नव्वदीच्या सुरुवातीलाच भारताच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु होती. व्ही. पी. सिंग आणि चंद्रशेखर यांचे केंद्रातले सराकरं एकामागोमाग एक धडाधड कोसळले. पुढे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली आणि काँग्रेसच्या सत्तेची धुरा पी. व्ही. नरसिंह राव यांच्या खांद्यावर आली. पण त्यांच्यासमोर संरक्षणमंत्रीपदाचा नवा पेच होता आणि त्यांना एकच व्यक्ती योग्य वाटत होते, ते म्हणजे शरद पवार… त्यावेळी शरद पवार महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर होते. पण तरीही पवारच रावांना संरक्षणमंत्रीपदी हवे होते आणि म्हणून त्यांना केंद्रात बोलावून घेतलं. आता केंद्रात जायचं म्हटलं तर संसदेत खासदारकी असणं महत्त्वाचं होतं. त्यावेळी शरद पवार यांच्यासाठी एकच मतदारसंघ सर्वात जास्त सुरक्षित होता आणि तो होता बारामती ! आता मतदारसंघ तर आहेच, पण या मतदारसंघात आधीच एक अवघ्या ३२ वर्षांचा तरुण खासदार ४ महिन्यांपूर्वीच निवडून आला होता. हा एक नवीन पेच होता, आता काय करावं. पण त्या माणसाने कसलाही विचार न करता आपल्या काकांसाठी, शरद पवारांसाठी थेट आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन टाकला. आपल्या जवळचा व्यक्ती असो वा दूरचा… उदार भावना आधीपासूनच या व्यक्तीमत्त्वामध्ये होती.म्हणूनच तो सर्वांना सर्वांना आपलासा वाटायचा.

हो तर हो, नाही तर नाही… जे आहे ते थेट रोखठोक ! त्यांची काम करण्याची शैलीच निराळी होती. महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक असं रांगडं व्यक्तिमत्त्व ज्याची गरज कधी सत्तेत असणाऱ्यांनाही लागायची आणि कधी विरोधकांनाही… कारण उपमुख्यमंत्रीपद ते विरोधीपक्षनेता सगळीकडेच या माणसाच्या नेतृत्वाची तोफ अशी धडाडत होती की, कोणतंही काम झालंच पाहिजे. थोरामोठ्यांचा राजकीय वरदहस्त असला तरी आपल्या ताकदीने हा नेता तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलेला होता. तब्बल ४० वर्ष महाराष्ट्रासोबतच महाराष्ट्राच्या राजकारणाचा कानाकोपरा या माणसाने पिंजून काढला होता. भाषणंसुद्धा पर्स्नालीटीसारखीच रांगडी होती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा हा माणूस… अगदीच महाराष्ट्राचं समाजमन कळलेलं नेतृत्व ! कोणत्याही कामासाठी वेळेवर हजर… कोणतीही कामं वेळेवर पूर्ण करण्याची ताकद ! काहींना वारशाने सगळं मिळतं. पण काहींमध्ये आपला वारसा वगळून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची जिद्द असते.

शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठीच्या महत्त्वाच्या गोष्टी हेरून आपल्या राजकारणाची सुरुवात दुधसंघ, विविध सहकारी संस्था, साखर कारखानेम, बँका यांच्या माध्यमातून केली. पुढे खासदार, मग आमदार, मग राज्यमंत्री, त्यानंतर महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री, त्यानंतर विरोधी पक्षनेते… असा राजकीय प्रवास… इतक्या उंचीपर्यंत पोहोचलेला माणूस पण पाय सतत तळागाळातच राहिले. सत्ता असो वा नसो, जनता दरबार भरणारच… जनतेची कामं होणारच… आपण इथपर्यंत ज्यांच्यामुळे आलो आहे, त्या जनतेचा आदर या माणसाने नेहमीच सभागृहात ठेवला. राजकीय विरोधक तर त्यांचेही होतेच, पण या माणसाने विरोधकांच्या मनावरही अधिराज्य गाजवलं होतं. शब्द पाळणारा नेता… अशीच सगळीकडे ख्याती ! त्यात दादा नावाची आपुलकी… यामुळे हा माणूस महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला होता. स्पष्टवक्तेपणा आणि उत्तम प्रशासन, या दोन या नेत्याच्या कदाचित आवडीच्याच गोष्टी असाव्यात. महाराष्ट्र हा सध्या कितीही आधुनिकीकरणाकडे झुकलेला असला, इथे कितीही शहरीकरण झालं असलं, तरीही आपला ग्रामीण बाणाच त्याच्या मदतीला धावून येतो. असाच हा ग्रामीण बाज असलेला मराठा नेता आज महाराष्ट्राला सोडून गेला. महाराष्ट्राच्या सेवेसाठी बारामतीच्या मातीतून उठलेला हा नेता अखेर बारामतीच्या मातीतच निजला. आपल्या वयाच्या ६६व्या वर्षी… सहाव्या महिन्याला आणि सहाव्या दिवशीच…
– सागर जाधव
