Home » India Partition : गांधी, जिना, नेहरू, सावरकर फाळणी कोणामुळे झाली ?

India Partition : गांधी, जिना, नेहरू, सावरकर फाळणी कोणामुळे झाली ?

by Team Gajawaja
0 comment
India Partition
Share

15 ऑगस्ट 1947 ! भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत स्वतंत्र झाल्याचं लाल किल्ल्यावरून घोषित केलं. सगळीकडेच जल्लोष सुरू होता. १०० वर्षांनी इंग्रजांच्या राजवटीतून अधिकृतपणे भारताला मुक्ती मिळाली. पण याच्या एका दिवसापूर्वीच भारताने आणखी एक देश जन्माला घातला होता. स्वतःच्या माथ्यावर रेफक्लिफ लाइन आखून भारताने पाकिस्तान नावाचा नवा इस्लामिक राष्ट्र निर्माण केला. एकीकडे जल्लोष सुरू होता तर दुसरीकडे आकांडतांडव… भारताची फाळणी झाली होती. लाखो लोकं बेघर झाले. लाखोंचा जीव गेला. (India Partition)

असं म्हणतात, ते जगातलं सर्वात मोठं मायग्रेशन होतं. ज्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. पाकिस्तानात असलेल्या हिंदूं, सिख आणि मुस्लिम वगळता इतर धर्माच्या लोकांना जबरदस्तीने भारतात यावं लागलं. आणि भारतातील मुस्लिमांना पाकिस्तानात जावं लागलं. याचवेळी धर्माच्या नावावर कत्तली घडल्या. बलात्कार झाले. लूटमार, जाळपोळ, अपहरण आणि फक्त किंकाळ्या ! स्वातंत्र्याचा आनंद साजरा करावा की फाळणीचं दुख: हे कोणाला कळतच नव्हतं. पण ही फाळणी घडली तरी कशी? कोण होते याचे सूत्रधार आणि यामुळे देशाचं काय नुकसान झालं हे जाणून घेऊ. (History)

भारत आणि पाकिस्तान आपापला स्वातंत्र्यदिन जवळपास सारख्याच पद्धतीनं साजरा करतात. शाळेत मुलं राष्ट्रगीत गातात, झेंडे मिरवतात, न्यूजपेपर्स articles छापतात, राजकारणी लोक भाषणं देतात आणि सैनिक शक्तिप्रदर्शन करतात. पण याच १४ आणि १५ ऑगस्ट या दोन दिवसांमध्ये घडलेल्या त्या भयानक आठवणींबद्दल आज कोणीही बोलत नाही. फाळणी, विभाजन,पार्टिशन… हा शब्द जरी ऐकला तरी भारत आणि पाकिस्तानचीच फाळणी डोळ्यांसमोर येते. भारत तसा अनेकदा ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या थियरीला बळी पडललाय. प्रत्यक्ष फाळणी “मांउटबॅटन योजने”खाली पार पडली असली तरी मुळात फाळणीची संकल्पना मांडली गेली, १८८८ साली ! (India Partition)

१८८५ ला काँग्रेसची स्थापना झाली. त्याचवेळी लॉर्ड डफरीन यांनी काँग्रेस सभासदांचा अभ्यास केला. तेव्हा त्यांना हे कळलं की, काँग्रेसमध्ये हिंदू बहुसंख्य आहेत आणि मुसलमान कमी आहेत. त्याचवेळी १८८८ ला डफरीन यांनी भारतात हिंदू आणि मुसलमान अशी दोन राष्ट्र नांदतात , असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला आणि फाळणीची पहिली ठिणगी इथेच पडली. याचदरम्यान मुस्लिम नेते सर सयद अहमद खान यांनी मुस्लिमांसाठी दुसरं राष्ट्र असावं, असं सांगितलं. काँग्रेसमध्ये मुस्लिमांवर अन्याय केला जातो, म्हणून काँग्रेसमधून वेगळं होऊन मुस्लिम नेत्यांनी १९०६ साली मुस्लिम लीगची स्थापना केली. यानंतर वेगळं मुस्लिम राष्ट्र या गोष्टीने जोर धरला. लाला लजपत राय हे त्यावेळी जितके स्वातंत्र्यसैनिक तितकेच हिंदू नेते म्हणून ओळखले जात होते आणि त्यांनीही हिंदूंसाठी वेगळा देश असावा, असं मत मांडलं होतं.

 India Partition

१९२५ च्या मुस्लिम लीग अधिवेशनाचे अध्यक्ष सर अब्दुल रहिम यांनी अध्यक्षीय भाषणात द्विराष्ट्रवादाचा मुद्दा मांडला. दोघांचे धर्म, रीतीरिवाज, संस्कृती, इतिहास, परंपरा सर्वस्वी भिन्न आहेत. ते केवळ एका देशात राहतात, एवढय़ानुसार एक राष्ट्र होऊ शकत नाहीत. १९३० साली मुस्लिम नेते चौधरी रहमत अली यांनी सर्वप्रथम पाकिस्तान हा शब्द तयार केला आणि मुस्लिमांचा जो नवा देश तयार होईल, त्याला हे नाव दिलं जाईल हे घोषित केलं. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, ज्यांना पाकिस्तानचे निर्माते आणि फाळणीसाठी जबाबदार मानलं जातं, ते मुहम्मद अली जिना अजूनही फाळणीच्या विरोधात होते. तसेच भारत पूर्णपणे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र राहावं, हीच त्यांची इच्छा होती. (India Partition)

मात्र मुस्लिम लीग जॉइन केल्यानंतर त्यांनी आपले विचार बदलले. १९३५ पासून नवी राज्यघटना येणार होती. तेव्हापासून जिना स्पष्टपणे द्विराष्ट्रांच्या पायावर समान वाटय़ाची मागणी करू लागले. ‘भावी राज्यघटनेत मुसलमानांना समान वाटा मिळाला पाहिजे, अशी त्यांनी अनेक भाषणांमध्ये मागणी केली होती. १९३७ मध्ये पंडित नेहरूंना उद्देशून जिना म्हणाले होते की, ‘हिंदूंबरोबर समान भागीदार या नात्याने वाटाघाटी करायला आम्ही तयार आहोत. यानंतर १९४० साली जिना यांनी फाळणीचा ठरावच टाकला आणि द्विराष्ट्रवाद ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली. सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा हे गीत लिहिणारे प्रसिद्ध कवी मुहम्मद इकबाल यांनीही मुस्लिम राष्ट्र या संकल्पनेला समर्थन दिलं होतं. (History)

वीर सावरकर यांनाही फाळणीची समस्या निर्माण करण्यासाठी जबाबदार धरलं जातं, कारण त्यांनी रत्नागिरीच्या तुरुंगातून सुटल्यानंतर हिंदुत्व हे पुस्तक लिहिलं होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, एकाच देशात दोन वेगवेगळ्या विचारांचे, वेगळ्या धर्माचे, वेगळ्या संस्कृतीचे लोकं राहुच शकत नाहीत. १९३७ साली अहमदाबाद येथे झालेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात सावरकर म्हणाले की, ‘आज हिंदुस्थान एकजीव व एकात्म राष्ट्र झालेलं आहे असे मानण्याची चूक आपण करता कामा नये. उलट या देशात मुख्यतः हिंदू आणि मुसलमान ही दोनही राष्ट्र आहेत हे मान्य करून चालल पाहिजे’. याचा उल्लेख आपल्याला ‘हिंदू महासभेच्या कार्याचा इतिहास’ या पुस्तकात मिळतो. (India Partition)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही द्विराष्ट्रवाद संकल्पनेला पाठिंबा दिला होता. आपल्या Thoughts On Pakistan या पुस्तकात त्यांनी फाळणी कशी आवश्यक आहे, हे मुद्देसूत मांडलं होतं. यावरून एक स्पष्ट होतं की, द्विराष्ट्रवाद ही फक्त मुस्लीम लीगची आणि जिन्नांची संकल्पना नव्हती तर वीर सावरकर, लाला लजपतराय आणि डॉ. आंबेडकर असे नेतेही या संकल्पनेला पाठिंबा देत होते. आता तुमच्या मनात आलं असेल की, महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांनाही फाळणीसाठी जबाबदार धरलं जातं तर त्यांचं नाव अजूनही का आलं नाही. महात्मा गांधींच्या नेतृत्वात १९४२ साली भारत छोडो आंदोलन सुरू झालं, ज्याला देशवासीयांचा पाठिंबा मिळाला. आधीच दुसरं महायुद्ध आणि नंतर हे आंदोलन त्यामुळे ब्रिटिश सरकार आधीच कमजोर झालं होतं. त्यामुळे भारताला स्वतंत्र करण्यापासून दूसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता.

मुळात गांधी फाळणीच्या विरोधात होते आणि त्यांनी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. फाळणी होऊ नये म्हणून गांधीजींनी एक नऊ कलमी योजना व्हॉईसरॉयसमोर ठेवली होती. याशिवाय १९४४ साली एक राजाजी फॉर्म्युलासुद्धा मांडण्यात आला होता. गांधींना राजाजी फॉर्म्युलासुद्धा पटला होता, मात्र जिना यांनी या फॉर्म्युलाला कडाडून विरोध केला होता. ‘आम्हाला पूर्णपणे पाकिस्तान पाहिजे, आम्ही वेगळाच पाकिस्तान मान्य करू’ अशा हट्टाला जीना पेटले. त्यावर गांधी म्हणाले की, ‘मुस्लिम लीग मुसलमानांची मोठी संघटना आहे. तुम्ही त्याचे नेते आहात हे पण मान्य. पण याचा अर्थ असा नाही की, भारतातील सर्वच मुसलमानांना वेगळा पाकिस्तान हवा आहे’. (India Partition)

काँग्रेसचं अजूनही हेच म्हणणं होतं की, आम्हाला सर्व धर्मांना सामावून घेणारा अखंड भारत हवा आहे. जून १९४७ रोजी लॉर्ड माऊंटबॅटन यांची पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, आचार्य कृपलानी, मोहम्मद अली जिना, लियाकत अली खान, राब निस्तार आणि बलदेश सिंग यांच्यासोबत एक बैठक झाली आणि या बैठकीत भारत-पाकिस्तान अशी फाळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. माऊंटबॅटन यांनी जी योजना मांडली तिला, ‘डिकी बर्ड प्लॅन’ म्हटलं गेलं. गांधींनी फाळणीला विरोध केला होता, मात्र ते राजकीय हस्तक्षेप करू शकत नव्हते. त्यामुळे जो निर्णय बैठकींमध्ये घेतला जाईल, तो त्यांना मान्य करावाच लागला. इथे अजून एक गोष्ट सांगितली जाते की, भारताची फाळणी होणार नाही, मात्र स्वतंत्र भारताचं नेतृत्व मुहम्मद अली जिना करतील. या गोष्टीमुळे पंडित नेहरू नाराज झाले आणि त्यांनी मीच पंतप्रधान होणार असल्याचा हट्ट धरला. यामुळे गांधींच्या मध्यस्तीनंतर नवीन राष्ट्र पाकिस्तानचे पंतप्रधान जिना बनतील आणि भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू राहतील, असा निर्णय देण्यात आला. (History)

फाळणीची प्रक्रिया मांउटबॅटन योजनेखाली पार पडली. यानंतर ब्रिटिश सरकारने नेमलेल्या सिरिल रेडक्लिफ या अधिकाऱ्याने प्रत्यक्ष भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर निश्चित केली. जुलै १८, १९४७ रोजी ब्रिटिश संसदेत भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला. यात भारतातील ५६५ संस्थानांना हवा तो पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली. पण याच तरतुदीमुळे काश्मीर समस्येचा उदय झाला, ज्यामुळे आजही काश्मीर पेटतोय. मुळात लोकांच्या भावना, त्यांच्या परंपरा, त्यांचा धर्म, त्यांची संस्कृती याला आघात पोहोचेल, लाखो लोकांचा जीव जाईल, याचा अंदाज बांधण्यात गांधी, नेहरू, माऊंटबॅटन आणि तत्कालीन इतर राजकीय नेते अपयशी ठरले. नाईलाजाने फाळणी करावीच लागली.

===============

हे देखील वाचा : Atlantium : ३ मित्रांनी एक रेघ ओढली आणि घरमागे बनला स्वतंत्र देश!

===============

मुळात एका बाजूला पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला भारत असा मुस्लिमांचा आणि हिंदूंचा देश बनवणं हेच चुकीचं असल्याचं अनेक इतिहासकारांनी म्हटलं आहे, कारण हिंदू आणि मुस्लीम हे संपूर्ण देशात विखुरलेले होते. त्यामुळे दोन्ही धर्माच्या लोकांना याचं प्रचंड नुकसान सहन करावं लागलं. फाळणीचे परिणाम खूप वाईट झाले. आधी १४ ऑगस्ट १९४७ ला पाकिस्तान स्वतंत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. देश स्वतंत्र झाला, अनेक ठिकाणी जल्लोष सुरू होता, मात्र जी रेडक्लिफ लाइन होती, तिथे मात्र नुसत्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. आपण घरदार सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्यांच्या किंकाळ्या… फाळणीनंतर जवळपास दोन कोटी लोकांनी नव्याने तयार करण्यात आलेला सीमा ओलांडत शेकडो मैलांचा प्रवास करून स्थलांतर केलं. इतिहासात आजपर्यंत इतकं मोठं स्थलांतर कधीच झालं नव्हतं. (India Partition)

फाळणीदरम्यान झालेल्या धार्मिक हिंसाचारात अनेकांना त्यांच्या राहत्या घरातून बळजबरीने बाहेर काढण्यात आलं. याचं पहिलं उदाहरण आपल्याला फाळणीच्या एक वर्षापूर्वीच म्हणजे १९४६ ला घडलं होतं. द्विराष्ट्र संकल्पना आणि धार्मिक दंगलींचा इतका भयानक परिणाम घडला की, कोलकत्यात उसळलेल्या जातीय दंगलीत ४ हजार लोकं मारली गेली. आणि १ लाख लोकं बेघर झाली. यामध्ये सर्वाधिक हिंदू होते आणि मुस्लिम लीगकडून हे कृत्य करण्यात आलं होतं. फाळणीदरम्यान याचे आणखी भयंकर परिणाम पाहायला मिळाले होते. वरती सांगितल्याप्रमाणे २ कोटी लोकांना स्थलांतर करावं लागलं तर तब्बल १० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला. हजारो स्त्रियांवर बलात्कार करण्यात आला. हे सगळे जुलै ते डिसेंबर १९४७ दरम्यान घडत होतं. फाळणीनंतरही एक तृतीयांश मुस्लीम हे भारतातच राहीले होते. तर लाखोंच्या संख्येने सिख आणि हिंदू पाकिस्तानात राहिले. (History)

फाळणीचा एक निर्णय आणि १० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला. यासाठी कोणाला जबाबदार धरावं आणि कोणाला जबाबदार धरू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण याबद्दल जिना यांचा एक किस्सा सांगितला जातो, फाळणीनंतर त्यांना पाकिस्तानात एका पत्रकाराने विचारलं की फाळणीबद्दल प्रश्न विचारल्यानंतर ते निराश होऊन इतकंच म्हणाले की, हे मी काय करून घेतलं ? कोणासमोरही पश्चातापाशिवाय काहीच उरलं नव्हतं, पण यावर भाष्य करणंदेखील जाणीवपूर्वक सर्वांनी टाळलं. आजचे राजकीय नेते फाळणीवरून एकमेकांवर प्रहार करतच असतात, मात्र त्याने सत्य बदलणार नाही आणि लोकांच्या जखमा पुसल्या जाणार नाहीत. १५० वर्षांच्या गुलामगिरीनंतर स्वतंत्र होत असलेल्या भारतात सगळीकडे आनंदोत्सव होता, मात्र हा आनंद निर्भेळ नव्हता. कारण इंग्रज देश सोडून चालले होते, मात्र, अखंड भारताची फाळणी करून एक भळभळती जखम सर्व भारतीयांच्या उरावर करूनच ते गेले.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.