प्रख्यात क्रिकेटपटू, उद्योजक, आणि दानशूर समाजसेवक म्हणून आपल्या हयातीत कीर्ती मिळवलेले कै. विजय मर्चन्ट (ठाकरसी ) हे वारंवार एक विचार मांडत असत. ते नेहमी सांगत की ‘यु शूड रिटायर व्हेन पीपल आस्क यू,व्हाय, अँड नॉट, व्हाय नॉट. विजयभाई हे नुसते ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान ‘ या ढोंगी जमातीतील नव्हते तर ‘बोले तैसा चाले ‘ या दुर्मिळ कॅटॅगरीतील एक आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांनी स्वतः क्रिकेटमधून सन्मानाने निवृत्ती स्वीकारली ती १९५२ मध्ये वयाच्या ४०व्या वर्षी इंग्लंडविरूढ आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या कसोटीत शतक (१५३ धावा) ठोकून आणि म्हणूनच विजयभाईंच्या या वाक्याला ‘ब्रह्मवाक्य’ म्हणणे अप्रस्तुत ठरु नये. आज विजयभाईंच्या वरील संदेशाची आठवण येण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात होऊ घातलेली राज्यसभेची निवडणूक आणि त्यातील शरद पवार यांच्या संभाव्य उमेदवारीवरून आलेले चर्चेचे उधाण. शरद पवार यांनी नेहमीप्रमाणेच स्वतः या विषयी एक ‘ब्र’ही काढलेला नाही पण ‘विश्व प्रवक्ते ‘ महान अंतरज्ञानी आणि आजच्या कली युगातील स्वतःला ‘कळीचे नारद ‘ समजणाऱ्या ‘संजयाने’ एक फुसकुली सोडून दिली की शरद पवार यांची पुन्हा एकदा राज्यसभेवर निवडून जायची इच्छा आहे.

आता ‘संजय उवाच ‘ म्हणजेच अंतिम सत्य मानणाऱ्या मराठी माध्यमानी लगेच ‘दरबारी विश्लेषकांना ‘ मैदानात उतरवून शरद पवारांची ‘भाटगिरी ‘ करण्यास सुरुवात केली आहेच. आता ही ‘चमचेगिरी ‘ ५ मार्च पर्यंत चालू राहील कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ती अंतिम मुदत आहे. शरद पवार यांच्यापेक्षाही अधिक ‘इच्छुक ‘ असलेल्या ‘राजापेक्षा राजनिष्ठ’ असणाऱ्या या माध्यमकर्मीची एकच अडचण झाली आहे ती म्हणजे महाराष्ट्रात सध्याच्या घडीला ‘मृतवत ‘ झालेल्या तथाकथित महाविकास आघाडीला महाराष्ट्र बिधानसभेतील संख्यबलानुसार सातपैकी अवघी एकच जागा मिळू शकते. या एका जागेसाठी माध्यमांचे तीन लाडके दावेदार उभे ठाकले आहेत., ते म्हणजे शरद पवार, उबाठा सेना आणि काँग्रेस. या तीनही दावेदारांपैकी शरद पवार यांच्याविषयी अधिक चर्चा होणे स्वाभाविक आहे. शरद पवार यांचे वय, त्यांची ‘सापशिडी’प्रमाणे असलेली गेल्या साठ वर्षांची राजकीय कारकीर्द आणि राजकीय कुस्त्यांचा असलेला दांडगा अनुभव लक्षात घेता त्यात काही वावगे नाही,पण शरद पवार यांचे बाकीचे स्पर्धक मात्र त्यांचे ‘वय ‘ हा कळीचा मुद्दा मानून त्यांना सुप्त विरोध करीत आहेत. आता ‘वय’ हा एकमेव ‘डिसाईडींग फॅक्टर ‘ मानावा का? या गृहितकला छेद देणारी अनेक उदाहरणे भारताच्या स्वातंत्रोत्तर काळात आढळून येतात.अगदी ताजे उदाहरण घ्यायचे झाले तर भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे देता येईल.
हे देखील वाचा
राजकारणातील झंझावात : शरद पवार
आज किती जणांना माहित आहे की देवेगौडा हे सध्या ९३ वर्षांचे असून राज्यसभेचे सदस्य आहेत. ( त्यांची मुदत पण शरद पवार यांच्या बरोबरच २ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे.) एखाद्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने ते संसदेत रोज उपस्थिती लावतात, कामकाज संपेपर्यंत सभागृहात हजर राहतात आणि प्रत्येक महत्वाच्या विषयावर लिहून आणलेले भाषण चष्मा न लावता वाचून दाखवतात. दुसरे उदाहरण मल्लिकार्जुन खर्गे यांचे देता येईल. त्यांनी वयाची आठ दशके पार केली आहेत पण राहुल गांधींना सुद्धा लाजवेल अशा जोशात ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी पार पाडत आहेत. फारुक अब्दुल्ला शरद पवार यांचे समवयस्क. तेही २०२४ पर्यंत लोकसभेतील कामकाजात सक्रिय होते. याव्यतिरिक्त भूतकाळात असे अनेक नेते होऊन गेले आहेत की ज्यांनी वयाच्या ऐशी वर्षानंतर ते थेट ‘नव्वद्दीत’ सुद्धा अत्यंत कार्यक्षमतेने राज्यशकट चालवला आहे. मोराऱजी देसाई हे वयाच्या ८१व्या वर्षी भारताचे पंतप्रधान झाले होते. प्रकाशसिंग बादल हे ऐन नव्वद्दीत पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडत होते. केरळचे व्ही. अच्युतांनंदन हे सुद्धा नव्वदी पार केल्यावरही राज्याचे मुख्यमंत्री होते. करुणानिधी सुद्धा याच वयात तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते.

वरील विवेचनातून लक्षात येईल की ‘वय’ हे राजकारणात आडकाठी नाही. शरद पवार हे दुर्धर व्याधीने ग्रासले असून सुद्धा त्यांची ऊर्जा व इच्छा शक्ती अमाप आहे. या वयातही ते प्रचंड प्रवास करतात, सभा घेतात हे या इच्छा शक्तीचेच प्रतिक आहे. पण… गेल्या १० वर्षातील शरद पवार यांची राज्यसभेतील कामगिरी काय हा खरा प्रश्न आहे. शरद पवार हे एखाद्या विषयावर बोलताना अभावानेच आढळले, भले बाहेर पत्रकार परिषदेत, सभा संमेलनामध्ये त्यांची वाणी बहुप्रसवा असेल. त्यांची सदनातील उपस्थिती हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.आता उरलो सहीपुरता अशी त्यांची धारणा झाली असावी. बरं, जेव्हा सभागृहात गोंधळ होतो तेव्हा गोंधळी सदस्यांना आवर घालण्याऐवजी ते बघ्याची भूमिका घेऊन गंमत बघताना दिसतात. मग शरद पवार यांचे राज्यसभेत राहण्याचे प्रयोजन काय असा सर्व सामान्य नागरिकांना प्रश्न पडला तर नवल नाही. शरद पवार हे मार्क्सवादी नेते कै. हरकिशनसिंग सुरजीत यांची गादी दिल्लीत चालवण्यासाठी उत्सुक आहेत असे वाटते. आपण राष्ट्रीय राजकारणात संदर्भहीन होऊ नये म्हणून त्यांना राज्यसभेत राहण्यात रस आहे असे दिसते. कै. सुरजीत यांच्याप्रमाणेच दिल्लीत राजकीय डावपेच लढवणे व विरोधकांच्या गोतावळ्यात समन्वयकाची भूमिका बजावण्याची पवारांना हौस आहे. पंतप्रधानपद हे आता ‘आंबट द्राक्षाप्रमाणे पवारांपासून केव्हाच दूर गेले आहे याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. आपण राजकारणातून निवृत्त होणार म्हणून पवारांनी अनेकदा आवई उठवली आहे. कै. अजित पवार, आपल्या काकांच्या या बनावामुळे तोंडघशी पडल्याचा इतिहास फार जुना नाही. पवार राज्यसभेत राहून महाराष्ट्राला किंवा देशाला काही फायदा होत नाही. पवार नेहमी भाकरी फिरवण्याची भाषा करतात पण शरदरावांची स्वतःची भाकरी फ़िरतच नाही, ती तव्याला घट्ट चिकटून बसली आहे., म्हणूनच आता त्यांचे सहकारी पक्ष तसेच महाराष्ट्रातील जनता त्यांना’व्हाय नॉट’? म्हणून प्रश्न विचारू लागली आहे, हे खरं. बघू या, या प्रश्नाचे उत्तर पवार साहेब काय देतात ते.
लेखक – रघुनंदन भागवत
