कान्स फिल्म फेस्टिव्हलचा जलवा फ्रान्समध्ये चालू आहे. चित्रपटांचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हच्या रेड कार्पेटवर येणा-या तारे तारकांच्या फॅशनचीही मोठी चर्चा आहे. या ७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जगभरातील चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार दिसत आहेत. भारतातर्फे कियारा अडवाणी, ऐश्वर्या राय बच्चन, अदिती राव हैदरी या सर्वांनी हजेरी लावून फॅशनच्या या रेड कार्पेटवर वाहवा मिळवली आहे. (Cannes Film Festival 2024)
२५ मे पर्यंत होणा-या कान्स फेस्टिव्हलमध्ये मेगा इव्हेंटमध्ये जगभरातील मोठे सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध तारे सहभागी होणार आहेत. याशिवाय कान्स चित्रपट महोत्सवात ७ भारतीय चित्रपटांची निवड झाली आहे. भारताच्या चित्रपटांचा आणि भारतीय अभिनेत्यांचा हा जलवा कान्सच्या रेडकार्पेटवर होत असतांनाच अजून एका भारतीय युवतीनं आपले लक्ष वेधून घेतले आहे. ही युवती म्हणजे, नॅन्सी त्यागी. ही नॅन्सी त्यागी कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तिच्या नावानं सोशलमिडियावर एक सफर मारावी.
नॅन्सी त्यागी म्हणजे, भारतातील तमाम महिलांचे प्रतिक आहे. कारण सर्वसामान्य भारतीय महिला या आपल्या पोशाखांची निवड कुठल्याही मोठ्या ब्रॅन्डकडे पाहून करीत नाहीत. तर आपल्या बजेटमध्ये बसेल असेच कपडे त्या शिवून घेतात. नॅन्सी त्यागी या तरुणीनं असेच केले आहे. मोठ्या ब्रॅन्डचे कपडे नॅन्सी तसेच्या तसे शिवून दाखवते. उत्तरप्रदेशमधून दिल्लीमध्ये एक टेलरिंग मशिन घेऊन नॅन्सी दाखल झाली होती. आता तिच्या अंगातील या कलेमुळे तिला कान्सच्या रेडकार्पेटवर मानाचे आमंत्रण मिळाले. नॅन्सीनं हे आमंत्रण स्विकारलंय. पण या रेडकार्पेटवर पहिल्यांदा येतांनाच तिनं कान्सची मैफल लुटली आहे. कारण तिनं परिधान केलेला गुलाबी रंगाच्या गाऊनचे कान्समधील मान्यवर फॅशन डिझायनरही कौतुक केले आहे. (Cannes Film Festival 2024)
७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नॅन्सी त्यागीने आपल्या अनोख्या फॅशनने सर्वांच्याच नजरा खेचून घेतल्या आहेत. मुळात कान्स सारख्या चित्रपट आणि फॅशनच्या जागतिक व्यासपिठावर नॅन्सी त्यागी सारख्या युवतीचे पदार्पण हे खूप काही सांगून जात आहे. कान्समधील नॅन्सीची पहिलीच एन्ट्री लक्षवेधी ठरली आहे. नॅन्सीने १००० मीटरपेक्षा जास्त फॅब्रिकने बनवलेला एक सुंदर गुलाबी गाऊन घातला होता. हा सुंदर गाऊन नॅन्सीनं स्वत:च्या हातांनी तयार केला.
नॅन्सीने सोशल मीडियावर तिच्या या गाऊन तयार करण्याची सगळी माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशच्या गावामधील या तरुणीनं कान्स फेस्टिवलमध्ये परिधान केलेल्या या गाऊनचे वजन २० किलो होते. कान्समध्ये जे सेलिब्रिटी येतात, त्यांच्या पोशाखाची किंमत ही काही लाखात असते, तर काहींचे पोशाख हे करोडो रुपयांचेही असतात. अशामध्ये नॅन्सीचा हा गुलाबी रंगाचा गाऊन उठून दिसत होता. नॅन्सी त्यागी ही उत्तर प्रदेशातील बरनवा या छोट्याशा गावातील रहिवासी आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलपर्यंत तिच्या नावाचा जो आता बोलबाला झाला आहे, त्यामागते नॅन्सीची मेहनत आणि कला आहे. १२ वी पूर्ण झाल्यावर नॅन्सी नॅन्सीने बागपतमधून यूपीएससी कोचिंगसाठी दिल्लीत आली. मात्र तिला कोरोनाच फटका बसला. लॉकडाऊनमुळे कोचिंग क्लासेस बंद झाले. (Cannes Film Festival 2024)
शिवाय ती जिथे नोकरी करत होती, ते कामही बंद झालं. अशा परिस्थितीत गावी परतही जाता येत नव्हतं. त्यामुळे नॅन्सीनं रोजचा घरखर्च भागवण्यासाठी शिवणकाम करावं लागलं. नॅन्सीकडे फार आधुनिक शिलाई मशीनही नाही. तर साधी हातानं चालवण्याची मशीन आहे. या मशीनच्या जोरावर नॅन्सीनं मग कपडे शिवायला सुरुवात केली. या कपड्यांच्या डिझाईन ती स्वतः करत असे. हे तिने केलेले कपडे ती सोशल मिडियावर व्हिडिओद्वारे शेअर करत असे. तिच्या या अनोख्या फॅशनला पसंती मिळू लागली. हळूहळू नॅन्सीनं प्रसिद्ध फॅशन डिझायनरचे कपडे बनवायला सुरुवात केली. ते कपडे घालून ती स्वतःचे व्हिडिओ तयार करत असे. (Cannes Film Festival 2024)
============
हे देखील वाचा : इराणमधील चाबहार बंदर सध्या चर्चेत
============
या व्हिडिओमुळे नॅन्सीचे नाव सर्वदूर झाले. अर्थातच नॅन्सीला कान्सची तिकीट मिळाले. यामुळे आनंदलेल्या नॅन्सीनं अवघ्या एक महिन्यात स्वतःचा ड्रेस डिझाईन केला. यासाठी तिनं एक हजार मीटर कापड वापरलं आहे. नॅन्सी म्हणते, माझा प्रवास कठीण होता, पण प्रत्येक क्षण मौल्यवान होता. हा सर्वच माझ्या पाठिराख्यांच्या शुभेच्छांमुळे मिळालेला मान आहे. अवघ्या २१ वर्षाची नॅन्सी आता कान्समध्ये सर्वसामान्य भारतीय महिलांचे प्रतिनिधीत्व करीत आहे. स्टाइल आणि क्रिएटिव्ह डिझाइन्सच्या व्हिडिओमुळे परिचित झालेल्या नॅन्सीसे लाखो फॉलोअर्स आहेत. नॅन्सीला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये डिजिटल क्रिएटर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. सर्वसामान्य घरातील तरुणीने घेतलेली ही झेप कौतुकास्पद आहे.
सई बने