बॉलिवूडमध्ये जाणे, काम करणे, यश मिळवणे, पैसा कमावणे हे अनेक लोकांचे स्वप्न असते. का नसावे बॉलिवूडची दुनिया आहेच भुरळ पाडण्याजोगी. मात्र या क्षेत्रात जाणे देखील खूप अवघड आहे आणि तिथे गेल्यावर काम मिळवणे, मिळवलेले काम टिकवणे तर अधिकच अवघड आहे. या क्षेत्रात ज्यांना ज्यांना करिअर करण्याची इच्छा आहे त्या सर्वांना प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावाच लागतो. तुमच्यात कितीही प्रतिभा असली तरी मेहनत, चिकाटी आणि संघर्षाशिवाय इथे काहीच मिळत नाही. अनेकांना वाटते की कलाकारांच्या मुलांना इथे खूप सहज सर्व मिळत असेल. मात्र असे नाही संघर्ष त्यांना देखील चुकलेला नाही. आपण अनेकदा कलाकारांच्या संघर्षाबद्दल ऐकले, पाहिले आहे. बॉलिवूडमधील अभिनेता विवेक ओबेरॉय देखील संघर्ष करूनच पुढे आला आहे. आता तुम्ही म्हणाला की, विवेकचे वडील इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये उत्तोमोत्तम भूमिका साकारत नावलौकिक कमावला, असे असूनही त्यांच्या मुलाने खरंच संघर्ष केला? खुद्द विवेकनेच एका मुलाखतीमध्ये त्याच्या संघर्षाबद्दल सांगितले होते.
बॉलिवूडमध्ये अनेक चांगल्या चित्रपटांमधून आपल्या प्रभावी अभिनयाने लोकांची मने जिंकणाऱ्या विवेकने एका मुलाखतीमध्ये त्याला त्याचा पहिला ‘कंपनी’ सिनेमा मिळवण्यासाठी काय काय करावे लागले याबद्दल सांगितले. तो म्हणाला की. “मला माहित नाही की मी ‘कंपनी’ला निवडले की ‘कंपनी’ने मला निवडले. त्यावेळी मला सर्वच लोकं सांगत होते की, मी खूपच मोठी चूक करत आहे. मी न्यूयॉर्कमधून माझे शिक्षण पूर्ण करून आलो. त्याआधीच लोकांनी माझ्याबद्दल मत ठरवले होते की, माझे वडील मला एका सिनेमातून लाँच करतील. माझ्या वडिलांनी मला एका सिनेमासाठी साईन केले होते, ज्याचे निर्माते अब्बास मस्तान होते. मला हे समजले आणि माझी झोपच उडाली. कारण मला माझ्या वडिलांचे डोके अजिबात माझ्यामुळे खाली गेलेले पाहायचे नव्हते. माझ्यासाठी माझे वडील माझे आदर्श होते, आणि मला त्यामुळे भीती वाटायची की मी यशस्वी नाही झालो तर?”
पुढे विवेक म्हणाला की, “एक दिवस मी उठलो आणि माझ्या वडिलांना सांगितले की मी तो सिनेमा नाही करू शकत. मला माझ्या योग्यतेवर संघर्ष करत काम मिळवायचे आहे. त्या दिवसानंतर मी वेगवेगळ्या दिग्दर्शक, निर्मात्यांना भेटण्यास सुरुवात केली. अनेक ऑडिशन्स दिल्या. यासाठी मला १५/१६ महिने लागले. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मी माझे आडनाव देखील सोडले. कारण मला माझ्या वडिलांच्या नावावर काम मिळवायचे नव्हते. मला माझ्या योग्यतेवर काम पाहिजे होते. माझ्यासाठी माझ्या करिअरसाठी तो खूपच नाजूक काळ होता. एके दिवशी मला समजले की, राम गोपाळ वर्मा ‘कंपनी’ नावाचा चित्रपट बनवत आहे आणि मी त्यांना भेटण्यासाठी गेलो. आणि नशिबाने मला त्यात भूमिका मिळाली.”
=======
हे देखील वाचा – उत्तम कथा आणि कलाकारांच्या दर्जेदार अभिनयामुळे प्रेक्षकांचे मनं जिंकणारे ‘हे’ शो टीव्हीवर जास्त काळ धरू शकले नाही तग
=======
या मुलाखतीमध्ये विवेकने त्याच्या लव्हलाइफबद्दल देखील भाष्य केले. तो म्हणाला की, “मी एवढ्या मुलींना डेट केले तरीही मी स्वतःला नेहमीच एकटे पाहिले. मी खूप चिडचिड करत होतो. मला फक्त कॅज्युअल राहायचे होते. प्रेमात मिळालेल्या इतक्या वाईट अनुभवानंतर आता मी माझ्या पत्नीसोबत खूपच खुश आहे.” विवेकने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. विविध भूमिका साकारत त्यात असणारा सक्षम अभिनेता लोकांसमोर उभा केला. आता लवकरच तो ‘कडूवा’ सिनेमात दिसणार आहे.