भारतातील मंदिरे आणि त्यांची वास्तुकला हा अभ्यासाचा विषय आहे. आपल्या देशात हजारो वर्षापूर्वी बांधलेली मंदिरे आजही जैसे थे स्थितीत आहेत. या पौराणिक वारसा लाभलेल्या मंदिरांचा अभ्यास आज मोठ्या संख्येनं होत आहे. मात्र या पौराणिक मंदिरांप्रमाणेच अनोखे आणि भव्य असलेले मंदिर आपल्या देशात तयार होत आहे. अर्थातच हे मंदिर आपल्या सर्वांच्या मनात असलेल्या प्रभू श्री रामांचे आहे. अयोध्येमध्ये 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्री राम भव्य अशा मंदिरात विराजमान होणार आहे. प्रभू श्री रामांच्या या मंदिराचा पहिला टप्पा याच दिवशी भाविकासांठी खुला होणार आहे. हे मंदिर अतिशय भव्यदिव्य असून भारतातील सर्वात मोठे मंदिर म्हणून या मंदिराचा आत्तापासून उल्लेख होतोय. नागर शैलीमधील (Nagara Style) या मंदिराच्या सौदर्याचीही चर्चा सुरु झाली आहे. भारतातील बहुतांश मंदिरे ही नागर शैलीमध्ये बांधण्यात आली आहेत. आता प्रभू श्रीरामांचे मंदिरही याच शैलीमधून उभारण्यात आल्यामुळे नागरी शैली म्हणजे, नेमके काय याची माहिती जाणण्यासाठी अनेक उत्सुक आहेत.
उत्तर भारतातील मंदिर वास्तुकलेच्या शैलीला आणि नागर शैली (Nagara Style) म्हटले जाते. याच नागरशैलीमध्ये अयोध्येतील प्रभू श्री रामांचे मंदिर उभारण्यात येत आहे. या नागर शैलीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, नागर शैलीतील मंदिरांचा शिखर अतिशय कलाकुसरीचा आणि उंच असतो. पण यासोबतच अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये काही प्रमाणात द्राविड शैलीचाही वापर करण्यात येत आहे. त्यामुळेच अयोध्येतील राम मंदिर हे नागर शैलीत बांधलेल्या इतर मंदिरांपेक्षा वेगळे असणार आहे. या मंदिराचे वैशिष्ट जाणण्याआगोदर नागर शैली हा शब्द कसा आला हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.
नागर शैली, म्हणजेच नगर शैली, नगर, नागरी वस्ती, नागरीवस्तीचा समावेश असलेली नगरी म्हणजेच नागरी शैली. भारतात जी पुरातन मंदिरे आहेत, त्या मंदिराचा वापर अध्यापन केंद्र म्हणूनही होत असे. अनेक विद्यार्थी या मंदिरात वेद-पुराणांचा अभ्यास करण्यासाठी येत असत. त्यामुळेच ही मंदिरे उभारतानाच त्याची भव्यता जशी जपण्यात येत असे, तसेच या मंदिरात येणा-या प्रत्येकासाठी सुविधांचाही विचार करण्यात येत असे. कुठल्याही वातावरणाचा मंदिरावर परिणाम होणार नाही, याचा शास्त्रीय अभ्यास करुन या मंदिरामध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यात येत होते. अतिशय प्रगत अशी ही नागर शैली होती. त्यामुळेच सर्व भारतभर विभिन्न हवामान असले तरी मंदिरे उभारतांना नागरी शैलीचा (Nagara Style) वापर होत असे.
या शैलीचा प्रसार हिमालयापासून विंध्य पर्वतरांगेपर्यंत झालेला आहे. मात्र कुठल्याही नागर शैलीतील (Nagara Style) मंदिरांमध्ये पायापासून ते कळसापर्यंत मंदिराचा आकार निमुळता होत गेलेला आहे. याशिवाय मंदिरात गर्भगृह, अंतराळ, मंडप आणि अर्धमंडप यांचेही स्थान महत्त्वाचे असते. हे सर्व भाग एकाच अक्षावर एकमेकांना जोडून बांधले जातात. आज आपण प्रभू श्रीरामांचे मंदिर उभारणीचे वेगवेगळ्या टप्प्यातील फोटो पाहत आहोत, ते पाहून याचा अंदाज येतो. आज जे प्रभू श्रीरामांचे मंदिर उभे राहत आहे, त्या मंदिराचे काम विभागून करण्यात येत आहे. मंदिरांच्या या भागावर नक्षीकाम काही अन्य ठिकाणी करण्यात आले, आणि मग ते एकत्र करण्यात आले. हेच नागरी शैलीचे प्रमुख वैशिष्टय आहे.
=============
हे देखील वाचा : सनस्क्रिन लावल्याने व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होते का ?
=============
अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये 392 खांब आणि 44 दरवाजे तयार करण्यात आले आहेत. मुख्य मंदिरापर्यंत जाण्यासाठी 32 पायऱ्याही तयार करण्यात आल्या आहेत. नागर शैलीमधील मंदिरांमध्ये असे खांब आणि दरवाजे यांच्यावर भारतीय पुराणकालीन कथा आणि शुभचिन्हे कोरण्यात येतात. तसेच आपल्याला प्रभू श्रीराममंदिरात बघता येणार आहेत. कंदरिया महादेव मंदिर,खजुराहो, लिंगराज मंदिर – भुवनेश्वर, ओडिशा, जगन्नाथ मंदिर – पुरी, ओडिशा, कोणार्कचे सूर्य मंदिर – कोणार्क, ओडिशा, मुक्तेश्वर मंदिर – ओडिशा, खजुराहो मंदिरे – मध्य प्रदेश, दिलवाडा मंदिरे – माउंट अबू, राजस्थान, सोमनाथ मंदिर – सोमनाथ, गुजरात , महाबोधी मंदिर- गया, बिहार, ही सर्व भारतातील प्रमुख मंदिरे नागर शैलीमध्ये उभारण्यात आली आहे. या मंदिरांची ख्याती भारतातच नव्हे तर परदेशातही आहे. आता या मंदिरांमध्ये अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचाही समावेश होणार आहे.
सई बने