Home » Kusumagraj : मराठी भाषा गौरव दिन – कुसुमाग्रज यांच्या जगप्रसिद्ध कविता

Kusumagraj : मराठी भाषा गौरव दिन – कुसुमाग्रज यांच्या जगप्रसिद्ध कविता

by Jyotsna Kulkarni
0 comment
Kusumagraj
Share

आज २७ फेब्रुवारी, म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जेष्ठ आणि श्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा सर्वत्र मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज हे एक प्रसिद्ध मराठी कवी, नाटककार, कादंबरीकार, लघुकथाकार आणि मानवतावादी होते. त्यांनी १६ कविता खंड, तीन कादंबऱ्या, आठ लघुकथा खंड, सात निबंध खंड, १८ नाटके आणि सहा एकांकिका लिहिल्या होत्या. वि. वा. शिरवाडकर यांनी मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी मराठीला ज्ञानभाषा बनवण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. आज त्यांच्या जन्मदिनी आणि मराठी भाषा गौरव दिनी कुसुमाग्रजांच्या अतिशय गाजलेल्या कविता आपण पाहूया. (Kusumagraj poem)

कणा
‘ओळखलत क सर माला?’ पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,

‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिख्लगाळ काढतो आहे ,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा ! (Marathi Poem)
______________________________________________________________________________________________________________________________________

माझ्या मराठी मातीचा
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दर्‍याखोर्‍यांतील शिळा

हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात
नाही पसरला कर, कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान
हिच्या गगनांत घुमे, आद्य स्वातंत्र्याची द्वाही

हिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाही
माझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमान
रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी
चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी

रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर
येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर
माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान
हिच्या दारिद्य्रात आहे, भविष्याचे वरदान
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील, मायदेशांतील शिळा (Kusumagraj)
______________________________________________________________________________________________________________________________________

माझं मराठीपण
माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात
संतांच्या शब्दात..इतिहासाच्या पानात
तेव्हा हसून सारीजण म्हणलीत
आम्ही शोधलं आमचं मराठीपण
या भूमीवरील माणसांच्या मनात
त्यांच्या जखमात.. त्यांच्या रक्तात
त्यातून उसवतात सूर्याची किरणे
मराठीपण ओलांडून
सार्‍या आकाशाला गवसणी घालणारे (Marathi)
______________________________________________________________________________________________________________________________________

कोलंबसाचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?

कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
“अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!” (Marathi Bhasha Din)
______________________________________________________________________________________________________________________________________

सागर
आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे
निळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेसफुलांचे सफ़ेद शिंपित वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे

मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती

संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

तुफान केव्हा भांडत येते सागरही गर्जतो
त्या वेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

दर्यावरची रंगीत मखमल उचलुन घेते कुणी
कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी

दूर टेकडीवरी पेटती निळे तांबडे दिवे
सांगतात ते मजला आता घरी जायला हवे (Latest Marathi News)
______________________________________________________________________________________________________________________________________

तिमिरातुनी तेजाकडे
तिमिरातुनी तेजाकडे…
तिमिरातुनी तेजाकडे
ने दीपदेवा जीवना ॥

ज्योतीपरी शिवमंदिरी
रे जागवी माझ्या मना ॥

दे मुक्तता, भयहीनता
अभिमान दे, दे लीनता
दे अंतरा शुभदायिनी
मलयनिलासम भावना ॥ (Top Marathi News)
______________________________________________________________________________________________________________________________________

अनंत
एकदा ऐकले
काहींसें असें
असीम अनंत
विश्वाचे रण
त्यात हा पृथ्वीचा
इवला कण
त्यांतला आशिया
भारत त्यांत
छोट्याशा शहरीं
छोट्या घरांत
घेऊन आडोसा
कोणी ‘मी’ वसें
क्षुद्रता अहो ही
अफाट असें!
भिंतीच्या त्रिकोनी
जळ्मट जाळी
बांधून राहती
कीटक कोळी
तैशीच सारी ही
संसाररीती
आणिक तरीही
अहंता किती?
परंतु वाटलें
खरें का सारें?
क्षुद्र या देहांत
जाणीव आहे
जिच्यात जगाची
राणीव राहे!
कांचेच्या गोलांत
बारीक तात
ओतीत रात्रीत
प्रकाशधारा
तशीच माझ्या या
दिव्याची वात
पाहते दूरच्या
अपारतेंत!
अथवा नुरलें
वेगळेंपण
अनंत काही जें
त्याचाच कण!
डोंगरदऱ्यांत
वाऱ्याची गाणीं
आकाशगंगेत
ताऱ्यांचे पाणीं
वसंतवैभव
उदार वर्षा
लतांचा फुलोरा
केशरी उषा….
प्रेरणा यांतून
सृष्टीत स्फुरे
जीवन तेज जें
अंतरी झरे
त्यानेच माझिया
करी हो दान
गणावे कसे हें
क्षुद्र वा सान? (Latest Marathi Headline)
______________________________________________________________________________________________________________________________________

पाचोळा
आडवाटेला दूर एक माळ
तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास

उषा येवो शिंपीत जीवनासी
निशा काळोखी दडवु द्या जगासी
सूर्य गगनातुनि ओतु द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा

तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मुठभर ते गवतही मजेने
वाटसरु वा तुडवीत त्यास जात
परि पाचोळा दिसे नित्य शांत

आणि अंती दिन एक त्या वनांत
येइ धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरुनी तयाते
नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठे

आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी (Top Trending News)
______________________________________________________________________________________________________________________________________

जोगीण
साद घालशील
तेव्हाच येईन
जितकं मागशील
तितकच देईन

दिल्यानंतर
देहावेगळ्या
सावलीसारखी
निघून जाईन.

तुझा मुगुट
मागणार नाही
सभेत नातं
सांगणार नाही

माझ्यामधल्या
तुझेपणात
जोगीण बनून
जगत राहीन. (Top Stories)
______________________________________________________________________________________________________________________________________

ऋण
पदी जळत वालुका
वर उधाणलेली हवा
जळास्तव सभोवती
पळतसे मृगांचा थवा

पथी विकलता यदा
श्रमुनि येतसे पावला
तुम्हीच कवी हो, दिला
मधुरसा विसावा मला !

अहो उफळला असे
भवति हा महासागर
धुमाळुनि मदांध या
उसळतात लाटा वर,

अशा अदय वादळी
गवसता किती तारवे
प्रकाश तुमचा पुढे
बघुनि हर्षती नाखवे !

असाल जळला तुम्ही
उजळ ज्योति या लावता
असाल कढला असे,
प्रखर ताप हा साहता,

उरात जखमातली
रुधिर-वाहिनी रोधुनी
असेल तुम्हि ओतली
स्वर-घटात संजीवनी !

नकोत नसली जरी
प्रगट स्मारकांची दळे
असंख्य ह्रदयी असती
उभी आपुली देवळे (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.