Home » जागतिक पर्यावरण दिन: पन्नास वर्षांपूर्वीची थीम या वर्षी पुन्हा ठेवली कारण… 

जागतिक पर्यावरण दिन: पन्नास वर्षांपूर्वीची थीम या वर्षी पुन्हा ठेवली कारण… 

by Team Gajawaja
0 comment
World Environment Day2022
Share

आज ५ जून! आज जागतिक पर्यावरण दिन! खरंतर असं कुठला दिवस हा ‘पर्यवारण दिन’ म्हणून पाळावा हे थोडं विचित्र आहे. आपण सजीव ज्या पृथ्वी नावाच्या ग्रहावर राहतो, तिथे पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून आणि ज्या निसर्गाच्या सानिध्यात राहतो तिथे तो टिकून राहावा म्हणून प्रयत्नशील होण्यासाठी हा ५ जून दिवस पर्यावरण दिवस म्हणून पाळला जातो. 

“झाडे लावा… झाडे जगवा”, असं आपण म्हणतो. पण कृतीत आणणं हे या ठिकाणी महत्वाचं आहे. असं जरी असलं तरीही पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ५ जूनला महत्त्व आहे. (World Environment Day 2022)

औद्योगीक क्रांती झाल्यानंतर पर्यावरण या विषयाबदल जगात बोललं जाऊ लागलं. उद्योगधंदे वाढले. नवीन शोध लागले. कच्या मालासाठी आणि व्यापार वाढावा यासाठी ईस्ट इंडिया कंपनी सारख्या राजकीय कंपन्या भारतासारख्या देशात पाय रोवू लागल्या. त्यांनी वसाहती स्थापन केल्या. ‘व्यापार ते राजकारण’ व्हाया ‘भारत’ असं आपण या ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रवासाबद्दल बोलू शकतो. तर युरोपमध्ये जन्मलेल्या आणि जगभर प्रवास केलेल्या या औद्योगिक क्रांती नावाच्या घटकापासून पर्यावरणाचा ऱ्हास सुरू झाला, असं मानलं जातं. 

१९७० च्या दशकात पर्यावरण विषयक चळवळीने वेग धरला आणि ती वेगात सर्व जगभर पसरली. संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाने ५ जून १९७२ रोजी पर्यावरणाच्या वाढत चाललेल्या समस्येबद्दल उपाययोजना करण्यासाठी, तसंच जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस ‘पर्यवारण दिन’ म्हणून जगभर साजरा करायचं ठरवलं. (World Environment Day 2022)

सौजन्य: गुगल

स्टॉकहोम (स्वीडन) इथे ५ जून १९७२ मध्ये भरलेल्या बैठकीदारम्यान हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून गणला जावा, असं ठरलं. आज ५ जून २०२२ ला या घटनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने आजच्या दिवसाला विशेष महत्व आहे. १९७२ पासून दरवर्षी एक थीम ठरवून हा दिवस साजरा केला जाऊ लागला. १९७२ ला थीम होती ‘ओन्ली वन अर्थ’ (Only One Earth)! 

‘ओन्ली वन अर्थ’ म्हणजे आपण जिथे राहतो ती एकच जागा आपल्यासाठी राहण्यायोग्य आहे. पृथ्वी हे आपलं एकमेव घर आहे. आज ५० वर्ष झाली तरीही पर्यावरणाशी निगडीत समस्या सुटलेल्या नाहीत, उलट दिवसेंदिवस क्लिष्ट होत चालल्या आहेत. हवामान बदल, जागतिक तापमानवाढ यासारखे कळीचे विषय आज चर्चिले जाऊ लागले आहेत. ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे कार्बन डायओक्साइड, कार्बन मोनोक्सईड यांचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे प्रदूषण वाढीस लागलं आहे. 

या सगळ्याचा विचार मनात ठेवून ५ जून २०२२ ला ‘ओन्ली वन अर्थ’ ही थीम ठेवण्यात आली आहे. मागच्या पन्नास वर्षात फार काही विशेष घडलं नाही किंवा समस्या अजून तशाच आहेत, हे अधोरेखित करण्यासाठी १९७२ सालचीच थीम २०२२ लाही ठेवण्यात आली आहे. (World Environment Day 2022)

संयुक्त राष्ट्रांच्या अजेंडावर शाश्वत विकास तसंच पर्यावरण संरक्षण यासारखे विषय उपाय योजनांच्या केंद्रस्थानी आहेत. जवळपास १४३ देशानी याला पाठिंबा दिला आहे. पर्यावरण पूरक आर्थिक प्रारूप हे शाश्वत विकासासाठी आवश्यक आहे आणि यासाठी ठोस स्वरूपाच्या उपाय योजना करणेसुद्धा आवश्यक आहे. 

सौजन्य: गुगल

कोळसा आणि तेल या दोन घटकांमुळे पर्यावरणावर आघात होतो आणि नेमकं त्याबद्दल काही उपाय योजना करता येतील का, याविषयी संशोधन चालू आहे. याला काही तज्ज्ञांनी उत्तर शोधलं आहे ते म्हणजे दळणवळणासाठी आवश्यक असणाऱ्या गाड्यांमध्ये, मग त्या सार्वजनिक मालकीच्या बसेस असोत किंवा खाजगी वाहनं असोत, त्यात इंधन म्हणून विजेचा वापर करावा. थोडक्यात हायब्रिड कार्सची निर्मिती करणं, हे लक्ष्य समोर ठेवून त्यावर कार्यवाही सुद्धा झाली आहे. (World Environment Day 2022)

विकसित देश यात अग्रेसर आहेत. या पाश्चिमात्य देशांमुळेच पर्यावरणाची समस्या गंभीर बनली आहे. पण विकसित देश विकसनशील देशांनाही तितकंच जबाबदार धरत आहेत. भारत आणि चीनसारखे देश या समस्येला जबाबदर आहेत, अशाप्रकारची विधानंही आंतरराष्ट्रीय स्तरावर केली गेली आहेत. पण खरं म्हणजे औद्योगीक विकास हा विकसित देशांमध्ये ज्यास्त झाला, मोठे उद्योगधंदे आधी तिथेच उभे राहिले त्यासाठी जंगलतोड तिथेच झाली. पण यासाठी विकसनशील देशांमुळे खास करून भारतासारख्या देशामुळे  प्रदूषण वाढल्याचा आरोप नेहमी केला जातो आणि ही न कळण्याजोगी बाब आहे.

==========

हे ही वाचा: शिक्षणासाठी वय नसतं ‘या’ आजींनी करुन दाखवल सिद्ध

==========

वरील विवादाचा मुद्दा बाजूला ठेवल्यास साऱ्या मानव जातीला पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी त्वरित आणि कार्यक्षम उपाय योजनांची आवश्यकता आहे. त्यासाठी वैयक्तिक स्तरावर आणि सार्वजनिक स्तरावर पावलं उचलणं गरजेचं आहे. तापमान वाढीसारख्या समस्या तर महारौद्र रूप धारण करतात की काय, अशी परिस्थिती आहे. समुद्राची पातळी वाढतेय, काही ठिकाणी पुर, तर काही ठिकाणी दुष्काळ अशा परस्परविरोधी पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत आणि याला कुठलाही देश आता अपवाद नाही. (World Environment Day 2022)

पर्यावरणाच्या बाबतीत विकसित देश आणि विकसनशील देश असा भेद न करता सगळ्या देशानी ठोस पावलं उचलली, तर येणाऱ्या काळात काही सकारात्मक बदल या बाबतीत दिसू शकतील. याचं कारण पृथ्वी हे सगळ्या सजीवांचं एकच घर आहे…ते सुरक्षित ठेवावं, हा विचार बिंबवून जागतिक पर्यावरण दिवसाला सकारात्मक बनवू या.

– निखिल कासखेडीकर 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.