Home » चक्क 20 वर्षानंतर गावात झाला बाळाचा जन्म…

चक्क 20 वर्षानंतर गावात झाला बाळाचा जन्म…

by Team Gajawaja
0 comment
Baby Born
Share

घरात बाळाचा जन्म होणे ही आनंदाची गोष्ट असते. सर्व घर त्या चिमुकल्याभोवती फिरु लागते.  त्याचे हसणेच काय पण त्याच्या रडण्याचेही कौतुक होते.  आई-वडील, आजी- आजोबा, मामा, मामी, मावशी, दादा, ताई, आत्या, काका अशी कितीतरी नाती तयार होतात.  या लहानग्यामुळे सर्व घर जणू बहरुन जाते.  एका घरात बाळ जन्माला आले की त्याचे नंदनवन होते, असे म्हटले जाते.  मग विचार करा,  जर एका गावात तब्बल 20 वर्षानंतर एखादे बाळ जन्माला आले तर तिथे किती आनंद साजरा होईल.  मुळात एका गावात 20 वर्षानंतर झालेला बाळाचा जन्मच (Baby Born) कौतुकाचा विषय ठरला आहे.  हे गाव भारतात नाही, तर जपानमध्ये आहे.  जपान हा सध्या जगातील सर्वात वृद्ध नागरिकांचा देश ठरला आहे. (Baby Born)

जपानचा जन्मदर एवढा घटला आहे की, आणखी वीस वर्षानंतर या देशाचे अस्तित्वच संपुष्टात येईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.  याचीच चुणूक म्हणून जपानच्या एका खेडेगावात तब्बल 20 वर्षानंतर जन्माला आलेल्या कुरनोसुके काटो या लहानग्याच्या जन्माचा सोहळ्याचे कौतुक करण्यात येत आहे.  कारण या गावात कोणाच्याही घरात बाळ जन्माला आलेच नाही.  या गावातील तरुण नोकरीनिमित्त शहरी आहेत आणि प्रत्येकजण आपल्या प्रगतीच्या मागे लागला आहे.  अशात त्यांना मुलं जन्माला घालणे, आणि त्यांचे पालन पोषण करणे, यालाही वेळ नाही.  परिणामी सर्व गावच वृद्धांचे आहे.  याच गावात कुरनोसुके काटोचा जन्म झाला. आता त्यालाही वर्ष होत आले तरी या छोट्या कुरनोसुकेचा जन्मसोहळा गावात अजूनही साजरा होतोय.  यातूनच जपानच्या भविष्याबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.  (Baby Born)

जपानच्या ओसाकाच्या उत्तरेकडील इचिनोनो नावाच्या एका छोट्याशा गावात एका बाळाचा जन्म (Baby Born) झाला. बाळाचा जन्म होणे, ही आपल्याकडे साधारण गोष्ट मानली जाते.  मात्र जपानच्या या गावात तब्बल 20 वर्षानंतर बाळाचा जन्म झाला आहे.  कुरनोसुके काटो असं त्या बाळाचं नाव ठेवण्यात आलं आहे.  काटो आता एक वर्षाचा होत आला आहे.  तरीही या गावातील नागरिक त्याच्या जन्माचा सोहळा साजरा करत आहेत. फारकाय अनेकांना त्याच्यावर कविताही लिहिल्या आहेत.  या गावात फक्त 53 नागरिक राहत आहेत.  या सर्वांसाठी लहानगा कुरनोसुके काटो हा स्टार आहे.   या काटोला खेळण्यासाठी या गावक-यांनी मातीच्या छोट्या बाहुल्या तयार केल्या आहेत.  या सर्वांसाठी हा एक लहानगा आनंदाचा ठेवा झाला आहे.  कुरनोसुके काटोच्या वडिलांचे नाव तोशिकी आणि आईचे नाव रे आहे.  तोशिकी हे याच गावातील रहिवासी आहेत.  शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी आयटी कंपन्यांसाठी सल्लागार म्हणून काम सुरु केले.  ते आणि त्यांची पत्नी हे शहरात स्थायिक झाले.  शहरीभागातील व्यस्त अशा वेळापत्रकात त्यांना त्यांचे कुटुंब वाढवण्याचा विचारही करता आला नव्हता. मात्र कोरोनाच्या काळात या कुटुंबानं ग्रामिण भागात परत जाण्याचा विचार केला. त्यानंतर शहर सोडून तोशिकी गावात स्थायिक झाले.  आता त्यांना मुलगा झाला आहे.  ग्रामिण भागात सुविधा कमी असल्या तरी मुलांचे बालपण येथे सुखकर आहे, असे त्यांना वाटते. मात्र कुरनोसुकेच्या पालकांना आता त्याच्या वयाचे मित्र सापडतील की, नाही याची काळजी वाटत आहे. पण या गावातील सर्व नागरिक नित्यनेमानं कुरनोसुकेला भेटायला जातात आणि त्याला खेळवण्याचा प्रयत्न करतात. (Baby Born) 

==========

हे देखील वाचा : भारताप्रमाणेच ‘या’ देशात साजरा करतात पितृपक्ष

==========

जपानमध्ये लोकसंख्या वाढवण्यासंदर्भात आता सरकार काम करत आहे.  तरुणांना लग्न झाल्यावर ग्रामिण भागात स्थायिक होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.  जपानी सरकारच्या एका अहवालानुसार 32 टक्के जपानी पुरुष आणि 24 टक्के महिलांनी लग्न केलेले नाही. वार्षिक विवाहांची संख्या 1970 च्या तुलनेत निम्मी आहे,  परिणामी जपानचा जन्मदरही कमी झाला आहे.  जपानमध्ये 2022 सालामध्ये 800,000 पेक्षा कमी मुलांचा जन्म झाला.  लोकसंख्येमध्ये अर्धा दशलक्षाहून अधिक घट झाली. 2014 च्या अंदाजानुसार अंदाजे 38% जपानी लोकसंख्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाची होती. 2050 पर्यंत, जपानमधील अंदाजे एक तृतीयांश लोकसंख्या 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाची असणार आहे.  यामुळे काही वर्षानंतर जपानचे अस्तित्वच संपूण जाईल अशी भीती आहे.  

सई बने 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.