Home » महाकाल लोकात शिवभक्तांसाठी ‘आकर्षणाचा ठेवा’

महाकाल लोकात शिवभक्तांसाठी ‘आकर्षणाचा ठेवा’

by Team Gajawaja
0 comment
Mahakal Lok
Share

देशातील पहिलाच धार्मिक परिसर म्हणून गौरव होत असलेल्या महाकाल कॉरिडॉरचे भव्यदिव्य लोकार्पण झाले आहे, तरी या सोहळ्यात अवघं मध्यप्रदेश आताही रंगून गेलेलं आहे. तब्बल पाच दिवस हा उत्सव संपूर्ण मध्यप्रदेशमध्ये होणार आहे. उज्जैन, इंदौर, भोपाळसह मध्यप्रदेशमधील सर्व प्रमुख शहरात मंदिरांमध्ये आरती आणि रोषणाई करण्यात आली आहे. याबरोबरच या महाकाल परिसराला भेट देण्यासाठी देशविदेशातील अनेक भक्तही दाखल झाले आहेत. 856 कोटी रुपयांची ही योजना दोन टप्प्यात विकसित होत आहे. 47 हेक्टर परिसराचे यामुळे स्वरुप पलटले आहे. 946 मीटर लांबीचा कॉरिडॉर म्हणजे महाकाल भक्तांसाठी अद्भूत असा झाला आहे. या सर्व चालत भाविक महाकाल मंदिराच्या गर्भगृहात पोहोचतील. या सर्व कॉरिडॉरमध्ये भगवान शंकराच्या संबंधित 208 मूर्ती आणि 108 स्तंभ आहेत, ज्यामध्ये शिव परिवार आणि शिवविवाहाशी संबंधित अनेक कथा आहेत. विशेष म्हणजे हा संपूर्ण परिसर भक्ती आणि विज्ञान यांचा अनोखा संगम असणार आहे. या परिसरातील प्रत्येक मुर्तीखाली बारकोड लावण्यात येणार आहे. हा बारकोड स्कॅन केल्यावर आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये या मुर्तीबाबतची सर्व माहिती मिळणार आहे, तसेच यासंबंधीचा व्हिडीओही बघता येणार आहे. एकूण या महाकाल प्रकल्पानं उज्जैनचं स्वरुप पलटणार आहे.(Mahakal Lok)

मध्यप्रदेशच्या उज्जैनमधील महाकाल कॉरिडॉर हा रुद्रसागर तलावाच्या काठावर विकसित झालेला भव्य परिसर सध्या सर्व शिवभक्तांसाठी आकर्षणाचा ठेवा झाला आहे. या संपूर्ण परिसराची सजावट शिव, शक्ती आणि इतर धार्मिक कथांशी संबंधित अशा 200 मुर्ती आणि भिंती चित्रांनी सजविण्यात आला आहे. सप्त ऋषी, नवग्रह मंडळ, त्रिपुरासुर वध, कमळकुंडात विराजमान झालेले शिव, शिवाचा आनंदी तांडव दर्शवणारे 108 खांब, शिवस्तंभ, भव्य प्रवेशद्वारावर नंदीच्या विशाल मूर्ती यासह देशातील पहिले नाईट गार्डनही या महाकाल परिसराचे वैशिष्ट आहे.(Mahakal Lok) उज्जैन शहरात क्षिप्रा नदीच्या काठावर भगवान शंकर महाकालाच्या रूपात विराजमान आहेत. बारा ज्योतिर्लिंगांमध्ये ते तिसऱ्या क्रमांकाचे भगवान शंकराचे स्थान आहे. उज्जैन येथे असलेले हे ज्योतिर्लिंग दक्षिणेकडे तोंड करून असलेले देशातील एकमेव शिवलिंग आहे. भगवान शिवाला अनेक नावे आहेत, महादेव, भोलेनाथ, शंकर, शंभू, त्रिलोकपती म्हणून शंकराला संबोधले जाते. परंतु उज्जैनमध्ये भगवान शंकराला महाकाल म्हणून संबोधले जाते. यासंदर्भातल्या अनेक कथा सांगितल्या जातात.उज्जैन हे पूर्वी उज्जयिनी आणि अवंतिकापुरी म्हणूनही ओळखले जात असे. अवंतिकापुरीच्या नागरिकांना दूषण नावाच्या राक्षसाने त्रस्त केले होते. दूषण राक्षसाला ब्रह्मदेवाकडून अनेक शक्ती मिळाल्या होत्या. या दूषणच्या नाशासाठी येथील एका शिवभक्ताने भगवान शंकाराची आराधना केली,तप केले. पण भगवान शंकर आले नाहीत. त्यामुळे तो ब्राम्हण दुःखी झाला. आपल्या भक्ताला दुःखी झालेले बघितल्यावर भगवान शंकराने दूषण नावाच्या राक्षसाचा वध केला.या दूषण राक्षसाला कालही म्हणत असत. त्यामुळेच भगवान शंकराला महाकाल असे नाव पडले. कालाच्या वधामुळे बाबा महाकालच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. असे म्हणतात की, जो भक्त बाबा महाकालाची निष्ठेने पूजा करतो, त्याचा अकाली मृत्यूही होत नाही. या महाकाल लोकमध्ये काल राक्षसाचा वध करणा-या शिवाची भव्य मूर्ती बसवण्यात आली आहे.

महाकाल लोक योजना ही 856 कोटी रुपयांची योजना आहे, दोन टप्प्यात ही योजना होईल. महाकाल लोकचा विकास 2028 मध्ये होणा-या सिंहस्थमेळाव्याला डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे. सिंहस्थाच्या काळात इंदौर, रतलाम, देवास, माकसी अशा कोणत्याही शहरातून उज्जैनला येताना सिंहस्थ मेळ्याच्या दीड किमी जवळ वाहने पार्क करता येतील. जत्रा परिसरात जाण्यासाठी लोकांना जास्त चालावे लागणार नाही. बॅटरी असलेली सरकारी वाहने दीड किमी परिसरात भाविकांसाठी तयार असणार आहेत. तिरुपती संस्थानामध्ये अशाप्रकारची व्यवस्था प्रथम करण्यात आली होती. त्यानंतर महाकाल लोकमध्ये(Mahakal Lok) ही बॅटरी असलेल्या वाहनांची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली आहे. सिंहस्थमेळा दरम्यान येणा-या भाविकांसाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2500 वाहनांचे पार्किंग तयार होईल अशी व्यवस्था आहे. सिंहस्थासाठी नदीकाठावर 7 हजार वाहनांसाठी कायमस्वरूपी पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी या महाकाल लोकचा दुसरा भाग असलेल्या कॉरिडॉरचे काम क्षिप्रा नदी जवळ सुरू झाले आहे.

अत्यंत महत्तवकांक्षी असलेल्या या प्रकल्पाची उभारणी होत असतांनाही शिवभक्तांची कसलीही गैरसोय होऊ नये, याची काळजी घेण्यात आली. महाकाल लोकच्या(Mahakal Lok) लोकार्पणानंतर 20 मिनिटांत भाविकांना महाकालाचे दर्शन घेता येणार आहे. एकाच वेळी 30 हजार भाविकांना महाकाल लोकांमध्ये जाता येणार आहे. एका दिवसात 7 लाख भाविक आले तरी गर्दी होणार नाही. शिवरात्री, नागपंचमी आणि सिंहस्थ यांसारख्या काळात होणा-या भाविकांच्या गर्दीचे नियोजन करुनच व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुढील 50 वर्षांचा विचार या योजनेमध्ये करण्यात आला आहे. आणि तशा सुविधाही पुरवण्यात आल्या आहेत.

या महाकाल लोकचा (Mahakal Lok) लोकार्पण सोहळाही खास आहे. यासाठी मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, केरळसह 6 राज्यांतील कलाकार उज्जैनमध्ये दाखल झाले आहे. हे कलाकार संपूर्ण महाकाल लोक परिसरात भक्तांना शिवशंकराच्या कथा सांगणार आहेत. या सोहळ्यासाठी 200 साधुसंतही उपस्थित आहेत. या भव्य सोहळ्यासाठी 60 किमी लांबीचा इंदूर-उज्जैन महामार्ग सुशोभित करण्यात आला आहे. ही सर्व सजावट आठवडाभर असणार आहे. किमान 40 देशांमध्ये महाकाल लोक सोहळा लाइव्ह बघितला जाईल, याचीही व्यवस्था होती. याशिवाय क्षिप्रा नदीच्या सर्व घाटांवर एक लाखाहून अधिक भाविक मोठ्या स्क्रीनमधून हा सोहळा पाहतील याची सोय करण्यात आली होती. शिवाय मध्य प्रदेशातील प्रमुख मंदिरांमध्ये शिव भजन, पूजा, कीर्तन, अभिषेक, आरतीही करण्यात आली. शंख, घंटा, वाजवण्याबरोबरच मंदिरे, नद्यांच्या काठावर, आणि प्रत्येक घरासमोरही दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे.

महाकाल लोक कॉरिडॉरमधला सर्वात आव्हानात्मक भाग होता तो रुद्रसागर तलावाचे सुशोभिकरण. मात्र मध्यप्रदेश सरकारनं हे आव्हान यशस्वी केलचं पण त्यासोबत या परिसरातील सांडपाण्याचे नियोजनही तेवढ्याच शिस्तबद्ध पद्धतीनं केलं आहे. 12 हजार घरांचे सांडपाणी या तलावात पडायचे. 9 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर तलावाचे पाणी आता शुद्ध झाले आहे.रुद्रसागर स्वच्छ करण्यासाठी वैदिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. भोपाळस्थित ग्रीन लाइफ टेक्नॉलॉजी या कंपनीची यासाठी मदत घेण्यात आली. हिमालयातील भाज्या, फळे, गूळ आणि औषधी वनस्पती यांच्या मिश्रणावर विशेष प्रक्रिया करून बायोकल्चर नावाचा द्रव तयार करण्यात आला. साधारणपणे 1 लिटर द्रवात 1000 मिली पाणी मिसळले जाते, परंतु रुद्रसागरमध्ये खूप घाण होती. त्यामुळे 1 लिटर द्रवामध्ये 300 मिली पाण्याचे द्रावण तयार करण्यात आले. यानंतर 45 टँकरच्या पाण्यात सुमारे 750 लिटर घनरूप द्रव विरघळवून रुद्रसागरात टाकण्यात आले. आता या तलावाचे पाणी इतके स्वच्छ झाले आहे की काठावर ठेवलेले दगडही स्पष्ट दिसत आहेत. हे वैदिक लिक्विड नोएडा येथे तयार करण्यात आले. तिथून विमानाच्या मदतीने उज्जैनला आणण्यात आले. महापालिकेच्या 45 टँकरच्या मदतीने 5 दिवसांत संपूर्ण पाणी साफ करण्यात आले. हा तलाव स्वच्छ करण्यासाठी 40 जणांनी रात्रंदिवस काम केले. त्यासाठी मशिन्सचीही मदत घेण्यात आली. रुद्रसागर विस्तारासाठी 20 कोटींच्या प्रस्तावित योजनेत 10 कोटी रुपये केवळ मलनिस्सारण ​​थांबवणे आणि जलकुंभ काढण्यासाठी खर्च करण्यात आले. याबरोबरच परिसरातील नाल्यांचे पाणी तलावात पडू नये यासाठी प्रथम नियोजन करण्यात आले. त्यासाठी तलावाचे खोदकाम करून रुद्रसागरमध्ये सुमारे 500 सांडपाणी येण्याचे मार्ग बंद करण्यात आले. रुद्रसागरात पडणाऱ्या नाल्यांचे पाणी बंद झाले, त्यामुळे आता वर्षभर पाणी कसे ठेवायचे हे दुसरे आव्हान होते. रुद्रसागर पावसातच भरतो. मात्र हे पाणी उन्हाळ्यात आटते, तसे होऊ नये म्हणून रुद्रसागर तलाव क्षिप्रा नदिबरोबर जोडण्यात आला आहे.

=========

हे देखील वाचा : केरळातील पद्मनाभस्वामी मंदिरात दिव्य शाहाकारी मगरीला दिली गेली भू समाधी

=========

सध्या महाकाल लोकच्या(Mahakal Lok) निमित्तानं अवघं उज्जैन रोषणाईनं झगमगून गेलं आहे. दिवाळी 24 तारखेला आहे. पण मध्य प्रदेशात दिवाळी आधीच साजरी होत आहे. 1736 मध्ये राणाजीराव शिंदे यांनी हे महाकाल मंदिर बांधल्याच्या उल्लेख आठळतो. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक अलेल्या या महाकालेश्वर मंदिरात दक्षिणमुखी ज्योतिर्लिंगाच्या रूपात भगवना शिव विराजमान आहेत. अनेकवेळा या मंदिरावर आक्रमणे झाली. त्याची तोडफोड झाली. मात्र वेळोवेळीच्या राज्यकर्त्यांनी महाकाल मंदिराच्या भव्यतेसाठी प्रयत्न केले. आता हे मंदिर अधिक आधुनिक सुविधांनी सुसज्ज झालं आहे. आता त्याला या महाकाल लोक कॉरिडोअरच्या भव्यतेनं आणखी एक रुपेरी पान जोडलं गेलं आहे.

सई बने…


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.