Home » Ayatollah Arafi: सर्वोच्च नेते अयातुल्ला अलिरेझा अराफी आणि पहिला फतवा

Ayatollah Arafi: सर्वोच्च नेते अयातुल्ला अलिरेझा अराफी आणि पहिला फतवा

by Team Gajawaja
0 comment
Share

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर, नवीन नेता निवडला जाईपर्यंत अयातुल्ला अलिरेझा अराफी यांच्या हाती इराणची धुरा सोपवण्यात आली आहे. अयातुल्ला अलिरेझा अराफी हे नेतृत्व परिषदेचे सदस्य म्हणून काम करतील. या परिषदेत राष्ट्रपती आणि मुख्य न्यायाधीश यांचाही समावेश आहे. यासोबतच इराणने पवित्र शहर कोममधील जमकरन मशिदीच्या घुमटावर “लाल झेंडा” फडकवला आहे. शिया परंपरेनुसार हा लाल झेंडा सूड आणि रक्तबदल्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळेच अराफी यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका आणि इस्रायलविरोधात इराण कठोर पावले उचलणार का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. यापूर्वी २०२० मध्ये कासिम सुलेमानी आणि २०२४ मध्ये इस्माईल हानिया यांच्या मृत्यूनंतरही जमकरन मशिदीवर लाल झेंडा फडकवण्यात आला होता. त्यामुळे खामेनी यांच्या मृत्यूनंतर अराफी बदला घेण्यासाठी मध्यपूर्वेत कारवाई करतील की अमेरिका इराणमध्ये राजकीय बदल घडवण्याचा प्रयत्न करेल, हे लवकरच स्पष्ट होईल. ( Ayatollah Arafi )

अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर मध्यपूर्वेतील तणाव अधिक तीव्र झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणमधील अनेक शहरांना लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवायांमध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. खामेनी यांच्या निधनानंतर अयातुल्ला अलिरेझा अराफी यांची इराणचे नवे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तज्ञांच्या सभेने कायमस्वरूपी सर्वोच्च नेता निवडेपर्यंत अराफी हे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान आणि मुख्य न्यायाधीशांसोबत देशाचे नेतृत्व करणार आहेत. अराफी सध्या पालक परिषदेचे सदस्य आहेत. अयातुल्ला अलिरेझा अराफी यांचा जन्म १९५९ मध्ये इराणमधील मेयबोद, यझद प्रांत येथे झाला. ते वरिष्ठ शिया धर्मगुरू असून त्यांनी इराणमधील प्रभावशाली पालक परिषद आणि तज्ञांच्या सभेचे सदस्य म्हणून काम केले आहे. अराफी यांनी इराणच्या मदरशांचे प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध अल-मुस्तफा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती म्हणूनही काम केले आहे. त्यांना “अयातुल्ला” ही पदवी प्राप्त झाली आहे. शिया परंपरेत ही अत्यंत उच्च धार्मिक पदवी मानली जाते. इराणमध्ये सर्वोच्च नेता होण्यासाठी अयातुल्ला असणे आवश्यक असते. अराफी यांनी मेयबोदमध्ये शुक्रवारच्या नमाजाचे इमाम म्हणून काम केले आहे. २०१३ पासून ते कोम येथे शुक्रवारच्या नमाजाचे नेतृत्व करत आहेत. २०१९ मध्ये ते पालक परिषदेचे सदस्य झाले.

=======

हे देखील वाचा : Iran Targeting Dubai: …म्हणून इराणनं दुबईला केलं लक्ष

=======

अराफी यांची जमेची बाजू म्हणजे ते अयातुल्ला खामेनी यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. इस्लामिक संस्कृतीच्या विस्ताराचे ते कट्टर समर्थक आहेत. त्यांची विचारसरणी “विलायत-ए-फकीह” या तत्त्वावर आधारित आहे, ज्याचा अर्थ “सर्वोच्च धार्मिक नेतृत्वाचे शासन” असा होतो. अराफी हे इस्रायल आणि अमेरिकेचे टीकाकार मानले जातात. खामेनी यांच्या मृत्यूनंतर बदला घेण्याबाबत त्यांनी कठोर भूमिका घेतल्याचे वृत्त आहे. इराणमधील आंदोलनांचे दमन करण्यातही त्यांची भूमिका असल्याचे सांगितले जाते. इस्लामिक तत्त्वांवर आधारित कठोर शासन पद्धतीसाठी ते आग्रही राहिले आहेत. खामेनीप्रमाणेच अराफी हे हमास, हिजबुल्लाह आणि हुथी बंडखोरांच्या समर्थनाबाबत ओळखले जातात. कट्टर विचारसरणी असूनही ते आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचे समर्थक आहेत. धार्मिक संस्थांनी इस्लामिक संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे त्यांनी अनेकदा म्हटले आहे. सध्या अयातुल्ला अलिरेझा अराफी यांच्याकडे इराणचे तात्पुरते नेतृत्व सोपवण्यात आले आहे. कायमस्वरूपी सर्वोच्च नेता निवडला जाईपर्यंत देशाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर जमकरन मशिदीवर लाल झेंडा फडकवण्यात आल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचे मानले जात आहे. हा झेंडा रक्तबदल्याचे प्रतीक असल्यामुळे इराणची पुढील भूमिका काय असेल, याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे. ( Ayatollah Arafi )

– सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.