Home » Ajit Pawar : अजितदादा गेले !

Ajit Pawar : अजितदादा गेले !

by Team Gajawaja
0 comment
Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्राला धक्काच बसला. कालपर्यंत राजकारणात पूर्णपणे झोकून देऊन काम करणारा एक ‘कर्मयोगी ‘ अशा आकस्मिक व धक्कादायक रीतीने अंतर्धान पावेल ही खरोखरी कल्पनेपलीकडील घटना आहे. अजित पवार यांची महाराष्ट्रात ‘कायम स्वरूपी उपमुख्यमंत्री ‘ अशी ओळख असली तरी त्यांनी आपल्या संसदीय राजकारणाची सुरुवात लोकसभेचे खासदार म्हणून केली होती. १९९१च्या लोकसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. पण त्यांची खासदारकी अल्पजीवी ठरली. २१ मे १९९१ रोजी राजीव गांधींचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आणि भारतीय राजकारणाला निराळे वळण मिळाले. काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आल्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी व पर्यायाने पंतप्रधानपदासाठी चुरस निर्माण झाली. शरद पवार यांनी दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात उडी घेऊन ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले. नरसिंह राव पंतप्रधान झाले व त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले शरद पवार हे केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री झाले.

साहजिकच शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यावेळी अजित पवारांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन शरद पवार यांच्यासाठी बारामतीची जागा खाली केली. नंतर अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले. त्यांचा लगेचच सुधाकर नाईक यांच्या मंत्री मंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. तिथपसून त्यांनी महाराष्ट्र हेच आपले कार्यक्षेत्र ठरवले आणि महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देणाऱ्या अनेक खात्यांच्या मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, जलसंपदा, अर्थ अशा अनेक महत्वाच्या खात्यावर आपला ठसा उमटवला. अजित पवार एक कार्यक्षम, शिस्तप्रिय व वक्तशीर प्रशासक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा दिवस सकाळी खूप लवकर म्हणजे पहाटे पाचला सुरु व्हायचा. अगदी कोविडच्या साथीच्या काळात सुद्धा ते भल्या सकाळी मंत्रालयात हजर राहत होते आणि कामाचा निपटारा करत होते.

हे देखील वाचा 

राजकरणातील दादा ते घरातील मंडळींसाठी आधारवड- अजित पवार

अजित दादांची राजकीय कारकीर्द अलीकडे खूप वादळी ठरली होती. २०१९ मध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर ७२ तासाचे सरकार स्थापन केले. नंतर ते नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीत सामील झाले आणि उद्धव ठाकरे मंत्री मंडळात अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री झाले. २०२२ जून मध्ये ठाकरे मंत्रीमंडळ कोसळल्यावर ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. एक वर्ष विरोधी पक्षनेतेपद सांभाळल्यावर त्यांनी आपले काका शरद पवार यांच्यापासून फारकत घेतली व आपल्या ८ सहकार्यांबरोबर ते कुणाच्या ध्यानीमानी नसताना एकनाथ शिंदे यांच्या भाजप शिवसेना युतीच्या मंत्री मंडळात सामील झाले. याही मंत्रीमंडळात ते उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री झाले. त्यांची अर्थखात्यावर चांगली पकड होती व ते लोकानुनय न करता आपली मते रोखठोकपणे मांडत असत. लाडकी बहीण योजनेचा प्रचंड बोजा महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडत आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. अजितदादा स्वभावाने फटकळ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या पोटात एक व ओठात एक अशी वृत्ती नव्हती. काम होणार नसेल तर ते समोरच्याला तसे आधीच सांगत असत त्यामुळे गैरसमज निर्माण होत नसत.

अजितदादांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा त्यांनी कधी लपवून ठेवली नाही. २००४ मध्ये आपल्याला चांगली संधी निर्माण झाली होती पण काका शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे सोपवले ही खंत त्यांनी अनेकवेळा जाहीरपणे व्यक्त केली होती. अजित पवार हे शरद पवार यांच्या तालमीत तयार झाले पण पुढे राजकारणात त्यांनी स्वतःची स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली होती. त्यांनी कार्यकर्त्यांचे मोहोळ निर्माण केले होते. त्यांचे दुःखद निधन झाल्यावर कार्यकर्त्यांनाही भावना अनावर झाल्या. महाराष्ट्राच्या राजकारणाला निराळे वळण लावण्याच्या तयारीत ते असतानाच त्यांची अकाली’एक्झिट ‘ झाली. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून येणार नाही.

लेखक – रघुनंदन भागवत


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.