गुजरात आणि राजस्थानमध्ये पाण्याच्या विहिरींना वाव म्हणून ओळखले जाते. या भागात अजूनही काही अशा वाव आहेत, की ज्या भारतीय वास्तुशास्त्रात अदभूत करिश्मा म्हणून ओळखल्या जातात. या सर्व वाव, अर्थात विहिरींमध्ये प्रमुख स्थान आहे ते गुजरातमधील राणी की वावला (Rani ki Vav). गुजरातमधील पाटण या जिल्ह्याच्या गावी असणारी अशी विहीर ‘राणी की वाव’ (Rani ki Vav) या नावाने प्रसिद्ध आहे. सरस्वती नदीच्या काठावर असलेल्या पाटण या शहरात 11 व्या शतकातील ही भव्य विहीर एका राणीनं बांधली. आपल्या पतीला श्रद्धांजली देण्यासाठी राणीनं बांधलेली ही विहीर काळाच्या ओघात मातीखाली गाडली गेली होती. मात्र तीस वर्षापूर्वी स्थानिक शेतक-यांना या जागेत काहीतरी अदभूत असल्याची जाणीव झाली. त्यांनी भारतीय पुरातत्व विभागाबरोबर संपर्क साधला आणि या जागी खोदकाम करण्यात आले. या खोदकामातून बाहेर आलेली ही विहीर बघून अधिकारी आणि स्थानिकही चकीत झाले. ही विहीर एवढी भव्य आहे की, 22 जून 2014 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत या राणी की वावचा (Rani ki Vav) समावेश झाला आहे.
पाटणमधील ही विहीर इसवी सन 1063 मध्ये राणा भीमदेव प्रथम, यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांची पत्नी राणी उदयमती हिने बांधली. भीमदेव हे पाटणमधील सोलंका घराण्याचे संस्थापक, मूलराजा यांचे पूत्र होते. कालांतरानं ही विहीर शेजारुन वाहणा-या नदीच्या वाळूने भरुन गेली. 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत ती पूर्णपणे वाळूखाली दाबली गेली. मात्र पुरातत्वशास्त्रज्ञांनी उत्खनन केल्यावर या विहिरीतील भव्य कोरीव काम आणि मूर्ती अबाधित सापडल्या. ही विहीर जिथे मिळाली ते पाटण गाव पटोला साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. आता हेच गाव राणी की वाव (Rani ki Vav) साठीही प्रसिद्ध झाले आहे.
अहमदाबादपासून साधारण दीडशे किलोमीटर अंतरावर असणारे हे पाटण शहर जुन्याकाळी अन्हीलवाड या नावाने राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. सोळंकी वंशाची ही राजधानी होती. राणी उदयमती हिने ही विहिर मारू – गुर्जरा शैलीत बांधली असून उलट्या सुळक्यासारखी आहे. त्याचा जिना 500 मोठ्या आणि सुमारे 1000 लहान शिल्पांनी सजलेला आहे. पाण्याची टाकी 23 मीटर खोलीवर आहे. आता या विहिरीला बघण्यासाठी पर्यटक तर येतातच पण वास्तूशिल्पाचा अभ्यास करणारे आणि जुन्या चित्रशैलीचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थीही येथे आवर्जून भेट देतात. उलटे मंदिर म्हणून या विहिरीची बांधणी केल्याचे वास्तूतज्ञ सांगतात. संपूर्ण विहिर कलात्मक पातळीच्या शिल्प गटांसह पायऱ्यांमध्ये सात भागात विभागलेली आहे. धार्मिक, पौराणिक प्रतिमा यात असून हजाराहून अधिक लहान शिल्पे आहेत. त्यात तत्कालीन साहित्यिक कार्यांचा उल्लेख आहे.
ही भव्य विहीर गाडली जाण्यामागे सरस्वती नदीचा प्रवाह असल्याचे सांगितले जाते. पाटण गावाजवळून पुरातन अश्या सरस्वती नदीचा प्रवाह जातो. ही नदी आता आटलेली असली तरी बाराव्या शतकात या नदीला मोठा पूर आला. या पुरामुळे आलेल्या गाळात विहीर पूर्णपणे भरून गेली. स्थानिक या विहिरीचे पाणी वापरत असत. पण नंतर या विहिराचा सर्वांना विसर पडला. विहिरीभोवती शेती केली जाऊ लागली. 1980 च्या सुमारास शेतकऱ्यांनी येथे खोदकाम केले असता त्यांना विहिरीचे अवशेष दिसून आले. त्यांनी भारतीय पुरातत्त्व खात्याला संपर्क केला. आणि हा भव्य सांस्कृतिक वारसा उघड झाला.
=====
हे देखील वाचा : संविधानाच्या पानांवर रामाचा फोटो ‘या’ कारणास्तव छापलाय
=====
64 मीटर लांब आणि 20 मीटर रुंद असणारी ही विहीर साधारण 27 मीटर खोल आहे. सात स्तर असणाऱ्या या विहिरीत काही मजले आहेत, आजूबाजूच्या भिंतीवर अतिशय सुरेख शिल्पे बनवलेली आहेत. अजूनही विहिरीला पाणी आहे परंतु सुरक्षेच्या कारणाने चौथ्या स्तरापेक्षा खाली जाता येत नाही. शेषशायी विष्णू, दशावतार, चामुंडा, कल्की, महिषासुरमर्दिनी, हनुमान, शिव पार्वती, मातृका, सूर सुंदरी अशा अनेक कोरीव मूर्ती ‘राणी की वाव’ येथे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे, विहिरीच्या सर्वात खालच्या पायरीवर पाटणजवळील सिद्धपूर शहराकडे जाणाऱ्या 30 किमी लांबीच्या बोगद्याचे प्रवेशद्वार आहे. हा बोगदा राजासाठी बांधण्यात आला होता. युद्धात पराभव झाल्यास याचा वापर करुन शत्रूपासून बचाव करता येत होता. सध्या हा रस्ता दगड आणि मातीने बंद करण्यात आला आहे. राणी की वाव चा उल्लेख भारतीय भारतातील विहिरींमध्ये सर्वाधिक सुंदर, भव्य असलेली विहिर असा करता येतो. सध्या शाळांना सुट्ट्या आहेत. अशावेळी फिरायला कुठे जावे असा प्रश्न पालकांना पडतो. अशावेळी गुजरातमधील पाटणच्या या राणी की वाव (Rani ki Vav) ला नक्की भेट द्यावी. भारतीय वास्तूशास्त्राचा हा अजोड नमुना नव्या पिढीला नक्कीच प्रेरणादाई ठरणारा आहे.