Home » Trump And Musk : अमेरिकेतील दोन मित्रांचे नाक्यावरचे भांडण !

Trump And Musk : अमेरिकेतील दोन मित्रांचे नाक्यावरचे भांडण !

by Team Gajawaja
0 comment
Trump And Musk
Share

स्वतःला जिगरी मित्र म्हणून घेणा-या दोन मित्रांमध्ये जेव्हा भांडण होतं, तेव्हा हे दोघंही एवढे पेटून उठतात, की एकमेकांचे कपडेही फाडू लागतात. नाक्यावर होणा-या या भांडणात, दोन्हीही मित्र एकमेकांची उणीदुणी काढू लागतात. कोणी कोणाकडून किती पैसे उधार घेतले, कोणाची मुलींसोबत किती लफडी, कोण कुठे चोरी करतो आदी सर्व गुपितं या भांडणात बाहेर येतात. ही नाक्यावरची भांडणं म्हणजे, बिनपैशाचा तमाशा असतो. सध्या सुपरपॉवर अमेरिकेतही असाच बिनपैशाचा तमाशा सुरु झाला आहे. अर्थात हा तमाशा सुरु आहे, तो दोन जिगरी मित्रांमध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधिश उद्योगपती एलोन मस्क यांच्यात. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना एलोन मस्क यांनी सर्वार्थानं मदत केली. (Trump And Musk)

ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले, आणि त्याचे विशेष सल्लागार म्हणून मस्कला मान मिळाला. व्हाईट हाऊसच नाही तर पेंटागॉनमध्येही त्याची थेट एन्ट्री होऊ लागली. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला फर्स्ट लेडी या नावानं संबोधण्यात येतं. पण मस्क आणि ट्रम्प यांची जवळीक पाहता, त्याला फर्स्ट बडी असं नवं नाव मिळालं. व्हाईट हाऊसच्या ओवल ऑफीसमध्ये फक्त मस्क नाही तर त्याची पोरंही वावरु लागली. पण अती तिथं माती, या म्हणीनुसार या दोघांच्या मैत्रीमध्ये एका विधेयकाचं निमित्त झालं आणि एवढा दुरावा आला की, आता हे दोघंही एकमेकांचे जाहीरपणे कपडे फाडू लागले आहेत. मस्क यांनी एक्सवर ट्रम्प किती थिल्लर आहेत, याचा व्हिडिओ शेअर करत, लैंगिक गुन्ह्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या जेफ्री एपस्टाईन आणि ट्रम्प यांच्या मैत्रीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तर ट्रम्प यांनी मस्क यांनी उद्योगात किती सुट दिली आहे, याचा खुलासा करायला सुरुवात केली आहे. एकूण अमेरिकेत बिनपैशाचा तमाशा सुरु झाला आहे. अमेरिकेला पाण्यात पाहणारे चीन, रशिया, कॅनडा आणि अन्य देशात या तमाशावर मिम्सचा अक्षरशः त्सुनामी आला आहे. (International News)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलोन मस्क यांची मैत्री तुटल्यावर दोघांनीही एकमेकांची उणीदुणी काढायला सुरुवात केली आहे. या सर्वात एक नाव पुढे आलं, आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. हे नाव म्हणजे, जेफ्री एपस्टाईन. जेफ्री हा अनेक लैंगिक अत्याचार संदर्भातील गुन्ह्यामधील प्रमुख आरोपी होता. याच जेफ्रीसोबत ट्रम्प यांची मैत्री असल्याचा पुरावाच मस्क यांनी सादर केला आहे. बाल लैंगिक गुन्हेगार आणि मुलींची तस्करी करणा-या या एपस्टाईनची फाईल मोठी गाजली आहे. याच फाईलमध्ये ट्रम्प यांचेही नाव असल्याचे मस्क यांनी सांगून अमेरिकेत खळबळ उडवून दिली आहे. हा जेफ्री एपस्टाईन स्वतःला एक अमेरिकन फायनान्सर आणि समाजसेवक म्हणवून घ्यायचा. वास्तवात जेफ्री या समाजसेवेच्या नावावर अल्पवयीन मुलींची तस्करी करायचा. त्याच्या या लिस्टमध्ये वरिष्ठ राजकारणी, उद्योगपती,सेलिब्रिटीं, हॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांचा समावेश होता. या एपस्टाईनच्या अलिशान बोटी होत्या. शिवाय न्यू यॉर्क, फ्लोरिडा आणि न्यू मेक्सिको येथे त्याची मोठी मालमत्ता होती. (Trump And Musk)

या सर्व ठिकाणी नेहमी हाय-प्रोफाइल पाहुण्यांची वर्दळ असायची. या पाहुण्यांनी लैंगिक सेवा देण्यासाठी त्यांनी अनेक अभिनेत्री, प्रसिद्ध मॉडेल आणि लहान मुलींना भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला. एपस्टाईनची, जे. एपस्टाईन कंपनी अँड ही वित्तीय कंपनी अरबोंची उलाढाल करायची. त्यामागे हायप्रोफाइल संबंध आणि एपस्टाईननं सुरु केलेला लैंगिक व्यापार असल्याचे उघड बोलले जायचे. याच एपस्टाईनच्या अनेक पार्ट्यांमध्ये तेव्हा डोनाल्ड ट्रम्प उघडपणे सामिल व्हायचे. तरुणींच्या घोळक्यात असलेल्या याच तरुण ट्रम्पचा एक वादग्रस्त व्हिडिओ आता मस्क यांनी एक्सवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ 1992 सालातील आहे. यात ट्रम्प आणि एपस्टाईन हे दोघंही महिलांबद्दल बोलत आणि हसत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये घिसलेन मॅक्सवेल ही महिलाही दिसत आहे. घिसलेन ही एपस्टाईन साथीदार म्हणून ओळखली जायची. तिलाही अल्पवयीन मुलींच्या खरेदी आणि तस्करीमध्ये मदत केल्याच्या आरोपाखाली 2021 मध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. (International News)

डोनाल्ड ट्रम्प यांचा मित्र असलेला हा जेफ्री एपस्टाईन एवढा कुप्रसिद्ध होती की, त्याच्यावर अनेक अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि लैंगिक तस्करीचे गंभीर आरोप दाखल झाले. त्यानं जगभर अशाप्रकारचे लहान मुलींच्या तस्करीचे रॅकेट उभारल्याचाही आरोप झाला. पण त्याच्यावर कधीही कारवाई झाली नाही. अनेक मुलींनी त्याच्याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. अखेर 2008 मध्ये एका अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आले. या गुन्ह्यात त्याला फक्त 13 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. (Trump And Musk)

त्यातून सुटल्यावर एपस्टाईन पुन्हा मुलींच्या तस्करीच्या रॅकेटमध्ये सक्रीय झाला. 2019 मध्ये त्याच्यावर लैंगिक तस्करीचा आरोप ठेवण्यात आला. पण हा खटला सुरु होण्यापूर्वीच त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. एपस्टाईन, लहान मुलींच्या तस्करीचे जे रॅकेट चालवत होता, त्यात अनेक हायप्रोफाईल व्यक्तिंचा समावेश होता. एपस्टाईनच्या अटकेनंतर त्यांची नावं पुढे येण्याचा धोका वाढला आणि एपस्टाईनलाच संपवण्यात आल्याचा संशयही आहे. जेफ्री एपस्टाईन सोबत आपली मैत्री असल्याचे ट्रम्प यांनी एकदा जाहीर भाषणात सांगितले होते. यावेळी त्यांनी एपस्टाईनला सुंदर महिला आवडतात, आणि मलाही सुंदर, तरुण महिला आवडतात, असे विधान करुन वाद ओढवून घेतला होता. अर्थात ट्रम्प यांच्या स्वभावाप्रमाणे या एपस्टाईनसोबतही त्यांचा वाद झाला. या वाद एका मालमत्तेच्या खरेदीवरुन झाला. पाम बीचमधील मैसन डे ल अमिती नावाची मालमत्ता ट्रम्पने 41.35 दशलक्ष डॉलर्सना विकत घेतली. ही मालमत्ता एपस्टाईनलाही हवी होती. यावरुन या दोघांमध्ये एवढा वाद झाला की ट्रम्प यांनी एपस्टाईनला या भागात यायलाच बंदी घातली होती. (International News)

याच जेफ्री एपस्टाईन यांची फाईल चर्चेत आली आहे. यात जेफ्री एपस्टाईनशी संबंधित न्यायालयीन कागदपत्रे आहेत. तसेच त्याच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या हाय-प्रोफाइल व्यक्तिंची नावे आणि त्यांनी एपस्टाईनला कशी मदत केली, या संदर्भातील सगळी माहिती उपलब्ध आहे. एपस्टाईनशी संबंधित हायप्रोफाइल लोकांमध्ये ट्रम्प यांचेही नाव असल्याचा आरोप आधीही झाला आहे. एपस्टाईनशी संबंधित न्यायालयीन कागदपत्रांमध्ये डोनाल्ड ट्रम्प, प्रिन्स अँड्र्यू आणि माजी अमेरिकन अध्यक्ष बिल क्लिंटन सारख्या दिग्गजांचा समावेश असल्याची बातमी अमेरिकन वृत्तपत्रात 2024 च्या निवडणुकीच्या वेळी आली होती. याशिवाय न्यू यॉर्कचे माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो, संगीतकार कोर्टनी लव्ह, सुपरमॉडेल नाओमी कॅम्पबेल, रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियरची आई एथेल केनेडी, माजी परराष्ट्र मंत्री जॉन केरी, अभिनेते डस्टिन हॉफमन, राल्फ फिएनेस यांचा या यादीत समावेश असल्याची बातमी होती. धक्कादाक म्हणजे , ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांचीही नावे एपस्टाईनच्या याचीत असल्याचे बातमीत नमूद करण्यात आले होते. (International News)

===============

हे देखील वाचा : Trump And Musk : एकमेकांना शिव्या, शाप देऊ लागले !

===============

ट्रम्प यांनी ही बातमी चुकीचे असल्याचे सांगितले, तर प्रिन्स अँड्र्यू यांनीही यासंदर्भात बोलणे टाळले. मात्र ब्रिटीश राजघराण्यानं अँड्र्यू यांना त्यानंतर सामाजिक कार्यातून दूर केल्यामुळे ही नावं खरी असल्याची चर्चा रंगली. या फाईलचा उल्लेख एलोन मस्क बॉम्ब असा करीत असून आता बॉम्ब टाकण्याची वेळ आल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. ट्रम्पही या धमकीनंतर पुढे आले आहेत, त्यांनी एलोन मस्कच्या स्पेसएक्स आणि स्टारलिंक सारख्या कंपन्यांचे सरकारी करार रद्द करण्याची धमकी दिली आहे. तर मस्क यांनी एक पाऊल पुढे टाकत ट्रम्प यांच्यावर महाभीयोग चालवावा अशी मागणी केली आहे. एकूण या दोन मित्रांमधले हे भांडण लगेच संपणार नाही. यात या दोघांचेही कपडे उतरणार आहेतच, सोबत अनेकांचीही गुपितं बाहेर पडणार आहेत. त्यामुळेच सुपरपॉवर अमेरिकेत सुरु झालेल्या या बिनपैशाच्या तमाशाचा सर्वाधिक आनंद चीन आणि रशियामध्ये घेतला जात आहे. (Trump And Musk)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.