अमेरिका आणि इराण यांच्यामधील युद्ध अटळ झाले आहे. अमेरिकेनं खामेनी यांच्यापुढे तीन अटी ठेवल्या होत्या. मात्र या अटी मान्य करण्यासाठी इराण सरकारनं साफ नकार दिला आहे. त्यामुळे आता अमेरिकेनं इराणला सर्व बाजूंनी वेढा घातला असून या दोन देशामध्ये विनाशकारी युद्ध निश्चित झाले आहे. अमेरिकेनं दिलेल्या अटी मान्य करणे म्हणजे,शरणागती पत्करल्यासारखे आहे, अशी शरणागती पत्करण्याऐवजी आम्ही युद्धाचा पर्याय स्विकारत आहोत, असा संदेश खामेनी यांनी दिला असून तेहरानमध्ये पाच आघाड्यांवर तयारी सुरू आहे. त्यातही इराणने पाण्याखालील क्षेपणास्त्रांचा साठा तैनात केल्याची माहिती आहे. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी हे सुरक्षितपणे बंकरमध्ये गेले असून इराणच्या युद्धसज्जतेची सर्व तयारी खामेनी यांच्या लहान मुलाकडे देण्यात आली आहे. अमेरिका आणि इराणमधील युद्धाची आग कोणत्याही क्षणी पेटून उठणार आहे. अमेरिकेने इराणला सर्व बाजूंनी वेढा घातला आहे. आणखी एक अमेरिकन विनाशक मध्य पूर्वेत पोहोचले आहे. ( United States–Iran war )

अमेरिकेने जॉर्डनमध्ये १२ लढाऊ विमाने, लाल समुद्रात एक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक, पर्शियन आखातात तीन लढाऊ युद्धनौका, ओमानच्या आखातात दोन विनाशक आणि अरबी समुद्रात तीन विनाशकांसह यूएसएस अब्राहम लिंकन विमानवाहू जहाज तैनात केले आहे. यासोबत आणखी एक विनाशक मध्यपूर्वेत पोहचले आहे. अमेरिकेची ही तयारी चालू असली तरी दुसरीकडे इराण हार मानण्यास तयार नाही. युद्ध सुरू झाल्यास तात्काळ प्रत्युत्तर देण्याचा इशारा इराणी अधिकाऱ्यांनी दिला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणपुढे सादर केलेल्या तीन अटींनी परिस्थिती अधिक युद्धजन्य झाली आहे. ट्रम्प यांनी इराणने आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे सोडून द्यावा आणि युरेनियम समृद्धीकरण क्षमता नष्ट करावी. शिवाय त्यांचे सर्व बॉम्ब-उत्पादक युरेनियम अमेरिकेला सोपवावे, अशी पहिली अट इराणवर लादली आहे. तर इराणने मध्यपूर्वेतील हमास, हुथी बंडखोर आणि लेबनॉनचे हिजबुल्लाह यांसारख्या आपल्या मिलिशियांना तात्काळ पाठिंबा देणे थांबवावे, अशी दुसरी अट ठेवली आहे. ( United States–Iran war )
सोबतच इराणने आपला लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम ताबडतोब बंद करावा अशी तिसरी अट इऱाणसमोर ठेवली होती. पण या अटींचा मसुदा पाहिल्यावरच इराणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सर्वोच्च नेते खामेनी यांनी या अटी फेटाळल्या असून अमेरिकेसोबत कधीही युद्धाला तयार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच युद्ध झाल्यास अमेरिकेला चांगला धडा शिकवू अशी धमकीही त्यांनी दिली आहे. अमेरिकेसोबत संभाव्य युद्धासाठी इऱाणनंही शस्त्र जमवाजमव सुरु केली आहे. त्यात इराणी सैन्याला १,००० नवीन ड्रोन मिळाले आहेत. तुर्की, ओमान आणि कतारसह अनेक देश हे युद्ध टाळण्यासाठी वॉशिंग्टन आणि तेहरानमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पुरंतु युरोपियन युनियनने इराणच्या आयआरजीसीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्यामुळे इराणनं कुठल्याही मध्यस्थिला नकार दिला आहे. तसेच अमेरिकन विमानवाहू जहाज बुडवण्याची धमकी दिली आहे. पुढच्या वीस तासांमध्ये या दोन देशांमध्ये युद्ध कधीही सुरु होईल, असा इशारा देण्यात आला आहे. तेहरानचे महापौर अलिरेझा झकानी यांनी नागरिकांच्या संरक्षणासाठी मेट्रो स्थानके बंकरमध्ये रूपांतरित केली जात असल्याचे सांगितले. तर रशियन अणुऊर्जा महामंडळचे प्रमुख अलेक्सी लिखाचेव्ह यांनी बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पातून आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याची तयारी सुरु केली आहे. अंदाजे 400 रशियन तज्ञ आणि त्यांचे कुटुंब तेथे उपस्थित आहेत. रशिया, अझरबैजान आणि आर्मेनिया मार्गे त्यांना बाहेर काढत आहे. ( United States–Iran war )
इराणी सरकारनं तेहरानमध्ये अमेरिकेला उत्तर देण्यासाठी पाच आघाड्यांवर तयारी सुरू आहे. त्यात इराणने सर्व राज्यपालांचे अधिकार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांनुसार, युद्धाच्या परिस्थितीत राज्यपाल त्यांच्या स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार पुरवठ्याबाबत निर्णय घेऊ शकतील. इराणने पाण्याखालील क्षेपणास्त्रांचा साठा तैनात केला आहे. युद्ध सुरू होताच इराण होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने मध्य पूर्व आणि आशियामध्ये अराजकता निर्माण होऊन ऊर्जा संकट अधिक वाढणार आहे. सोबतच इराणनं अमेरिकेच्या जास्तीत जास्त सैनिकांना मारण्याच्या सूचना आपल्या सैन्याला दिल्या आहेत. इराणच्या मदतीला हुथी बंडखोर येण्याची शक्यता आहे. येमेनमधील हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात अमेरिकन जहाजांना लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
=======
हे देखील वाचा : Reza Pahlavi : इराणची राणी सत्तांतरासाठी मैदानात
=======
शिवाय इराणला लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहचा पाठिंबा मिळेल. इराकमधील कताईबनेही इराणला पाठिंबा व्यक्त केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, इराणने आपले सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांना सुरक्षित बंकरमध्ये लपवले आहे. सध्या इराणच्या सैन्याची धुरा खामेनी यंच्या धाकट्या लेकाच्या हाती आहे. दरम्यान इराणमध्ये खामेनी यांना सत्तेपासून दूर केल्यावर त्यांच्याऐवजी इराणची जबाबदारी कोणाकडे देता येईल, याचीही चाचपणी अमेरिकेनं सुरु केली आहे. अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो यांनी कबूल केले आहे की, इराणमध्ये सत्ता बदलणे व्हेनेझुएलापेक्षा जास्त कठीण असेल. तेहरान ताब्यात आल्यावर अमेरिका तेथील जनतेला अनुसरुन योग्य नेत्याच्या हाती इराणची सत्ता देणार असल्याचे रुबियो यांनी सांगितले आहे. या सर्वात इराणमध्ये इंटरनेट सेवा बंद आहे. त्यामुळे तेथील जनतेची परिस्थिती कशी आहे, याबाबत कुठलिही माहिती नाही. ( United States–Iran war )
सई बने
