विद्येची देवी असलेल्या माता सरस्वतीचे पूजन वसंत पंचमीच्या दिवशी सर्वत्र मोठ्या थाटात उद्या प्रत्येक घराघरात होणार आहे. माघ शुक्ल पंचमीला साजरा होणारा वसंत पंचमीचा सण ज्ञान आणि विद्याची देवी सरस्वतीला समर्पित आहे. यावर्षीच्या वसंत पंचमीच्या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत असल्यानं उद्याची वसंत पंचमी अधिक लाभकारक ठरणार आहे. माघ शुक्ल पंचमी किंवा वसंत पंचमीला भारतीय परंपरेनुसार विद्यारंभ संस्कार केले जातात. असे मानले जाते की, या दिवशी विद्यारंभ संस्कार केल्याने देवी सरस्वतीकडून विशेष आशीर्वाद मिळतो. वसंत पंचमी २३ जानेवारी २०२६ रोजी साज-या होणा-या या वसंत पूजनामागची कथा आणि त्याचे मुहूर्त जाणून घेऊयात. ( Vidyarambh Muhurat 2026 )
दरवर्षी माघ शुक्ल पंचमीला साजरा होणारा वसंत पंचमीच्या सणाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. हा दिवस ज्ञान, शिक्षण, कला आणि संगीताची प्रमुख देवता देवी सरस्वतीला समर्पित आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये वसंती पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची आराधना केली जाते. देवी सरस्वतीला ज्ञान, बुद्धी, विद्या, कला आणि विज्ञानाची देवी म्हणून ओळखले जाते. वसंत पंचमीला श्री पंचमी आणि सरस्वती पूजा असेही म्हटले जाते.

या सरस्वती पूजनात घरातील मुलांवर विद्यारंभ संस्कार केले जातात. असे मानले जाते की, या दिवशी मुलांचे शिक्षण सुरू केल्याने त्यांची बुद्धी विकसित होते आणि देवी सरस्वतीचे अपार आशीर्वाद त्यांना मिळतात. सोबतच वसंत पंचमीचा दिवस हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी केल्या जाणाऱ्या शुभ कार्यांसाठी स्वतंत्र मुहूर्त काढण्याची आश्यकता नसते. लग्न, गृहप्रवेश समारंभ, नवीन व्यवसायाची सुरुवात, शैक्षणिक प्रवेश आणि अन्य शुभ कार्यासाठी ही दिवस शुभ मानला जातो. ( Vidyarambh Muhurat 2026 )
शास्त्रांनुसार, सूर्योदय ते दुपारच्या दरम्यान पंचमी तिथी येते तो संपूर्ण दिवस सरस्वती पूजेसाठी योग्य मानला जातो. या वर्षी माघ शुक्ल पंचमी तिथी २२ जानेवारी २०२६ रोजी पहाटे २:२८ वाजता सुरू होईल आणि २३ जानेवारी २०२६ रोजी पहाटे १:४६ वाजता संपेल. म्हणून, उदय तिथीच्या श्रद्धेनुसार, या वर्षी वसंत पंचमी २३ जानेवारी रोजी साजरी केली जाईल. या दिवशी, देवी सरस्वतीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ७:२५ ते दुपारी १२:५८ या दरम्यान असेल.
या काळात, विद्यार्थी, कलाकार आणि ज्ञान साधकांना देवी सरस्वतीची पूजा करण्याचे आवाहन हिंदू धर्म अभ्यासकांनी केले आहे. यावर्षीची वसंत पंचमी अधिक खास ठरणार आहे कारण शिव आणि उत्तराभद्र नक्षत्र देखील वसंत पंचमीला असल्यामुळे या वसंत पंचमीचे महत्त्व दुप्पट होते. या दिवशी पुस्तके, वह्या आणि इतर वस्तूंची पूजा करण्यात येते. मुलांच्या वहिवर या दिवशी सरस्वती मंत्र लिहून काही धार्मिक देवी सरस्वतीच्या १०८ मंत्रांचा जपही या दिवशी करतात. ( Vidyarambh Muhurat 2026 )
वसंत पंचमीला ‘श्री पंचमी’ किंवा ‘ज्ञान पंचमी’ असेही म्हणतात. हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. वसंत ऋतूला “ऋतूंचा राजा” म्हटले जाते. या दिवसापासून निसर्गाचे रुप बदलण्यास सुरुवात होते, हिवाळा कमी होण्यास सुरुवात होते. झाडांची पाने ही पिवळ्या रंगाची होऊ लागतात. त्यामुळेच निसर्गासोबत या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात.
=======
हे देखील वाचा : Saraswati : दिवसाच्या ‘या’ प्रहरात देवी सरस्वती करते प्रत्येकाच्याच जिभेवर वास
=======
पिवळा रंग हा सकारात्मकता आणि शुभ संकेताचे प्रतीक मानला जातो. धार्मिकदृष्ट्या, पिवळा रंग पवित्रता, साधेपणा आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. त्यातही देवी सरस्वतीला हा रंग प्रिय आहे. सूर्याच्या तेजाचे प्रतीक असलेला हा पिवळा रंग अज्ञानाचा अंधार दूर करतो असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी या पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याचे महत्त्व आहे. ( Vidyarambh Muhurat 2026 )
फक्त कपड्यांचा रंगच नाही, तर वसंत पंचमीला देवी सरस्वतीला पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. त्यात गोड केशर भात, केशर हलवा, खिचडी यांचा समावेश असतो. बदलत्या ऋतूंमध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असे हे पदार्थ मानले जातात. एकूणच वसंत पंचमीचा हा सण फक्त विद्येसाठी नाही, तर आरोग्यासाठीही महत्त्वाचा आहे.
सई बने
