावेळी जिद्द दाखवली आणि एका झटक्यात आयुष्य बदललं.

इंडियन आयडॉलचा पहिला शो इतका लोकप्रिय होईल असं कल्पनेत सुद्धा वाटलं नव्हतं. अभिजित शो जिंकल्यावर घरी जेव्हा आला होता तेव्हा तो जिथे राहायचा त्या छोट्याश्या बीएमसी क्वार्टरच्या बाहेर खूप गर्दी जमली होती. जणू काही भारताने पाकिस्तानला हरवलंय आणि कोणीतरी क्रिकेटर तिथे येऊन बसलाय. लोकांनी ढोल ताशे आणि बँड आणला होता. त्याच्या घराबाहेर एक छोटं ग्राऊंड होतं तिथं लोकांनी गर्दी केली होती. कॉलनी, सोसायटीच्या लोकांना सोडून बाहेरून बरेचसे लोक आले आले होते. एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं. अभिजित सावंतची अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान सारख्या दिग्गजांनी सुद्धा त्याकाळी स्तुती केली होती. पण मग माशी नक्की शिंकली कधी आणि नेमकी कुठे? (Abhijeet Sawant)

इंडियन आयडॉलनांतर अभिजीत सावंत काही अल्बममध्ये झळकला होता. अभिजीत सावंतचा पहिला अल्बम ‘आप का अभिजीत’ होता जो 2005 साली आला होता. यामध्ये ‘मोहब्बतें लुटाऊंगा ’ आणि ‘लफ्जों में कह ना सकू’ ही त्याची गाणी तुफान लोकप्रिय ठरली होती. यानंतर अभिजीतचा दुसरा म्युझिक अल्बम म्हणजेच ‘जुनून-अभिजीत सावंत’ हा अल्बम सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या अल्बमचा ‘जुनून’ हा टायटल ट्रॅक लोकांना प्रचंड आवडला होता. 2005 मध्ये अभिजीतने ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून पार्श्वगायनात पदार्पण केलं होतं. यामध्ये त्याने ‘मरजावां मिटजांवां’ हे गाणं गायलं होतं.

संधी मिळत होत्या पण हव्या तश्या आणि हव्या तितक्या नाही. म्हणून मग तो परत रियालिटी शो कडे वळला, जिंकलाही. पूर्ण आशियात गाजलेल्या आशिया आयडॉलमध्ये अभिजीतने ३ रा क्रमांक पटकावला होता. पण त्याचा त्याला हवा तसा गाजा वाजा झाला नाही फक्त गायनात यश मिळत नाही म्हणून अभिजीतने अभिनय, डान्स, अँकरींग, कॉमेडी सर्कस असं बरच काम केलं. ‘इंडियन आयडॉल’ जिंकल्यानंतर अभिजीतने पत्नी शिल्पासोबत ‘नच बलिये-4’ या डान्स शोमध्ये सहभागी झाला होता. अनेक रिऍलिटी शोमध्ये भाग घेतल्यानंतर, अभिजीतने 2009 मध्ये बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केलं होतं. ‘लॉटरी’ हा त्याचा पहिला सिनेमा होता जो बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. (Abhijeet Sawant)

=================

हे देखील वाचा : Big Boss एवढं हीट का आहे ?

================

यानंतर तो अक्षय कुमारच्या ‘तीस मारखां’मध्ये एका छोट्या भूमिकेत दिसला होता. पण यावेळीही त्याला हवं तसं यश मिळालं नाही. थोडक्यात सगळं ट्राय करत राहण्याच्या नादातच त्याचा गाण्याचा सूर हरवला फक्त गाण्यावर फोकस न करता अभिजीत जे क्षेत्र दिसेल आणि आवडेल तिथे जात राहिला आणि गंडला. पूढे अभिजित सावंत शिवसेनेमध्ये गेला. शिवसेनेने त्याला तिकीटही दिलं होतं कारण तेव्हा अभिजीत सावंतची भरपूर क्रेझ होती तो शिवसेनेत आला तर तरुण लोकं शिवसेनेकडे वळतील हा हेतू होता पण अभिजित तिथंही विशेष काही करू शकला नाही. 2010 मध्ये एकदा मित्रांसोबत कारमधून फेरफटका मारताना त्याची कार एका स्कुटरला धडकली होती. यावेळी अभिजीतसुद्धा कारमध्ये उपस्थित होता. या प्रकाराने जमलेल्या जमावाने अभिजीतलासुद्धा चोप दिला होता. ज्यामुळे त्याची इमेज फारच खराब झाली होती.

अभिजीत सावंतचा फकिरा नावाचा आलेला तो अल्बमही विशेष जादू दाखवू शकला नाही. नंतर तर त्याने इतक्या रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता की तेव्हा पासून अभिजीतने कानाला खडाच लावला की परत तो कुठल्याही रियालिटी शोमध्ये दिसणार नाही. पण आता बिग बॉसच्या निमित्ताने अभिजित पुन्हा चर्चेत आहे.. तुम्हाला काय वाटतं, त्याच्या आयुष्याच्या या टप्प्यावर आलेला बिग बॉस सारखा रियलिटी शो, टर्निंग पॉइंट ठरणार का? अभिजितला त्याचा गेलेला स्टारडम परत मिळणार का ? (Abhijeet Sawant)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.