बांगलादेशातील १३ व्या संसदीय निवडणुकीसाठी मतदान झाले आणि मतमोजणीही. या सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये आधीच ठरल्याप्रमाणे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं बहुमत संपादन केले आहे. त्यामुळे पक्षाचे नेते तारिक रहमान हे उद्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. निवडणुकीत बीएनपीसाठी जमात-ए-इस्लामी चे मोठे आव्हान होते. २०२४ चे सत्ता परिवर्तन आणि शेख हसीना यांच्या पंतप्रधानपदाच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थी चळवळीतील नेतेही पुढे आले होते. पण या सर्वांवर मात करत माजी पंतप्रधान दिवंगत बेगम खालिदा झिया यांचा पक्ष असलेला बीएनपी, जवळजवळ २० वर्षांनी सरकार स्थापन करू शकणार आहे. बांगलादेशमध्ये झालेली ही सर्व निवडणूक प्रक्रिया आधीच ठरवल्यासारखी झाल्याचा आरोपही होत आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीगला निवडणूक लढवण्यास बंदी होती. त्यामुळे तारिक रहमान यांनी जवळपास एकतर्फी बांगलादेशची सत्ता मिळवली आहे. ( Tarique Rahman )

या निवडणुकीतील विजयाचा उत्सव साजरा करण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे. आपल्या आईला, बेगम खालिदा झिया यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी आज सर्वच प्रार्थनास्थळांवर प्रार्थना आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. इथूनच बांगलादेशच्या राजकारणात डार्क प्रिन्स या नावानं ओळखल्या गेलेल्या तारिक रहमान यांचा आता पंतप्रधान पदाचा सुरु झाला आहे. निवडणूक प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याबाबत होणा-या आरोपांना त्यांना भविष्यात उत्तर द्यावे लागणार आहेच. शिवाय जमात-ए-इस्लामी सारख्या कडव्या विचारधारेच्या विरोधी पक्षालाही सांभाळावे लागणार आहे. बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या आहेत. तेथील जनतेने कट्टरपंथी गटाला पूर्णपणे नाकारले आहे. जमात-ए-इस्लामी आणि विद्यार्थी चळवळीतील विद्यार्थी नेत्यांचा जबर पराभव झाला आहे. बीएनपी आणि तारिक रहमान यांच्या विजयानं भारत-बांगलादेश संबंध सुधारतील का यावर चर्चा सुरु झाली आहे. शिवाय तेथील हिंदूंवर होणारे हल्ले थांबतील का, हा प्रश्नही विचारला जात आहे.
मात्र प्रत्यक्षात बांगलादेशमधील निवडणूकांचे जे चित्र दिसते, त्यापेक्षा वेगळे चित्र पडद्यामागे आहे. बांगलादेशची सत्ता आता तारिक रहमान यांच्या हाती आली तरी त्यामध्ये युनूस मोहम्मद यांची भूमिका काय राहिल, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. कारण ही सर्व निवडणूक प्रक्रिया युनूस यांच्या सूचनांनुसार कार्यरत होती, त्यामुळेच अवामी लीगवर यात बंदी घालण्यात आली. परिणामी एकतर्फी मतदान झाले आणि तारिक रहमान हे विजयी झाले. पबांगलादेशचा कारभार एकहाती तारिक रहमान यांच्याकडे येईल का, याबाबत शंका उपस्थित होत आहेत. या सर्वात डार्क प्रिन्स या नावानं ओळखले जाणारे तारिक रहमान हे गेली १७ वर्ष बांगलादेशच्या राजकारणापासून प्रत्यक्षात वेगळे राहिले आहेत. आता खालिदा झिया यांची प्रकृती खालावल्यावर ते बांगलादेशमध्ये परत आले असले तरी, रहमान यांना त्यांच्यावर लागलेला डार्क प्रिन्स हा शिक्क पुसणे कठीण जाणार आहे. ( Tarique Rahman )
२० नोव्हेंबर १९६५ रोजी जन्मलेले तारिक रहमान हे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी चे एक वरिष्ठ नेते आणि अध्यक्ष आहेत. त्यांनी ढाका विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि राजकारणात सक्रिय भूमिका बजावण्यास सुरुवात केली. त्यांचे वडील झियाउर रहमान हे बांगलादेशचे अध्यक्ष आणि एक प्रमुख स्वातंत्र्य कार्यकर्ते होते. त्यांची १९८१ मध्ये हत्या झाल्यावर त्यांची आई बेगम खालिदा झिया यांनी बांगलादेशच्या राजकारणात प्रवेश केला. खालिदा झिया यांनी १९९१ ते १९९६ आणि २००१ ते २००६ पर्यंत बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून आणि बीएनपीच्या मुख्य अध्यक्षा म्हणून काम पाहिले. तारिक रहमान हे कायम आपल्या आईसोबत राहिले आहेत. त्यामुळे बांगलादेशाच्या राजकारणाची नस त्यांना माहित असली तरी त्यांच्यावर असलेले भ्रष्टाचाराच्या आरोपांचे भविष्यात विरोधी पक्षाकडून भांडवल करण्यात येईल, अशी शक्यता आहे.
=======
हे देखील वाचा : Shabana Mahmood: इंग्लडला मिळणार पहिली मुस्लिम महिला पंतप्रधान
=======
या सर्वात तारिक रहमान यांची पत्नी झुबैदा रहमान आणि मुलगी झैमा रहमान यांचीही चर्चा सुरु झाली आहे. विशेषतः झैमा ही वकील असून आपल्या आजीचा वारसा चालवण्यासाठी बांगलादेशच्या राजकारणात येण्यास उत्सुक आहे. तारिक रहमान यांची पत्नी झुबैदा या व्यवसायाने डॉक्टर असून सध्या त्या पतीच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांच्या सोबत आहेत. झुबैदा यांचे वडिल हे सैन्यात वरिष्ठ पदावर होते. तारिक यांच्यासोबत त्यांनीही १७ वर्ष बांगलादेशापासून दूर राहणे पसंत केले होते. बांगलादेशमध्ये परत येणे हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले होते. झुबैदा यांनीच तारिक यांच्या निवडणूक प्रचाराची सर्व जबाबदारी सांभाळली आणि बांगलादेशमध्ये महिलांना पुरुषांएवढेच स्थान असल्याचा संदेश कट्टरपंथीयांना दिला. त्याचा फायदा तारिक यांना झाला. यासोबत झैमा रहमानही आपल्या वडिलांसोबत कायम प्रचारात दिसत होती. झैमामुळे बीएनपी पक्षासोबत तरुण वर्ग अधिक जोडला गेल्याचे सांगितले जाते. आता तारिक रहमान हे आपल्या आईचा आणि वडिलांचा वारसा कसा चालवतात, याकडे जगाचे लक्ष रहाणार आहे. भारतासोबत बांगलादेशाचे संबंध कसे असतील याचेही उत्तर काही दिवसात मिळणार आहे. ( Tarique Rahman )
सई बने
