अमेरिका-इराण, ग्रिनलॅंड या संघर्षाकडे जगाचे लक्ष असतांना चीनमध्येही तेवढ्याच धक्कादायक घडामोडी चालू आहेत. चीनमधील सैन्यात अंतर्गत विद्रोह झाल्याची बातमी असून काही वरिष्ठ सैनिकी अधिका-यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना मारण्याचा कट रचल्याचे उघड झाले आहे. हा कट उघड झाल्यावर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे सर्वात विश्वासू म्हणून ओळखले जाणारे आणि चीनच्या लष्कारातील सर्वात शक्तिशाली जनरल, झांग युक्सिया यांना अटक करुन त्यांची चौकशी सुरु झाली आहे. ही कारवाई चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीमधील आतापर्यंतची सर्वात ऐतिहासिक लष्करी कारवाई मानली जात आहे. झांग युक्सिया यांच्या सोबत अन्य काही लष्करी वरिष्ठ अधिका-यांचीही चौकशी सुरु असल्याची माहिती आहे. चीनमध्ये शी जिनपिंग यांची हत्या करण्याचा हा कट उघड झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. यामागे अमिरिकेची गुप्तचर संघटना सीआयएचा हात असावा अशीही शंका व्यक्त होत आहे. त्यानुसार आता तपास सुरु झाला आहे. ( Zhang Youxia )

चीनमध्ये शी जिनपिंग यांच्या खालोखाल पद असलेले झांग युक्सिया हे चर्चेत आले आहेत. ७५ वर्षीय झांग युक्सिया हे कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय लष्करी आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. या आयोगाचे अध्यक्ष स्वतः अध्यक्ष शी जिनपिंग आहेत. त्यामुळे शी जिनपिंग यांनाही या कटात झांग यांचे नाव आल्यानं धक्का बसल्याची माहिती आहे. शी जिनपिंग यांचा झांग युक्सिया यांच्यावरच्या विश्वासाला तडा बसला आहे. कारण झांग हे प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव असलेल्या काही चिनी लष्करी अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. शी जिनपिंग हे झांग यांनी दिलेल्या निर्णायावरच कारवाईचा निर्णय घेत आले आहेत. धक्कादायक म्हणजे, या सर्वात झांग हे एकटे नाहीत, तर त्यांच्यासोबत आणखी एक उच्चपदस्थ जनरलचीही चौकशी सुरू आहे. ६१ वर्षीय जनरल लिऊ झेन्ली यांचेही कटात नाव आले असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे. लिऊ झेन्ली हे सीएमसीच्या जॉइंट स्टाफ डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत. चीनच्या लष्कराच्या ऑपरेशनल प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजीशी संबंधित सर्वात महत्त्वाच्या पदांपैकी लिऊ यांचे पद आहे.
या दोघा उच्चपदस्थांवर सरकारने आरोपांची माहिती उघड केलेली नाही. मात्र भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर आणि राजकीय निष्ठेला हानी, असे आरोप आहेत. शी जिनपिंग यांना मारण्याचा कट हा लष्करी हत्यारांच्या खरेदीवरुन झाल्याचा अंदाज आहे. कारण शी जिनपिंग यांनी चीनमध्ये भ्रष्टाचारविरोधी मोहीम अत्यंत कडकपणे राबवली आहे. शी जिनपिंग सत्तेत आल्यापासून, २००,००० हून अधिक अधिकाऱ्यांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यात लष्करी अधिका-यांचा मोठा समावेश आहे. शस्त्रास्त्र खरेदी आणि विक्रीमध्ये संरक्षण मंत्रालयातील अनेक अधिका-यांची चौकशी चालू आहे. त्यामुळेच शी जिनपिंग यांना संपण्याची योजना आखण्यात आल्याची माहिती आहे. ( Zhang Youxia )
सोबतच शी जिनपिंग यांनी तैवानवर पूर्ण ताबा घेण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याला चीनमधील काही लष्करी अधिका-यांचा विरोध आहे, त्यातूनही हा कट रचला गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र यात थेट झांग युक्सिया यांच्यासारख्या वरिष्ठ अधिका-याला अटक झाल्यामुळे चीनमधील लष्करात खळबळ उडाली आहे. झांग युक्सिया यांच्यापूर्वी संरक्षण मंत्री आणि जनरल यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. मात्र सीएमसीच्या उपाध्यक्षांवर कारवाई सुरु केल्यामुळे हे प्रकरणा किती गंभीर आहे, याचा अंदाज येत आहे.
यासंदर्भात जी नवीन बातमी समोर येत आहे, त्यानुसार शी जिनपिंग यांचे सरकार उलथवून टाकण्यासाठी चीनमध्ये मोठा प्रयत्न होत आहे. त्यासाठी लष्करातील काही अधिकारीही सहकार्य करीत आहेत. त्यातून झांग युक्सिया आणि लिऊ झेनली १८ जानेवारीच्या संध्याकाळी शी जिनपिंग यांना अटक करण्याची कारवाई करणार होते. शी जिनपिंग त्या दिवशी पश्चिम बीजिंगमधील जिंग्शी हॉटेलमध्ये राहणार होते. शी जिनपिंग यांना ताब्यात घेऊन झांग हे सत्तापरिवर्तनाची घोषणा करणार होते. मात्र आयत्यावेळी या कटाचा सुगावा शी जिनपिंग यांना लागला आणि झांग, लिऊ यांनाच अटक झाली आहे. ( Zhang Youxia )
=======
हे देखील वाचा : Chinese Funerals : चीनमध्ये लक्झरी अंत्यसंस्काराचे फॅड
=======
या सर्व अतिशय नाटयमय घटना आहेत. माहितीनुसार शी जिनपिंग यांना काही महिन्यांपासून झांग युक्सिया यांच्याबद्दल शंका येत होती. त्यांनी झांग यांच्याभोवती आपले विश्वासू लोक पेरले होते, त्यांनीच शी जिनपिंग यांना अटक करण्याचा डाव झांग यांना टाकल्याची माहिती दिली. त्यामुळे शी जिनपिंग यांनी त्यांचा मुक्काम होता, ते हॉटेल काही मिनिटात सोडून अन्य ठिकाणी प्रस्थान केले.
यात झालेल्या चकमकीत शी जिनपिंग यांच्या वैयक्तिक सुरक्षा पथकातील नऊ सदस्य ठार झालेच पण झांग यांचे अनेक समर्थकही मारले गेल्याची माहिती आहे. त्यानंतर शी जिनपिंग यांनी रातोरात झांग युक्सिया आणि लिऊ झेन्ली यांच्यासह त्यांच्या कुटुंबालाही ताब्यात घेतले आहे. २०१३ मध्येही शी जिनपिंग यांच्या हत्येचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. मात्र या कटामध्ये प्रत्यक्ष लष्कर उपाध्यक्षांचाच हात असल्यामुळे शी जिनपिंग यांना मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येते. या सर्वात आता झांग आणि लिऊ यांची कसून चौकशी चालू असून या कटाचे धागेदोरे अन्य कुठल्या देशापर्यंत जात आहेत, याची पडताळणी सध्या चीनचे लष्कर करीत आहे. ( Zhang Youxia )
सई बने
