Home » Bhojshala Saraswati Temple : सरस्वती मंदिराचे रहस्य

Bhojshala Saraswati Temple : सरस्वती मंदिराचे रहस्य

by Team Gajawaja
0 comment
Share

हिंदू धर्मात वसंत पंचमाच्या पुजेला अनन्य साधारण महत्त्व आहे. विद्येची देवता असलेल्या माता सरस्वतीची या दिवशी पूजा केली जाते. देशभरात देवी सरस्वतीची काही प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यामध्ये ज्ञान सरस्वती मंदिर, तेलंगाणा, पुष्कर सरस्वती मंदिर, राजस्थान, पानचिक्कड सरस्वती मंदिर केरळ, कोथनूर सरस्वती मंदिर, तामिळनाडू आदींचा समावेश आहे. मात्र या मंदिरांपेक्षा सर्वात जुने मंदिर हे मध्यप्रदेश, धार येथील भोजशाळा सरस्वती मंदिर असल्याचा दावा करण्यात येतो. ही भोजशाळा सध्या वादाचा विषय ठरली आहे. ११०० वर्ष जुने असलेले हे हिंदू मंदिर असल्याचा दावा आहे, आणि यासंदर्भात न्यायालयात लढा चालू आहे. ( Bhojshala Saraswati Temple )

धार येथील प्राचीन भोजशाळा संकुलावरून हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये वाद आहे. हिंदू समुदाय, राजा भोज यांच्या कारकिर्दीत बांधलेल्या या मंदिराला देवी वाग्देवीचे मंदिर मानतो, तर मुस्लिम समुदाय ते कमल मौला मशीद असल्याचा दावा करतो. न्यायलायनं आता वसंत पंचमीला येथे पूजा करण्याची हिंदूंना परवानगी दिली आहे. वसंत पंचमी आणि भोजशाळा सरस्वती मंदिर यांचा हजारो वर्षापासूनचा इतिहास आहे. धार येथील परमार राजवंशातील एक महान आणि प्रसिद्ध शासक राजा भोज यांनी या भोजशाळा सरस्वती मंदिराचे निर्माण केल्याचे दाखले आहेत.

राजा भोज हे कुशल योद्धा, विद्वान, कवी आणि कला, विज्ञानाचे संरक्षक होते. राजा भोज हे स्वतः पंडित होते. त्यांनी अनेक विषयांवर ग्रंथ लिहिले. त्यामुळे त्यांना ‘कविराज’ अशी उपाधीही मिळाली होती. सरस्वतीकण्ठाभरण, श्रृंगारमंजरी, चारुचर्या, तत्वप्रकाश, व्यवहारसमुच्चय यांसारख्या ग्रंथांचे लेखन राजा भोज यांनी केले आहे. याशिवाय त्यांना स्थापत्यकलेमध्येही रुची होती. त्यांनी भोजपूर शहराची स्थापना केली. भव्य भोजेश्वर मंदिराचे बांधकाम केले आणि तीन धरणे बांधली. सोबतच राजा भोज यांनी विमान आणि रोबोट तंत्रज्ञानावरही काम केल्याची माहिती उपलब्ध आहे. धार येथे संस्कृत अभ्यासाचे केंद्र म्हणून त्यांनी ‘भोजशाळा’ ची स्थापना केली. याच भोजशाळेवरुन आता वाद सुरु झाला आहे. ( Bhojshala Saraswati Temple )

११ व्या शतकात राजा भोज यांनी बांधलेली भोजशाळा ही त्याकाळी विद्येचे माहेरघर होते. ही भोजशाळा म्हणजे, एक भव्य सरस्वती मंदिर आणि संस्कृत विद्यापीठ म्हणून देश-विदेशात ओळखले जात होते. देशातील प्रमुख साहित्य केंद्रामध्ये या मंदिराचा उल्लेख होत असे. राजा भोज हे एक महान विद्वान होतेच पण ते विद्येचे प्रचारकही होते. त्यांना हे शिक्षण केंद्र स्थपानेसाठी प्रत्यक्ष देवी सरस्वतीनं आदेश दिल्याचेही काही स्थानिक सांगतात. यामागे व्यापक दृष्टीकोन होता. धारला शिक्षणाचे केंद्र बनवण्यासाठी इ.स. १०३४ च्या सुमारास येथे निवासी संस्कृत विद्यापीठाची पायाभरणी करण्यात आली. या केंद्रात धर्मग्रंथ, भाषा, संस्कृती आणि संगीत यासह विविध विषयांवर अभ्यास केला जात असे. या मंदिराची उभारणीही भारतीय स्थापत्यशास्त्राचा अदभूत उदाहरण म्हणून पाहिली जाते. यामध्ये संस्कृत श्लोकांनी कोरलेले शेकडो खांब आहेत. ( Bhojshala Saraswati Temple )

वसंत पंचमीच्या दिवशी येथे देवी सरस्वतीची मूर्ती स्थापित करण्यात आली आणि त्यानंतर शतकानुशतके हे ठिकाण शिक्षणाचे केंद्र म्हणून कार्य करीत राहिले. याच भोजशाळा सरस्वती मंदिराला वाग्देवी देवी मंदिरही म्हटले जाते. पौराणिक ग्रंथांनुसार, देवी सरस्वतीचे वर्णन वाग्देवी आणि ब्रह्मस्वरूपा असे केले आहे. तिला कामधेनुप्रमाणे सर्व गोष्टींची दाता मानली जाते. विष्णुधर्मोत्तर पुराणात वाग्देवीच्या रूपाचे वर्णन केले आहे. देवीचे हे रूप ज्ञान, कला आणि निर्मितीचे प्रतीक मानले जाते. स्कंद पुराणात देवी सरस्वतीचे वर्णन डोक्यावर चंद्रकोर असलेले आणि कमळाच्या आसनावर विराजमान असल्याचे वर्णन केले आहे.

=======

हे देखील वाचा : Vasant Panchami: विद्येची देवता असलेल्या देवी सरस्वतीची उत्पत्ती झाली कशी?

=======

राजा भोज यांच्यानंतर हे ठिकाण मुस्लिम शासकांनी ताब्यात घेतले आणि त्याचे कमल मौला मशिदीत रूपांतरित कऱण्यात आले. मात्र आजही येथे मंदिराचे अवशेष अस्तित्वात आहेत. त्यामुळेच हे सरस्वती मंदिर पुन्हा हिंदूंच्या ताब्यात मिळावे, यासाठी न्यायालयात वाद सुरु आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, सध्याची रचना जुन्या मंदिरासारख्या वास्तुशिल्पीय अवशेषांचा वापर करून बांधण्यात आली होती. त्यातून हे मूळतः हिंदू स्थळ होते हे सिद्ध होते. ( Bhojshala Saraswati Temple )

या भोजशाळेचा वाद न्यायालयात आहे. मात्र वसंत पंचमीला या मंदिरात देवी सरस्वतीची पूजा करण्यासाठी हिंदू पक्ष अडून राहिला, त्यामुळे भोजशाळेत वसंत पंचमीला पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच फक्त दोन तास नमाज पठणासाठी परवानगी दिली आहे. या सर्वात भोजशाळा सरस्वती मंदिराची भव्यता पुन्हा चर्चेत आली आहे. राजी भोज यांनी संस्कृत आणि भारतीय शिक्षणासाठी स्थापन केलेल्या या मंदिराचे आवार हे विस्तृत होते. तिथे स्वतंत्र विद्यापीठ होते. त्यामध्ये फक्त भारतातीलच नव्हे तर परदेशातील विद्यार्थीही शिक्षणासाठी येत असल्याची माहिती आहे.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.