भगवान शंकराच्या भाविकांना वर्षभर एका दिवसाची मोठी प्रतीक्षा असते. तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा. 15 फ्रेब्रुवारी रोजी महाशिवरात्र सर्वत्र साजरी होणार आहे. यासाठी देशभरातील भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जय्यत तयारी सुरु झाली आहे. तामिळनाडूमधील कांचीपुरम येथील प्रसिद्ध एकंबरेश्वर मंदिरही यापैकी एक आहे. देशभरात हजारो भगवान शंकराची मंदिरे आहेत. यातील अनेक मंदिरे ही हजारो वर्षापासून आहेत. या सर्व मंदिरांमध्ये एकंबरेश्वर मंदिर हे सर्वात महत्त्वाचे मंदिर आहे. कारण पुराणातील कथांनुसार याच एकंबरेश्वर मंदिरामध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाल्याची मान्यता आहे. त्यामुळेच आत्तापासून महाशिवारात्रीसाठी या एकंबरेश्वर मंदिरामध्ये धार्मिक विधी सुरु झाल्या आहेत. ( Ekambareswarar Temple )

तामिळनाडूतील कांचीपुरम येथील प्राचीन एकंबरेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाची भव्य तयारी सुरु झाली आहे. पल्लव आणि चोल स्थापत्यकलेचे संपन्न रुप असलेल्या या एकंबरेश्वर मंदिराची अन्यही काही वैशिष्टे आहेत. मात्र या मंदिरात भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाल्याचे सांगण्यात येते, त्यामुळे दरवर्षी येथे महाशिवरात्र भव्यदिव्य स्वरुपात साजरी होते. या सोहळ्याला साक्षात महादेव माता पार्वतीसह उपस्थित असल्याचे भाविक मानतात. यामुळे एकंबरेश्वर मंदिरातील महाशिवरात्र सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोप-यातील शिवभक्त उपस्थित असतात.
15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र असली तरी एकंबरेश्वर मंदिरात आत्तापासूनच महाशिवरात्रीच्या पारंपारिक धार्मिक विधी सुरु झाल्या आहेत. या मंदिरामध्ये पृथ्वी तत्वाचा सन्मान केला जातो. मंदिरात दिवसभर विशेष पूजा केली जात आहे, त्यात चार तास दूध, दही, मध, तूप आणि पवित्र पाण्याने भव्य अभिषेक होत असून रुद्राभिषेकम ही करण्यात येत आहे. भाविक येथे रात्रीची जागरणं करत असून यावेळी शिवपुराणातील मंत्राचा जप करण्यात येत आहे. सोबत काही धार्मिक ग्रंथांचे पठऩही करण्यात येत आहे. मंदिरातील महालिंगमची दिव्य सजावटही करण्यात आली आहे. आत्तापासूनच या सर्व धार्मिक विधींमध्ये सहभाग घेण्यासाठी कांचीपुरममध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. महाशिवात्र झाल्यावरही येथील महाशिवरात्रीचा सोहळा चालू असतो, त्यामुळेच किमान महिनाभर हा सर्व भाग भगवान शंकराच्या भक्तांनी गजबजलेला असतो. ( Ekambareswarar Temple )
एरवीही या पुरातन मंदिरामध्ये भाविकांची मोठी उपस्थिती असते. एकंबरेश्वर मंदिर हे पल्लव आणि चोल स्थापत्यकलेचे संपन्न उदाहरण म्हणून अभ्यासले जाते. मंदिराचे बांधकाम पल्लवांच्या काळात सुरू झाले आणि चोल आणि विजयनगर शासकांनी त्याचा विस्तार केला. “पंचभूत स्थलम” पैकी एक, हे मंदिर असून येथील शिवलिंग हे “पृथ्वी” चे तत्व दर्शवते. एकू 25 एकरांवर परसलेल्या या मंदिरामध्ये भव्य असे 11 मजली गोपुरम आहेत. या प्रवेशद्वारांची उंची 192 फूट आहे, त्यावरुनच मंदिराची भव्यता ओळखता येते. या मंदिराच्या प्रांगणातील 3500 वर्ष जुन्या आंब्याच्या झाडाचे दर्शन घेणेही भाग्याचे समजले जाते. मंदिराच्या आतील हे आंब्याचे झाड अतिशय पवित्र मानले जाते. या झाडाच्या चार फांद्या चार वेदांचे प्रतिनिधित्व करतात आणि प्रत्येक फांदीवर वेगवेगळ्या चवीचे आंबे येत असल्याचे सांगितले जाते. याच आंब्याच्या झाडाखाली भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाल्याची मान्यता आहे.
=======
हे देखील वाचा : Mahashivrtari : महाशिवरात्रीला ‘या’ लाभांसाठी न चुकता करा महामृत्युंजय मंत्राचा जप
=======
यामागे कथा सांगण्यात येते. त्यानुसार, माता पार्वतीनं याच आंब्याच्या झाडाखाली बसून तपश्चर्या केली. यावेळी माता पार्वतीनं आंब्याच्या झाडाखाली मातीपासून शिवलिंग तयार केले. जेव्हा शिवाने पार्वतीला तपस्या करताना पाहिले, तेव्हा महादेवाने माता पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी, त्यांच्या जटांमधून गंगेचे पाणी या मातीच्या शिवलिंगावर ओतले. पाण्याच्या वेगवान प्रवाहाचा पूजेत अडथळा येऊ नये म्हणून माता पार्वतीने मातीच्या शिवलिंगाला आलिंगन दिले. हे पाहून भगवान शंकर खूप प्रसन्न झाले आणि माता पार्वतीसमोर प्रकट झाले. शिवाने माता पार्वतीला वरदान मागण्यास सांगितले आणि माता पार्वतीने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा महादेवाने माता पार्वतीबरोबर याच आंब्याच्या झाडाखाली लग्न केल्याचे सांगण्यात येते. ( Ekambareswarar Temple )
आजही मंदिराच्या प्रांगणातील हे आंब्याचे झाड हिरवेगार दिसते. मंदिरात येणारे हजारो भाविक या आंब्याच्या झाडाचे दर्शन घेणे पवित्र मानतात. स्थानिक भाविक एकंबरेश्वर मंदिर, वरदराज पेरुमल मंदिर आणि कामाक्षी अम्मन मंदिर यांना एकत्रितपणे “मूमूर्तीवासम” असे म्हणतात, ज्याचा अर्थ “त्रिमूर्तीवासम” असा आहे. त्यामुळेच येथे वर्षाचे बाराही महिने भाविकांची गर्दी असते. मात्र महाशिवरात्र पर्वासाठी भाविकांचा महापूर या एकंबेश्वर महामंदिरात जमा होतो.
सई बने
