डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाला, काटक शरीरयष्टी, या शहराच्या इतिहासातील किंबहुना गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्वाचे नाव, बाकीचे सगळे डॉन देशाबाहेर पळून गेले, मात्र तो मुंबईतच राहून आपल्या मराठी लोकांच्या पाठीशी उभा राहिलेला, चाळीच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाला पोलिसांच्या आधी न्याय देणारा दगडी चाळीचा रॉबिन हूड, म्हणजेच अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’. (Daagdi Chaawl 2)
बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या ‘दगडी चाळ’मधील ‘चुकीला माफी नाही’, असे म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी यांचा दबदबा सर्वांनीच अनुभवला. नुकतीच सोशल मीडियाद्वारे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली असून मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तुफान कोसळणारा पाऊस आणि अनेक लोकांच्या घोळक्यातून समोर येणारे अरुण गुलाब गवळी म्हणजेच मकरंद देशपांडे यांची दमदार एन्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहे, हे नक्की.
संगीता अहिर यांनी यापूर्वी चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडमध्ये निर्माती म्हणून नावलौकिक मिळवल्यानंतर संगीता अहिर यांनी ‘दगडी चाळ’च्या निमित्ताने मराठी चित्रपटांच्या निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता त्या ‘दगडी चाळ’चा सिक्वेल घेऊन सज्ज झाल्या आहेत.
====
हे देखील वाचा: गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डियर मॉली’ १ जुलैला होणार प्रदर्शित
====
चित्रपटाच्या घोषणेबद्दल निर्मात्या संगीता अहिर म्हणतात, ”आज आम्हाला ‘दगडी चाळ २’च्या प्रदर्शनाची घोषणा करताना विशेष आनंद होत आहे. ‘दगडी चाळ’ला प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही या चित्रपटाचा सिक्वेल करण्याचा विचार केला. प्रेक्षकांसोबतच मलाही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आहे. हा चित्रपट एकाच वेळी वर्ल्डवाइड रिलीज करण्याचा आमचा मानस आहे.” आता ‘दगडी चाळ २’ मध्ये प्रेक्षकांना नक्की काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.