अमेरिका आणि इराण या दोन देशांमध्ये कट्टर वैर आहे. अमेरिका कधीही इराणवर हल्ला करणार अशी अटकळ व्यक्त करण्यात येत आहे. मात्र ४६ वर्षापूर्वी अमेरिका आणि इराण हे दोन मित्र पक्ष होते. तेव्हा इराणमध्ये राजा शाह मोहम्मद रझा पहलवी यांची सत्ता होती. मात्र रझा पहलवी हे प्रकृतीच्या कारणामुळे अमेरिकेत गेले, आणि इराणमध्ये आगडोंब उसळला. ४ नोव्हेंबर १९७९ रोजी सकाळी ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी इराणची राजधानी तेहरानमधील अमेरिकन दूतावासाला वेढा घातला. या घटनेनंतर अमेरिकेच्या दूतावासातील ९८ कर्मचा-यांना ओलीस ठेवण्यात आले. तब्बल ४४४ दिवसानंतर, २० जानेवारी १९८१ इराणनं या बंदीवासांना सोडले. त्यासाठी इराणमध्ये आलेल्या खोमेनी सरकारनं अनेक अटी मान्य करुन घेतल्या होत्या. ४६ वर्षापूर्वी झालेली ही घटना अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात काळी घटना ठरली आहे. आजही अमेरिकेचे सरकार हा अमेरिकेच्या उज्ज्वल इतिहासावरील काळा डाग मानते. त्यामुळेच आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराणवर हल्ला करण्याचे मनसुबे आखत असतांना त्यांना अमेरिकेत फारसा विरोध होत नाही. उलट अमेरिकेनं इराणला धडा शिकवल्यास ४६ वर्षापूर्वी घडलेल्या घटनेचा बदला घेतला जाईल, अशीच भावना अमेरिकन नागरिकांच्या मनात आहे. (Iran-USA)

Iran Vs. USA
अमेरिका आणि इराणमधील तणाव हा सध्या जगासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. इराणमध्ये जो जनआक्रोश सुरु आहे, त्यामागे अमेरिका आणि तेथील गुप्तचर संघटना असल्याचा आरोप खामेनी राजवटीनं केला आहे. या निदर्शनांमध्ये आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकन मानवाधिकार संघटनेनुसार हा आकडा १२ हजाराच्या वर असल्याचा अंदाज आहे. या निदर्शनांना दडपण्यासाठी खामेनी यांच्या नेतृत्वाखालील धार्मिक दलाचा वापर करण्यात आला. निदर्शकांवर गोळीबार करण्यात आला. मात्र इराणमध्ये सध्यातरी संपर्काची सर्व साधने बंद असल्यानं या निदर्शनांमध्ये किती जणांचा मृत्यू झाला आहे, याची निश्चित माहिती समोर येत नाही. या सर्वात अमेरिका निदर्शकांसाठी पुढे सरसावली आहे. पण त्याचा इराणच्या सत्ताधा-यांवर काहीही परिणाम न झाल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यातून अमेरिका आणि इराण यांच्यामधील वैर दिवसेंदिवस वाढत असले तरी हे दोन देश ४६ वर्षापूर्वी चांगले मित्र होते, हे सांगितलं तर विश्वास बसणार नाही. या दोन मित्र देशांमध्ये एक मोठी घटना झाली, आणि तेव्हापासून अमेरिका-इराणमधील वैरभाव वाढत गेला. इराणमध्ये अमेरिकन नागरिकांचा झालेला अपमान अवघ्या अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा विषय झाला. त्यामुळेच आता डोनाल्ड ट्रम्प इराणवर लष्करी कारवाई करण्याची चिन्हे असतांना अवघ्या जगभरातून त्याचा विरोध होत असला तरी, अमेरिकन नागरिक या बातमीनं सुखावले आहेत.
इराणचे राजा शाह मोहम्मद रझा पहलवी हे अमेरिकेचे समर्थक होते. त्यांच्या कारकिर्दीत, इराणी तेल व्यापार ब्रिटन आणि अमेरिकेच्या नियंत्रणाखाली होता. राजा शाह पहलवी हे अमेरिका सरकारचे प्रशंसक होते. इराणमध्येही तेव्हा पाश्चात्य संस्कृतीचा बोलबाला होता. मात्र राजा शाह पहलवी यांच्या विरोधात वाढत असलेले जनमत राजा आणि अमेरिका, यापैकी कोणालाही समजले नाही. जानेवारी १९७९ मध्ये अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली तेव्हा रझा शाह कर्करोगावर उपचार करायचा आहे, हे कारण सांगून अमेरिकेला गेले. फेब्रुवारी १९७९ मध्ये, अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी १४ वर्षांच्या निर्वासनातून इराणमध्ये आले आणि तिथे इस्लामिक राजवटीचा आरंभ सुरु झाला. खोमेनी यांनी अमेरिकेकडे राजा पहलवी यांना परत पाठवा, म्हणून मागणी केली. त्यांच्यमते राजा पहलवी हे इराणचे गुन्हेगार होते. पण अमेरिकेनं त्याला नकार दिल्यावर अमेरिकेवर इराणची कारवाई सुरु झाली. ४ नोव्हेंबर १९७९ रोजी सकाळी ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी इराणची राजधानी तेहरानमधील अमेरिकन दूतावासाला वेढा घातला. आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी मरीन कमांडोजवर ताबा मिळवला आणि ६६ अमेरिकन नागरिकांना ओलीस ठेवले. या नागरिकांना अतिशय खालच्या दर्जाची वागणूक देण्यात आली. या सर्वाला खोमेनी यांचा पाठिंबा होता, त्यांनी विद्यार्थ्यांच्या या क्रांतीला ‘इराणची दुसरी क्रांती’ म्हणून गौरव केला. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर होते. संपूर्ण अमेरिकेसह जगभर या घटनेनं एकच हल्लकोळ उठला. जिमी कार्टर यांनी याला दहशतवाद घोषित केले. ओलीसांची सुटका करण्यासाठी इराणची मालमत्ता गोठवण्यात आली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकेडेही हे प्रकरण गेले. पण इराणच्या सत्ताधा-यांनी अमेरिकेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. आपल्या कर्मचा-यांना सोडवण्यासाठी अमेरिकेनं एक हवाई कारवाईही केली. मात्र त्यात त्यांना अपयश आले. या सर्वांचा फटका राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांना झाला. त्यांच्यावर जोरदार टिका झाली. (Iran-USA)
=======
हे देखील वाचा : Irfan Soltani : आता अमेरिका या आठ कैद्यांच्या सुटकेसाठी आग्रही…
=======
१९८० च्या अध्यक्षीय निवडणुकीत रोनाल्ड रेगन यांनी कार्टर यांचा दारूण पराभव केला. या सर्वात अमेरिकेचे नागरिक इराणच्या कैदेतच होते. अमेरिकेला कोणत्याही किंमतीत आपल्या नागरिकांना मुक्त करायचे होते. अल्जेरियन मध्यस्थीने या दोन्ही देशांमध्ये एक करार झाला. त्यानुसार अमेरिकेने इराणवरील निर्बंध उठवले. अखेर २० जानेवारी १९८१ रोजी, ५२ बंधकांची सुटका करण्यात आली. ते जर्मनीतील विस्बाडेन येथे पोहोचले आणि नंतर अमेरिकेत परतले. इराणमध्ये, हा अमेरिकन साम्राज्यवादाविरुद्धचा विजय मानला जातो, तर अमेरिकेमध्ये काळा दिवस म्हणून याचे वर्णन होते. या संपूर्ण घटनेवर २०१२ मध्ये आलेल्या ‘आर्गो’ चित्रपटात विस्तृत वर्णन आहे. अमेरिकन दूतावासाचे कर्मचारी ४४४ दिवस इराणमध्ये तुरुंगात राहिले, हा अमेरिकेच्या प्रतिष्ठेवर डाग राहिला. जिमी कार्टर यांनी त्यांच्या “अ फुल लाईफ रिफ्लेक्शन ॲट नाइन्टी” या आत्मचरित्रातही या घटनेचा उल्लेख केला आहे. अमेरिकेच्या दूतावासातील ५२ कर्मचा-यांना या ४४४ दिवसात जो त्रास झाला, आणि त्यामुळे अमेरिकेची जगभरात जे हसू झाले, त्याची भरपाई करण्यासाठी अमेरिका कायम इराणचा पाडाव करण्याचे स्वप्न पहात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्वच धोऱणाच्या पाठी अमेरिकेतील नागरिक नाहीत, मात्र त्यांनी इराणवर लष्करी कारवाई केली आणि खामेनींना सत्तेवरुन खाली खेचले तर अमेरिकन नागरिक डोनाल्ड ट्रम्प यांना एखाद्या हिरोसारखा मान देणार आहेत. म्हणूनच बहुधा ट्रम्प इराणवर कारवाई करण्यावर ठाम आहेत. (Iran-USA)
– सई बने.
