वयाच्या अठराव्या वर्षी ‘फेमिना मिस इंडीया’ आणि त्यापाठोपाठ जिंकलेलं ‘मिस युनिव्हर्स १९९४’ चं विजेतेपद. ही सुंदरी कोण, हे सांगायला नकोच. ही आहे सुष्मिता सेन! पाच फूट, नऊ इंच अशी उंची लाभलेली बंगाली सुंदरी बघता बघता लोकप्रियतेच्या शिखरावर गेली. मॉडेलिंग आणि त्यापोठोपाठ हिंदी चित्रपटातही तिची इंट्री झाली. अगदी मोजक्या हिंदी चित्रपटात सुष्मिता झळकली. मात्र ती इथे फार रमली नाही. अभिनयाची उत्तम जाण असलेली ही अभिनेत्री काही काळासाठी पडद्यापासून दूर झाली. हिंदी चित्रपटसृष्टीने काहीशी उपेक्षिलेली सुष्मिता ओटीटी माध्यमावर मात्र आपल्या अभिनयाच्या खणखणीत नाण्यामुळे राणी ठरली आहे.
मिस युनिव्हर्स झाल्यानंतर सुष्मिताने १९९६ मध्ये ‘दस्तक’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर आगमन केलं. १९९७ मध्ये ‘रत्चागन’ या तामिळ ॲक्शन चित्रपटामध्ये सुष्मिता झळकली. डेव्हिड धवन यांच्या ‘बीवी नंबर 1’ चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला, तर आँखें चित्रपटासाठी सुष्मिताचा समिक्षकांनीही गौरव केला. त्यापाठोपाठ मैं हूं ना, मैं ऐसा ही हूं, मैंने प्यार क्यूं किया?, दुल्हा मिल गया, इ. हिंदी तर, ‘निर्बाक’ नावाच्या बंगाली चित्रपटात काम केले.
हिंदीमध्ये अनेक चांगल्या अभिनेत्री आल्या. पण त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे भूमिका मिळाल्या नाहीत, याची बॉलिवूडमधील ग्रुप, नेपोटीझम, फॅमिली कल्चर, इ.कारणं नक्की असतील, पण सुष्मीता या सगळ्यांमध्ये कायम वेगळी राहीली. एकतर तिची भन्नाट उंची, या उंचीला साजेसा हिरो मिळणं कठीण आणि त्यात तिचा रोखठोक स्वभाव, यामुळे या गुणी अभिनेत्रीला हवा तसा वाव कधी मिळाला नाही. पण ओटीटी माध्यमांनी ही कसर भरून काढली.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुष्मिताची आर्या (Aarya) ही वेबसिरीज आली आणि वेगळ्या रूपातली सुष्मिता पाहून सर्वानाच सुखद धक्का बसला. आर्या सिरीजच्या पहिल्या भागात सुष्मिता मोहात पाडते, तर दुसऱ्या भागात याशिवाय कोणतीही दुसरी अभिनेत्री अशी ‘आर्या’ साकरुच शकली नसती याची खात्री पटते. ‘सेन टू सेनन’ हा बदल सगळ्यांनी आवर्जून पहाण्यासारखा!
Disney+ Hotstar वर जून २०२० मध्ये अक्शन थ्रिलर वेबसिरीज ‘आर्या (Aarya)’ रिलीज झाली. याचे दिग्दर्शकी आहेत राम माधवानी आणि संदीप मोदी तर, सह-दिग्दर्शक आहेत विनोद रावत. ‘पेनोझा’ या डच भाषेतील सिरीजवर आधारित असणारी ‘आर्या’ ही वेबसिरीज एका सर्वसाधारण स्त्रीची कथा आहे.

ही स्त्री कुटुंबवत्सल आहे. मुलांची काळजी घेणं, पतीची मर्जी राखणं हे तिचं काम. पण अचानक तिची सुखी कुटुंबाची चौकट तुटते. तिचा पती माफीया टोळीबरोबर काम करीत असल्याची माहिती तिला मिळते. दुर्दैवानं त्याच वेळी तिच्या पतीची हत्या होते आणि आर्या गुंडाच्या तावडीत एकाकी पडते. पोलीस आणि ड्रग्जपेडरर यांच्यात अडकते.
या सर्वात आपल्या मुलांना वाचवण्यासाठी आर्या आपलं रुप बदलते. ती हातात पिस्तुल घेते. बिनधास्त आणि बेडर होऊन माफीयांवर गोळ्या मारते, पण त्याचवेळी आपल्या मुलांचे मन जपण्यासाठी हळवीही होते.
आर्या (Aarya) सिरीजच्या पहिल्या सिझनला तुफान लोकप्रियता मिळाली आणि त्याचवेळी या दुसऱ्या सिझनची चर्चाही सुरु झाली होती. डिसेंबर २०२१ मध्ये आर्याचा नऊ एपिसोड असलेला दुसरा सिझनही आला आणि पहिल्यापेक्षा अधिक लोकप्रिय झाला.
सुष्मिताच्या अभिनयाचे कौतुक म्हणजे आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांसाठी नामांकनही आर्याला मिळाले आहे. याशिवाय फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तिनं मिळवला.
सुष्मिताही मान्य करते की, तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही आर्याचा परिणाम झाला आहे. ती अधिक खंबीर झाली आहे. सुष्मिता, रेने आणि आलिषा या दोन मुलींची आई आहे. या दोन मुली तिनं दत्तक घेतल्या आहेत. एकटी पालक म्हणून ती या दोघींची अधिक काळजी घेते आणि ‘आर्या’मुळे या दोन मुलींच्या अधिक जवळ आली आहे.
हे ही वाचा: तेजश्री प्रधानचा कौतुकास्पद निर्णय (Tejashri Pradhan)
‘कल हो ना हो’ चित्रपटासंबंधित १३ अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसतील (Kal Ho Naa Ho)
याशिवाय सुष्मिता आणि रोहमन शॉल या तिच्या बॉयफ्रेंडमुळेही चर्चेत राहिली. हा रोहमन सुष्मितापेक्षा पंधरा वर्षांनी लहान आहे. सुष्मिता आणि रोहमनच्या वयामध्ये असलेल्या अंतरामुळे ती अनेकवेळा ट्रोल झाली आहे, पण सुष्मितांने या टिकेकडे कधी लक्ष दिलं नाही.
अलीकडेच या दोघांचं ब्रेकअप झाल्याची बातमीही आली आहे. आता पुन्हा तिच्या नात्याबाबत चर्चा होतील, पण सुष्मिताच्या ‘सेन टू सरीन’ या प्रवासाचा परिणाम तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही झाला आहे. त्यामुळे ती अशा टिकाकारांना पुरून उरेल आणि नव्या अभिनय प्रवासासाठी सज्ज होईल.
– सई बने