Home » असा खेळ ‘मांडू’ दे!

असा खेळ ‘मांडू’ दे!

by Team Gajawaja
0 comment
Source : Google
Share

मनाला रिझवण्यासाठी आपण छंद जोपासतो म्हणजे एक प्रकारचा खेळच मांडत असतो. कुणी रसिक हा खेळ संगीताच्या स्वरांबरोबर खेळतो. तर कुणी पुस्तक, साहित्य वाचून शब्दखेळात रमतो. कुणी खवय्या आपलं जीव्हालौल्य जपत राहतो. तर कुणी मानसीचा चित्रकार निरंतर रंगांच्या कुंचल्यांबरोबर जीवनरंगाशी खेळत राहतो. असाच आमचा ग्रुप जवळपास वीस वर्षांहून अधिक काळ मुक्त भ्रमंतीचा खेळ खेळतो आहे. हा खेळ मांडणारे आम्हीच आणि तो कोणत्या वेशीच्या दारी मांडायचा यावरून शंभरदा वादंग करणारे देखील आम्हीच. ‘डाव मांडून भांडून मोडू नको’ म्हणत यंदाचे खेळाचे ठिकाण ठरले मांडू (Mandu). २० ऑगस्ट २००७, सोमवार, पतेतीची सुट्टी म्हणजे ३ दिवसांची जोड रजा. मग काय सगळ्यांच्या मुखी एकच अभंग खेळ मांडियेला.

शुक्रवारी १७ ऑगस्टला संध्याकाळी अवंतिका एक्सप्रेसने निघालेलो आम्ही शनिवारी १५-२० मिनिटे वेळेआधीच म्हणजे सकाळी ७ वाजता उज्जैनला पोचलो. समोरच्या राम मंदिरात एक धर्मशाळा आहे. रु.१००/- भाड्याने एक खोली घेऊन २ तासात आन्हिके आटपून आम्ही चहा-नाश्ताचा प्रोग्राम उरकून देवळात जायला निघालो. तिथेच तीन दिवसांसाठी भाड्याने कुझर बुक केली व मध्य प्रदेशात मांड मांडला, महाकालेश्वर म्हणजे १२ ज्योतिर्लिंगांमधलं एक. शंकरावरच्या अभिषकाच्या दर्शनाने सुखावलो आणि आश्चर्यकारकरित्या अर्ध्या तासात तिथून निघालो. कारण श्रावणात हे अपेक्षित नव्हतं. फक्त नागपंचमीच्या दिवशी उघडणारं नागचंद्रेश्वराचं दर्शनही व्हीआयपी लाइनमधून घेतले. तिथे मात्र तासभर मोडला. तो देवदुर्मिळ योग होता. बडा गणेश, चिंतामणी गणेश, सांदिपनी ऋषी आश्रम या उज्जैनमधल्या महत्त्वाच्या ठिकाणांना ओझरती भेट देऊन इंदूर मार्गे आम्ही मांडूकडे कूच केलं इंदूरहून ७८ कि.मी. वर असणाऱ्या मांडू इथे पोचायला आम्हांला तशी रात्रच झाली. प्रभातफेरीसाठी बाहेर पडलो तेव्हा एखाद्या सिनेमात पाहायला मिळावं तसं दृश्य मी अनुभवलं.

गडद गर्द हिरवाई, दाट धुकं, त्या नीरव शांततेला सावरत कुणीतरी हिरव्या पानांतून अंग मोडीत जाणारी कातकरीण आणि पर्णा पर्णावर ठिबकणारे जलबिंदू. मांडू दर्शनासाठी आम्ही जेव्हा बाहेर पडलो तेव्हा जवळपास साडेदहा वाजले होते. रात्री २ वाजेपर्यंत ज्या पारावर बसून गप्पा छाटल्या तो पार आता प्रत्यक्ष दिवसा पाहून चकितच झालो. ते वडाचे किंवा पिंपळाचे झाड नसून चक्क एक भलं मोठे चिंचेचं झाड होतं. त्याचं नाव होतं खुरसानी इमली. त्या झाडाच्या बुंध्याचा परीघच मुळात १०.४ मीटर इतका अवाढव्य होता. याची फळे आंबटगोड असून आम्ही ज्या विश्रामगृहात उतरलो त्याच्या आवारातच ते झाड आढळतं. बाकी संपूर्ण मांडूत ते कुठेही नाही. १८ व्या शतकातील फ्रान्समधील प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ एंडरसन यांच्या सन्मानार्थ या झाडाला एडोसोनिया डिजीटोटा हे नामकरण देण्यात आले. हे झाड आफ्रिकेत केनिया, युगाण्डा येथे व ऑस्ट्रेलिया, इराण येथे आढळते. झाडाची साल पांढरट तपकिरी रंगाची असते व फांद्या चित्रविचित्र आकाराच्या असतात. पाने गोलाकार व मध्यम आकाराची असतात. या दुर्मीळ झाडांचे फोटो घेऊन आम्ही मार्गस्थ झालो.

राणी रूपमती महालापासून खऱ्या अर्थाने मांडू दर्शनाला सुरुवात होते. आमच्या आसपास शेकडो पर्यटक मांडू पाहायला आले होते. त्यांपैकी एका ग्रुपबरोबर गाइड होता. त्याच्याकडून बरीच माहिती मिळाली. साधारणतः हजार वर्षापासूनचा मांडूचा इतिहास समजला. त्यामुळे मांडू पाहताना आम्हीदेखील त्या पूर्वीच्या ऐतिहासिक काळातच वावरत होतो. त्याचा इतिहास थोडक्यात असा – साधारण २० स्क्रे. मी. चा परिसर मांडूने व्यापला असून समुद्रसपाटीपासून २००० फूट उंचीवरील हे ठिकाण मांडवगड याही नावाने ओळखले जाते. माळवा पठाराच्या उत्तरेकडचा भाग म्हणजे मांडू आणि त्याच्या समोरील डोंगर रांगांच्या पल्याड निमाटचे पठार आहे. १०व्या शतकात म्हणजे १००० हून अधिक वर्षापूर्वी भोज राजाने या मांडूचा गढीच्या रूपात शोध लावला. पुढे १३०४ मध्ये दिल्लीच्या मोगल सम्राटांनी हा मांडवगड जिंकला आणि माळव्याचा प्रमुख सुलतान दिलावरखान याने मांडवगड हे स्वतंत्र संस्थान प्रस्थापित करून अफगाणी शिल्पशैलीने या मांडवगडावर विविध राजवाडे व महाल बांधायला सुरुवात केली.

सांदिपनी ऋषी आश्रम (Sandipani Ashram)

पूर्वी धार ही या संस्थानाची राजधानी होती जी दिलावरखानचा मुलगा हिशांगशाह याने बदलून मांडूला राजधानीचा दर्जा दिला. हिशांगशाहच्या पुत्राने फक्त वर्षभर सत्ता चालवली असेल. त्यानंतर मुहम्मदशाहने त्याच्यावर विषप्रयोग केला. या मुहम्मदशाहने, ३३ वर्षे इथे राज्य केले. त्यानंतर १४६९ मधे घियासुद्दीन या मुहम्मदशाहच्या मुलाने सिंहासन स्वीकारून पुढे ३१ वर्षे सत्ता चालवली. याची वयाच्या ८० व्या वर्षापर्यंतची हयात रूपवान, लावण्यवती स्त्रियांकडून मन रिझवण्यात आणि संगीत श्रवणात गेली. पुढे त्याचाच मुलगा नसीरुद्दीन याने त्याच्यावर विषप्रयोग केला. गुजरातेतील बहादुरशाह याने १५२६ साली राज्य काबीज करून पुढे १५३४ साली हमायूनकडे हस्तांतरित झाले, त्याच राजवंशातील बाजबहादुर याने १५५४ ते १८६१ पर्यंत कारभार चालवला, त्यानंतर मात्र हे राज्य अकबराच्या सत्तेत समाविष्ट झाले. रेवाकुंडालगतचा बाजबहादूर महाल हा राजस्थानी व मोगल शैलीच्या आश्चर्यकारक मिश्रणातून बांधलेला आहे. राणी रूपमती महालासमोर हा महाल आहे. राणी रूपमती महाल हा बाजबहादूर व राणी रूपमती यांच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो.

माहेश्वर (Maheshwar)

या महालातून तिला सतत नर्मदेच दर्शनही होई, राणी रूपमती ही परमार राजपूत राजाची राणी. पण संगीत, गायन हे तिचे वेड आणि नर्मदा नदीवरील तिची वेडी भक्ती यापायी राजाने तिच्याशी फारकत घेतली, नर्मदा नदीवरील तिच्या अलोट भक्तीची आख्यायिका म्हणजे दुरून नदीचे दर्शन घेऊन तिची इच्छा पूर्ण होत नसे. ती अतृप्त राही. नर्मदेच्या घोर आराधनेनंतर स्वतः नर्मदा नदी प्रसन्न होऊन एकदा उचंबळून तिच्या महालाच्या पायथ्यापर्यंत पुराच्या रुपात आली. तिथे तयार झाले ते रेवा कुंड. तिची संगीताची हौस पूर्णपणे भागवण्यासाठी व सतत तिच्या प्रेमालापांचे श्रवण व तिच्या रूपवान सौंदर्याचे दर्शन घेण्यासाठी बाजबहादूराने तिला राजवाडा बांधून दिला. त्यांचे प्रेमरंजन गच्चीतून, गवाक्षातून चाले. पण अकबराच्या मांडूवरील आक्रमणानंतर बाजबहादूरने पलायन केले व राणीने अंगठीतील हिरा खाऊन आत्महत्या केली. टेकडीसारखा रूपमती महालापर्यंतचा रस्ता, गवाक्ष, छत्र्या सारंच अवर्णनीय, यानंतर आम्ही जहाजमहाल पाहण्यास निघालो. त्यासाठी खरे ३-४ तास हवेत. जहाजाप्रमाणे भासतो म्हणून यास जहाजमहाल म्हणतात. १२० मी. लांब व १५ मी. रुंद. कापूर तलाव व मुंजा तलाव यांच्या मधोमध स्थित १५००० गणिकांसाठी बांधलेला जनानखाना. श्रावणसरींचा शिडकावा झेलीतच आम्ही जहाजमहाल पाहिला.

जहाजमहाल (Jahaz Mahal)

याशिवाय अशरफी महाल, हिंडोला महाल असे अनेक महाल मांडूत आहेत जे त्या काळच्या मोगल साम्राज्याची भव्यदिव्यता, त्यांची श्रीमंती, त्यांची रसिकता यांचे सार्थ दर्शन घडवतात. तिथल्या नीलकंठ नावाच्या शंकर मंदिराकडे जाणारा पायऱ्या पायऱ्यांचा रस्ता व त्यानंतर मंदिरात खाली गुहेप्रमाणे भासणाऱ्या खोल जागेतील पिंडी अद्भुततेची साक्ष देते. ह्या ठिकाणी प्रत्यक्ष अकबर बादशाहाने येऊन त्याची प्रशंसा केली व नीलकंठ स्थानाबद्दलचे त्याचे शब्द फारसी भाषेत मंदिरावर कोरून ठेवलेले आजही आढळतात. इथल्या दगडांमधील कोरीव filtration system अकबराला मुळातच आवडली. नीलकंठ मंदिर, आतील गुहेत व कमानीवर आपल्याला फारसी, उर्दू लिपीतील अक्षरे दिसतात. इथे पिंडीवर नैसर्गिक पाण्याचा संततधार अभिषेक होत असतो.

मांडू बघायला खरंतर दोन पूर्ण दिवस हवेत पण दुपारच्या जेवणानंतर माहेश्वरकडे प्रस्थान ठेवावेच लागले. तरी १०० कि.मी. अंतरावरचं ॐकारेश्वर टाळलंच, पण ओबडधोबड घाट उतारावरून ४० कि.मी. वर असलेलं माहेश्वर गाठलं. वाटेत तिथल्या ग्रामीण लोकवस्तीतील स्त्रिया गणगीरीचं व्रत गमतीदाररीत्या करीत होत्या. त्या फेर धरून, नाचत माळव्याची लोकगीत गात होत्या. माहेश्वर येथे पोचेतो ५ वाजले, पण आम्हाला लगेचच गाइड मिळाला. नर्मदा नदीच्या तीरावरील या गावाला माहेश्वर हे नाव पडण्याचे कारण महाभारत काळात या नदीला महिष्मती हे नाव होत. अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा, त्यांचे देवघर, माहेश्वराचं भव्य मंदिर, त्या मागचा सूर्यास्त, नर्मदेत पाय बुडवून स्वतःला पवित्र करण्याचा एक प्रयत्न, पुण्य प्रयोग झाला. नर्मदा नदी सप्तसिंधूंपैकी एक पवित्र नदी मानली जाते. तिच्या दर्शनाने, संथ प्रवाहाने समाधान झाले. माहेश्वर मंदिराची शैली ही उत्तर भारतीय शैलीकडे झुकणारी होती. गाइडने होळकर घराण्याची सविस्तर माहिती देऊन कान तृप्त केले. विनिता, श्वेता यांच्याबरोबर मी आणि अशोकने आपापल्या सौभाग्यवतींसाठी माहेश्वरी साड्या घेतल्या. माहेश्वरला ओझरती भेट देऊनच परतलो.

अख्खा शनिवार, रविवार, सोमवार मस्त भटकतीत गेले. इंदूरमधील बिजासन टेकडीवर धावती भेट झाली. रेवडी, गराडू. गुपचूप असे तिथले मिठाईचे पदार्थ घेऊन मांडूतला मांडलेला मांड आवरला. इंदूरहून सुटणारी अवंतिका एक्सप्रेस संध्याकाळी साडेपाच वाजता उज्जैनला पकडली.

“शुभं भवतु

लेखक – युधामन्यु गद्रे
Contact: yudhamanyu@gmail.com


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.