कृष्णनगरी वृंदावनमध्ये वर्षाचा प्रत्येक दिवस उत्साहाचा असतो. त्यातही होळीचा उत्सव वृंदावन, मथुरा, गोकूळ आणि बरसाना येथे तब्बल चाळीस दिवस साजरा होतो. वृंदावनातील होळी हा केवळ रंगांचा उत्सव नाही, तर भगवान कृष्ण आणि राधा यांच्या शाश्वत प्रेमाचा आणि दिव्य लीलांचा उत्सव म्हणून साजरा होतो. भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक असलेल्या या होळीच्या रंगामध्ये ही ब्रजभूमी रंगून जाते. या चाळीस दिवसांत अवघ्या ब्रजभूमीत लठमार होळी, फूल होळी, लड्डू होळी आणि हुरंगा यातून उत्सव साजरा होतो. या अनोख्या होळीची सुरुवात फुलांच्या होळीपासून होते. गुलाब आणि झेंडूच्या पाकळ्यांनी होळी खेळून या उत्सवाची सुरुवात होते. वृंदावनमध्ये फुलांची होळी प्रामुख्याने बांके बिहारी मंदिरात एकादशीला साजरी केली जाते. जगप्रसिद्ध लठमार होळीनंतर ही फुलांची होळी खेळली जाते. ( Braj Holi Vrindavan )

यावर्षी २८ फेब्रुवारी रोजी बांके बिहारी मंदिरामध्ये फुलांची होळी सुरुवातीला खेळली जाईल. त्यानंतर अवघ्या ब्रजभूमीतील मंदिरांमध्ये ही फुलांची होळी खेळण्यात येईल. या फुलांच्या होळीसाठी आता ब्रजभूमी सज्ज होत आहे. यासाठी सर्वच प्रमुख मंदिरांमध्ये सजावटीचे काम सुरू झाले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात फुले आणण्यात येत असून आत्तापासून फुलांच्या माळांनी मंदिरे सजवली जात आहेत. त्यामुळे अवघी ब्रजभूमी फुलांच्या सुवासाने भरून गेली आहे. वृंदावन आणि बरसाना येथील फुलांची होळी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे दाखल होत आहेत. सोबत परदेशी पर्यटकांची संख्याही मोठी आहे. फेब्रुवारी महिना सुरू झाला की अवघ्या ब्रजभूमीत होळीच्या सणाचे वेध लागतात. भगवान कृष्णाच्या या नगरीत होळीचा सण चाळीस दिवस साजरा केला जातो. लठमार होळीनंतर वृंदावनमध्ये फुलांची होळी खेळली जाते. येथे भगवान कृष्णाला रंगाचा कोणताही त्रास होऊ नये म्हणून फुलांच्या होळीची सुरुवात झाली. आता वृंदावनसह मथुरा, गोकूळ आणि बरसानामध्येही मोठ्या प्रमाणात फुलांची होळी खेळली जाते.
यावेळी गुलाब, मोगरा आणि झेंडूच्या पाकळ्यांचा वापर केला जातो. शिवाय याच फुलांपासून बनवलेल्या अत्तराचाही शिडकाव करण्यात येतो. त्यामुळे ही फुलांची होळी अनुभवण्यासाठी वृंदावनमध्ये कृष्णप्रेमींची मोठी गर्दी होते. वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात ही फुलांची होळी सर्वप्रथम खेळली जाते. त्यानंतर निधीवन, राधारमण मंदिर आणि इस्कॉन मंदिरातही मोठ्या प्रमाणात फुलांची होळी खेळली जाते. काही पौराणिक कथेनुसार राधा आणि कृष्ण फुलांची होळी खेळत असत. भक्ती आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून वृंदावनवासी आजही ही परंपरा पाळतात. यासाठी वृंदावनमधील सर्वच प्रमुख मंदिरांमध्ये तयारी सुरू झाली आहे. येथील बांके बिहारी मंदिर हे सर्वात मुख्य मंदिर मानले जाते. या मंदिरामध्ये २८ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान फुलांची होळी साजरी करण्यात येईल. तसेच वृंदावनच्या इस्कॉन मंदिरातही याच दरम्यान फुलांची होळी साजरी करण्यात येईल. यासोबत येथे भजन, कीर्तन आणि नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. वृंदावन येथील आणखी एक लोकप्रिय मंदिर म्हणजे राधा रमण मंदिर. या मंदिरामध्येही फुलांची होळी साजरी होणार आहे. ( Braj Holi Vrindavan )
=======
हे देखील वाचा : Masan Holi : काशीमध्ये जगप्रसिद्ध मशान होळीची तयारी सुरू
=======
मथुरा, वृंदावन आणि भगवान कृष्ण व राधाराणी यांचे निवासस्थान असलेल्या ब्रजमध्ये २५ फेब्रुवारीपासून होळीचा उत्सव सुरू होईल. २५ फेब्रुवारी रोजी बरसाना येथे प्रथम लाडूमार होळी होईल. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी बरसाना येथे लाडूमार होळी साजरी केली जाईल. २७ फेब्रुवारी रोजी नांदगावमध्ये लठमार होळी साजरी होईल. २८ फेब्रुवारी रोजी वृंदावनमध्ये फुलांची होळी साजरी केली जाईल. त्याला फाग असेही म्हणतात. फुलांनी होळी खेळण्यासाठी भाविक दूरदूरून बरसाना येथे जातात. राधा राणीच्या चरणी नमस्कार केल्यानंतर येथे फुलांची होळी सुरू होते. १ मार्च रोजी गोकुळमध्ये लठमार होळी साजरी होईल. त्यानंतर ३ मार्च रोजी होलिका दहन केले जाईल. ४ मार्च रोजी मथुरा ते वृंदावन या संपूर्ण ब्रजमध्ये रंगांची होळी साजरी केली जाईल. ५ मार्च रोजी दौजी मंदिरात हुरंगा होळी साजरी केली जाईल. या सर्व उत्सवासाठी ब्रजभूमीतील सर्वच मंदिरांना आकर्षक फुलांची सजावट सुरू झाली आहे. होळीसाठी यमुना नदीकाठावरील होड्यांचीही सजावट सुरू झाली आहे. पारंपारिक ब्रज गीत गात या होड्यांमध्ये होळी साजरी होणार आहे. वृंदावन येथील या होळी उत्सवाची लोकप्रियता वाढल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. त्यातही बरसाना आणि नांदगाव येथील लठमार होळी पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. ( Braj Holi Vrindavan )
सई बने
