तैवानचा ताबा घेण्यासाठी चीन तयारी करत आहे, आणि यासाठी त्याला जपानचा रागही सहन करावा लागणार आहे. आता या गोष्टीचा आणि पांडा या गोड केसाळ प्राण्याचा काही संबंध आहे, हे सांगितले तर तुम्हाला खरे वाटेल का, अर्थातच नाही. पण चीन आणि जपानमध्ये तैवाननंतर आता पांडामुळे तणाव निर्माण झाला आहे. तैवानवर चीनच्या असलेला दावा तैवाननं जसा फेटाळला आहे, तसाच जपाननंही चीनचा विरोध केला आहे. या विरोधाचा बदला चीननं पांडाच्या रुपानं काढला आहे. कारण जपानमधील सुप्रसिद्ध उद्यानात असलेले दोन पांडा हे चीनचे आहेत. ( Panda Diplomacy )
चीन आपल्या राजकीय धोरणाचा एक भाग म्हणून जगभरातील देशांना पांडा भाडेतत्वावर देतो. पांडा देतांना तो ठारविक वर्षानंतर आपल्या देशात परत आणणार याबाबत सर्व नियम संबंधित देशाकडून वदवून घेतले जातात, सोबतच या पांडांना होणारी पिल्लेही चीन ताब्यात घेतो. त्यामुळे चीनसोबत या देशांचे बिनसले, तर पहिल्यांदा चीन आपले पांडा ताब्यात घेऊन राजकीय खेळी करण्यास सुरुवात करतो. आता तसेच जपानच्या बाबतीत सुरु आहे.

जपानच्या उएनो उद्यानातील शिओक्सियाओ आणि लेई लेई हे दोन पांडा चीनला परतत आहेत. हे दोन्हीही पांडा जपानमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या नावानं अनेक खेळ येथे तयार केले आहेत. या उद्यानाबाहेरील दुकानांमध्ये या पांडांच्या प्रतिकृती घेण्यासाठी मोठी रांग लागते. करोडोचा व्यापार या पांडांमुळे जपानमध्ये होतो. मात्र आता हेच दोन पांडा चीनमध्ये परत जाणार आहेत. चीननं त्यांची मुदत वाढवून देण्यास नकार दिला आहे, सोबतच नवीन पांडा देण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे अवघ्या जपानमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ( Panda Diplomacy )
सोबतच शिओक्सियाओ आणि लेई लेई या दोघांना शेवटचं बघण्यासाठी उएनो उद्यानासमोर मोठया रांगा लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून जपानमध्ये शिओक्सियाओ आणि लेई लेई या दोन नावांची चर्चा होत आहे. ही नावं जपानमधील दोन पांडांची आहेत. चीननं हे दोन पांडा जपानला भाडेतत्वावर दिले होते.
हे दोन पांडा परत गेल्यावर ५० वर्षांत जपानमध्ये पांडा नसण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. या दोन्ही पांडांनी जपान-चीन संबंधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. पण तैवानवर जपाननं घेतलेल्या भूमिकेमुळे चीननं पांडा परत ताब्यात घेण्याचे ठरवले आहे, त्यामुळे जपानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे. ( Panda Diplomacy )
या पांडांनी जपानी जनतेची मनं जिंकली आहेत. त्यामुळेच पांडा परत जाणार म्हणून हजारो पांडा प्रेमी उएनो प्राणीसंग्रहालयात जमले होते. या पांडाप्रेमीनी अनेक खेळणीही आपल्या लाडक्या पांडांसाठी आणली होती. प्राणीसंग्रहालयाने प्रत्येक व्यक्तीला फक्त एका मिनिटासाठी शिओक्सियाओ आणि लेई लेई यांना पाहण्याची परवानगी दिली.
=======
हे देखील वाचा : Zhang Youxia : शी जिनपिंग यांच्या जीवाला सहकार्यांकडूनच धोका
=======
दोन्ही पांडा चीनकडे परतत असतांना त्यांना शेवटचा निरोप देतांना हे पांडाप्रेमी खूप हळवे झाले होते. अनेकांना तर अश्रू अनावर झाले. यातील अनेकांनी चीन सरकारकडे शिओक्सियाओ आणि लेई लेई यांना आमच्या देशात राहूदे म्हणून विनंतीचे मेसेज केले. मात्र यावर चीन सरकारानं, जपानी नागरिकांना शिओक्सियाओ आणि लेई लेई यांना यापुढे पहायचं असेल तर त्यांनी चीनच्या दौ-यावर यावे, असा उलटा मेसेज करुन या दोन पांडांना पुन्हा जपानमध्ये पाठवणार नाही, हे स्पष्ट केले आहे. ( Panda Diplomacy )
अलिकडच्या काही महिन्यांत जपान आणि चीनमधील तणाव वाढला आहे. जपानच्या पंतप्रधान सानाओ ताकाची यांनी तैवानबाबत केलेल्या विधानामुळे यात भर पडली. चीननं जपानचा बदला घेण्यासाठी आपले पांडा परत मागवेल.
१९७० च्या दशकात चीनने अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनीला पांडा भेट म्हणून दिले. १९८० च्या दशकात, चीनने पांडांबाबतचे आपले धोरण बदलले आणि त्यांना कायमचे भेट देण्याऐवजी पांडांना भाड्याने देण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता परदेशी प्राणीसंग्रहालयांना पांडांसाठी एक निश्चित वार्षिक शुल्क भरावे लागते. याचा वापर चीन पांडा संवर्धन आणि वैज्ञानिक संशोधनासाठी करत असल्याची माहिती आहे. चीन ज्या पांडांना भाड्याने देतो, त्यांच्या बाळांवरही चीनचा हक्क असतो. ( Panda Diplomacy )
आता जपानमधून जे दोन पांडा चीनमध्ये परत गेले, त्यांचा २०२१ मध्ये उएनो प्राणीसंग्रहालयात जन्म झाला. शिओक्सियाओ आणि लेई लेई हे चिनी पांडा झिनझिन आणि रिरी यांचे अपत्य आहेत. शिओक्सियाओ आणि लेई लेई या दोघांचा जन्म झाल्यापासून जपानी नागरिकांनी घरातील लहान मुलांसारखे त्यांचे लाड केले आहेत.

उएनो परिसरात परिसरता या दोघांच्या नावानं अनेक दुकानं आहेत. त्यात कुकीज, मिठाई, स्टेशनरी आणि खेळणी उपलब्ध असून अनेक पांडाप्रेमी त्याची खरेदी करतात. स्टेशनच्या बाहेर या पांडांचे पुतळे आहेत. त्यामुळेच आता शिओक्सियाओ आणि लेई लेई परत गेल्यामुळे दरवर्षी १२८ दशलक्ष डॉलर्स नुकसान होण्याची भीती आहे. दरवर्षी लाखो लोक या पांड्यांना पाहण्यासाठी बेटावर येतात. त्यामुळे येथील पर्यटनाही सोनेरी दिवस आले होते. अनेक हॉटेलही याच पांडांच्या नावानं उभारण्यात आली. आता शिओक्सियाओ आणि लेई लेई हेच दोन पांडा नसल्यास पर्यटक या बेटाकडे पाठ फिरवतील अशी शक्यता आहे. ( Panda Diplomacy )
सई बने
