फेब्रवारी महिन्यात संस्कृतमध्ये लिहिलेलं एक महाकाव्य हातात आलं. या महाकाव्याचं नाव आहे ‘अग्निसंभवम् (Agnisambhavam)’. हे महाकाव्य मिसाइल मॅन, हिंदुस्थानचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित आहे. या नावानंच मन जिंकलं.
अग्नि मिसाइलचे निर्माते आणि अग्निसारखं भव्य जीवन, उर्ध्वगामी, तेजस्वी आणि प्रचंड संकाटातही संभावना कायम ठेवणारे डॉ. कलाम यांच्या महाकाव्यास हे नाव अगदी चपखल बसतं. त्यामुळे संस्कृतमध्ये असूनही हे काव्य वाचणं एक वेगळा अनुभव ठरला.
“केवळ यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी फक्त संदेश मिळतो, अपयशाच्या कथाही वाचा त्याने यशस्वी होण्यासाठीचे मार्ग मिळतात.” असा विचार मांडणारे हिंदुस्थानचे माजी राष्ट्रपती मिसाइल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्रावर संस्कृत भाषेत महाकाव्य प्रसिद्ध झालं आहे. नाशिक येथे राहणारे पं. किशोर लिमये यांनी महत्प्रयासाने हे शिवधनुष्य पेललं आहे. (Agnisambhavam)

डॉ. कलाम यांच्या जीवनावर संस्कृत भाषेत महाकाव्य म्हटल्यावर माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. डॉ. कलाम यांच्यावर पुस्तकं, काव्य येणं हे काही नवीन नाही. त्यांच्या उत्तुंग कर्तुत्त्वाला साजेसंच आहे. मात्र त्यांच्यावर संस्कृत भाषेत महाकाव्य ही गोष्ट मात्र लक्षं वेधून घेणारी होती. फेब्रुवारी महिन्यात वृत्तपत्रात याच्या प्रकाशनाची बातमी वाचली आणि त्याचा शोध घेत हे महाकाव्य खरेदी केलं.
खरं तर संस्कृतचा दहावीच्या परीक्षेपर्यंत थेट संपर्क होता. या व्यतिरिक्त दैनंदिन देवपूजा, गीता पठण एवढाच काय तो संस्कृत श्लोकांचा संबंध. मात्र संस्कृत वाचनाचा फार संबंध नाही. त्यामुळे हे महाकाव्य वाचणं औत्सुक्याचं ठरलं. (Agnisambhavam)

या महाकाव्यात एकूण १४ सर्ग आहेत. ज्याची सुरुवात ‘परिवार प्रकरणम्’ पासून होते पुढे ‘बाल्याप्रकरणम्’, ‘शिक्षाप्रकरणम्’ ते ‘संसिद्धिप्रकरणम्’ अशी उत्सुकता वाढत जाते. ‘विंग्स ऑफ फायर’ म्हणजे अग्निपंख अनेकांनी वाचलं आहे. त्यामुळे अनेक प्रसंग माहित असतात. मग उत्सुकता कसली असा प्रश्न महाकाव्य न वाचता येऊ शकतो. पण जेव्हा महाकाव्य हातात येतं तेव्हा मात्र असे प्रश्न मनात येत नाहीत. संस्कृत श्लोकात, काव्यात हे प्रसंग वाचताना उत्सुकता अधिक वाढत जाते.
अग्निबाणस्य निर्माणे तन्त्रज्ञाने तथैव च ।
भारतीया सक्षमता सर्वथा सुप्रतिष्ठिता ।।
आस्वातन्त्र्यं भारतस्य शान्तिपूर्णप्रयोजने ।
अण्वन्तरिक्षयोर्कार्यक्रमो कार्यान्वितौ तत: ।।
वर लिहिलेले श्लोक वाचले, तर तुम्हालाही लक्षात येईल की हे काव्यात्मक चरित्र वाचणं तसं कठीण नाही. हे महाकाव्य वाचताना काही शब्द अडल्यास परिशिष्ट जोडण्यात आलं आहे, त्यामध्ये त्याचे अर्थ दिले आहेत.(Agnisambhavam)
=====
हे देखील वाचा – कारगिल विजय दिवस! तीन दिवस युद्धभूमीवर राहिले होते अटलजी…
=====
हे महाकाव्य लिहिताना सर्वात कठीण होतं ते तांत्रिक शब्दांना संस्कृतात आणणं आणि मांडणं. पं. किशोर लिमये यांनी १०८ नवे शब्द यानिमित्तानं संस्कृत भाषेला दिले आहेत. त्यांच्यासोबत प्रत्यक्ष भेट घेत चर्चा केल्यानंतर त्यांच्या या कार्याविषयीचा आदर अधिक वाढला.
संस्कृत अध्यापनाचं काम करणारे लिमये सर यांनी भाषेची सेवा करण्यासाठी हे पाऊल उचललं. जोपर्यंत संस्कृत भाषेत नवं वाड्गमय येत नाही तोपर्यंत ते टिकणार कसं, या विचारानं त्यांनी हे शिवधनुष्य उचललं आणि यशस्वी पाऊल टाकलं.

काव्यस्वरुपात लिहिण्याने कमी जागा आणि मोजक्या शब्दात अधिक विचार सांगू शकतो. त्यामुळे त्यांनी हे चरित्र काव्य स्वरुपात मांडले. काव्यात चरित्र लिहिणं हे अत्यंत कठीण काम आहे. मात्र दृढनिश्चय आणि प्रचंड मेहनतीनं त्यांनी वर्षभरात हे कार्य सिद्धीस नेत या ‘अग्निसम्भवम्’ नावाच्या महाकाव्याची निर्मिती केली. हे चरित्र अनुष्टुप, शार्दुलविक्रीडित, इन्द्रवज्रा छंद अशा विविध छंदांनी सजलेलं आहे. या महाकाव्यामुळे कलाम यांचं जीवन तर समजेलच, पण ते काव्यात्मक असल्याने ते गेयही झालं आहे.
एकीकडे वाचन संस्कृतीच्या नावानं ओरड सुरू असताना संस्कृत भाषेत पुस्तक लिहिणं हे एक धाडसाचं काम आहे. मात्र कोणत्याही नफा तोट्याचा विचार न करता, एक उत्तम चरित्र संस्कृतातून आणि तेही काव्यात वाचण्यास मिळेल या आकर्षणातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा विचार त्यांनी यामागे ठेवला आहे. (Agnisambhavam)
आज जागतिक भाषा शिकण्याकडे लोकांचा ओढा आहे. त्यात नवीन साहित्य निर्माण होत आहे. अशावेळी सर्वात प्राचिन आणि परिपूर्ण भाषा म्हणून प्रचलित असलेल्या संस्कृत भाषेविषयी मात्र म्हणावी तशी उत्सुकता दिसत नाही. मात्र आपल्या हिंदुस्थानी भाषा किती समृद्ध आहेत याची ओळख या महाकाव्याच्या निमित्तानं होईल, असा विश्वास वाटतो.
- मोहिनी अहिरराव