Home » माधापूर मधील त्या ३०० महिला कुठे गायब झाल्या? अजय देवगण उलघडणार हा इतिहास

माधापूर मधील त्या ३०० महिला कुठे गायब झाल्या? अजय देवगण उलघडणार हा इतिहास

by Correspondent
0 comment
Share

माधापूरच्या रणरागिणींची कथा

भूज द प्राइड ऑफ इंडिया

7 डिसेंबर 1971 रोजी गुजराथच्या कच्छ जिल्ह्यातील माधापूर गावात एक इतिहास झाला. या गावांत असलेल्या भूज या भारतीय हवाई दलाच्या हवाई पट्टीला पाकिस्तानी लढाऊ विमानांनी उद्धवस्त केलं. भारत पाकिस्तान युद्धात भारतीय हवाई दलाचा हा वाहनतळ महत्त्वाचा होता. पण पाकिस्ताननं कावेजाबपणानं येथील हवाई पट्टीच नष्ट केली. एकही लढाऊ विमान या हवाई पट्टीवरुन उड्डान करु शकणार नव्हतं…

अशावेळी माधापूरच्या रणरागीणी भारतीय हवाई दलाच्या मदतीला आल्या. आपल्या जीवावर उदार होऊन देशासाठी पुढे आलेल्या या महिलांनी सलग 72 तास मेहनत घेतली. हवाई पट्टी दुरुस्त केली. आणि येथून भारतीय हवाई दलांनी उड्डान सुरु केलं. अर्थात त्यानंतर घडलेला भारताच्या विजयाचा इतिहास आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. इतिहासात माधापूरमधील या तीनशे महिला कुठे गायब झाल्या. अजय देवगण आपल्या भूज द प्राईड ऑफ इंडिया या आगामी चित्रपटातून या महिलांची शौर्यगाथा घेऊन येतोय.

अजय देवगणचा भूज द प्राइड ऑफ इंडिया हा नवा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. डिझनी हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट बघता येणार आहे. चित्रपटात अजय देवगण सोबत, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, नुरा फत्तेह, शरद केळकर, ॲमी वर्ग हे कलाकार आहेत. अजय देवगणने यात इंडियन एअर फोर्सच्या पायलटची भूमिका केली आहे. अजय स्क्वाड्रन लीडर विजय कार्णिक यांच्या डॅशिंग भूमिकेत आहे. अभिषेक दुधैया हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

7 डिसेंबर 1971 च्या रात्री गुजरातच्या भूज येथे हवाई दलाच्या हवाई तळावर कावेबाज पाकिस्ताननं हल्ला केला. हा तळ भारतीय हवाई दलासाठी अंत्यंत महत्त्वाचा… पाकिस्तानचे सैन्यही या विमान तळाचे भारतासाठी असलेले महत्त्व आणि पाकिस्तानसाठी असलेला त्याचा धोका, हे दोन्हीही जाणून होते… पाकिस्ताननं या रात्री भूज विमानतळावर 14 बॉम्ब टाकले. रात्री केलेल्या या हल्यात भूज हवाई पट्टी आणि सहा मिग फायटर विमानं पूर्णपणे नष्ट झाली.

हा विमानतळ लवकरात लवकर दुरुस्त न झाल्यास एकही लढाऊ विमान येथे उतरलं नसतं…. तसंच या तळावरुन कोणत्याही विमानाला उड्डानही करता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे अवघ्या काही तासात याची दुरुस्ती करण्याचं आव्हान भारतीय सैन्यापुढे होतं. हवाई पट्टी दुरुस्त करण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे विनंती करण्यात आली होती. पण युद्धाचे दिवस… त्यात मजूर कमी असल्यानं भूज हवाई पट्टी दुरुस्त करण्यासाठी मोठी अडचण येत होती.

या कठीण परिस्थितीत विजय कर्णिक यांनी माधापूर मधील गावक-यांना आवाहन केले. यावेळी माधापूर मधील तीनशे रणरागिणी पुढे आल्या. या महिलांनी अत्यंत कुशलपणे आणि सावधानी बाळगून हा रनवे दुरुस्त केला. हे सर्व काम रात्री होत असे. रनवे किती दुरुस्त झालाय हे पाकिस्तानी सैन्याला कळू नये म्हणून त्याला शेणानं सारवलं जायचं. अवघ्या 72 तासात हा रनवे या रणरागिनींनी दुरुस्त केला.

या रणरागिणींमधील अहमदाबाद येथील वल्लबाई सेघानी यांनी सांगितले की, या हवाई पट्टी दुरुस्तीसाठीचे 72 तास अत्यंत कठीण होते. यावेळी कधीही पाकिस्तानी विमानं बॉम्ब हल्ला करु शकत होती. पण या रणरागिणींनी आपल्या जीवापेक्षा देशाचं संरक्षण महत्त्वाचे मानले. यापैकी अनेकींच्या घरी लहान मुलं होती. काहींची मुलं अगदी तान्ही होती. या मुलांना शेजा-यांकडे ठेऊन देशासाठी या महिला एकत्र आल्या. अशापरिस्थित आपल्याला कधीही मृत्यू येईल, हे या महिलांना माहित होते.

पाकिस्तानी बॉम्बर विमानांची चाहूल लागली की या महिलांना विशिष्ट आवाजाची खूण केली जायची. मग त्या महिला आजुबाजुच्या झुडपात लपत असत. भूजमधील वाळूच्या रंगाच्या साड्या या महिलांनी घातल्या होत्या. अगदी पहाटेपासून या महिलांनी कामाला सुरुवात केली होती. काही तास या महिलांनी अक्षरशः उपाशीपोटी काम केलं. त्यानंतर आसपासच्या मंदिरातून त्यांना काही अन्नपुरवठा करण्यात आला. तीन दिवसांच्या या परिश्रमानंतर चौथ्या दिवशी या हवाई पट्टीवरुन लढाऊ विमानांनी उड्डान केलं. सलग 72 तासांच्या परिश्रमानंतर हा सर्वांत गौरवशाली आणि अभिमान वाटणारा क्षण होता, असं या महिला सांगतात.

त्यांच्या या बहात्तर तासांच्या परिश्रमानं भारताच्या विजयाची गाथा सफल, सुफल झाली. भारतांनं हे युद्ध जिंकलं त्यात माधापूर येथील महिलांचा मोठा हिस्सा आहे. पण या महिला काळाच्या ओघात मागे राहिल्या. तत्कालिन भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या महिलांना भेटवस्तू दिल्या होत्या. पण आपण हे सर्व आपल्या देशासाठी केलं… कुठल्याही बक्षिसासाठी नाही, असं बाणेदार उत्तर देत या भेटवस्तू महिलांनी परत केल्या.

आता अजय देवगणच्या पुढाकाराने माधापूरमधील महिलांची विजय गाथा सर्वासमोर येणार आहे. तानाजी नंतर अजय देवगणच्या भूज द प्राइड ऑफ इंडिया हा चित्रपट हीट होईल अशी चर्चा होती. पण कोरोनाचा कहर मोठ्या पडद्याला चांगलाच बसला. त्यामुळे डीजीटल मिडीयाला महत्त्व आले आहे. वास्तविक भारतीय हवाई दलाची ही शौर्य गाथा मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी अजयचे चाहते उत्सुक होते. पण दुधाची तहान ताकावर हा नियम इथे लागू होणार आहे. 15 ऑगस्टला प्रदर्शित होणा-या या चित्रपटाची आता अजयच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.