ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ
ज़रा हट के, ज़रा बच के
ये है बॉम्बे मेरी जान…
1956 सालच्या सी आय डी चित्रपटातील हे गाणं तेव्हाचं बॉम्बे (Bombay) म्हणजे आत्ताची मुंबई. या गाण्यात जुन्या मुंबईच किती छान वर्णन केलंय. पण 1995 सालानंतर याच बॉम्बे च मुंबई (Mumbai) झालं.
बॉम्बे मेरी जान म्हणणारी लोकं आता मुंबई मेरी जान म्हणायला लागली. पण हे सगळं झालं तरी कसं म्हणजे बॉम्बे ची मुंबई कशी झाली ??
मुंबई हा आपला अभिमान आहे किंवा मुंबईकर म्हणवून घेताना आपल्याला छान वाटत. पण याच मुंबईच पूर्वीच नाव बॉम्बे हे होत. मुंबई ही सात बेटांवर वसली आहे हे आपण सगळेच जाणतो. 1534 मधे हा सगळा परिसर पोर्तुगीजांनी काबीज करून याचे नाव बॉम बहिया असे ठेवले. आता बॉम बहिया म्हणजे चांगला उपसागर किंवा चांगले बंदर. याच बॉम बहिया चा इंग्रजी उच्चार बॉम्बे.
पोर्तुगालचा राजा सहावा ऍफ़ोन्सोच्या कॅथरीन नावाच्या बहिणीचे लग्न जेव्हा इंग्लंडचा राजा दुसर्या चार्ल्सशी झाले (२१ मे १६६२) तेव्हा हुंड्यादाखल ही बॉम्बे नावाची बेटे इंग्रजांना देण्याचा करार झाला (२३ जून १६६१). प्रत्यक्षात बॉम्बे इंग्रजांच्या ताब्यात १४ जानेवारी १६६५ ला आले.
आज पर्यंत अशी अनेक राज्ये आहेत ज्यांची नावं राज्याच्या भाषिक संस्कृती प्रमाणे बदलली गेली. तसंच मुंबई हे नाव ही मराठमोळं नाव, म्हणून आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही हेच नाव मोठं झालं आहे.
पण या बॉम्बे ते मुंबईच्या नाव बदलासाठी पुढाकार घेतला तो शिवसेनेने (Shiv Snea). 1995 साली शिवसेना सत्तेत आल्यावर त्यांनी बॉम्बे हे नाव शासकीय कामकाजासह व्यावहारिक जीवनातही बदललं जावं यासाठी प्रयत्न सुरू केले आणि अखेर 4 मे 1995 रोजी मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी बॉम्बे हे नाव बदलून मुंबई हे नाव अधिकृत करण्यात आले.
1995 नंतर आता या घटनेला 25 वर्षांचा काळ उलटून गेला आता मुंबईला बॉम्बे म्हणणारी फार थोडी माणसे शिल्लक असतील. पण त्यानंतर जन्म झालेल्यांना मुंबई हेच नाव माहिती असणार .
आज मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबई ही कित्येकांच आयुष्य घडवत असते आणि कायम घडवत राहील. तिथल्या उंचच उंच इमारतींप्रमाणे मुंबई ची ख्यातीही जगभर अशीच पसरत राहू देत.
शब्दांकन – सई मराठे