इराणमध्ये सुरु असलेल्या हिंसक निदर्शनांमध्ये आतापर्यंत २००० लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी इराणी अधिका-यांनी दिली आहे. या सर्वात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या निदर्शकांना, निदर्शने सुरु ठेवा, मदत रस्त्यात आहे, अशाप्रकारचा संदेश दिल्यामुळे अमेरिका केव्हाही इराणवर हल्ला करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वात इराणमधील हिंसाचारात वाढ झाल्यावर आणि निदर्शकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याच्या बातमीनंतर इराणचे निर्वासित युवराज रझा पहलवी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. ( Ayatollah Khamenei )
इराणच्या रस्त्यावर सध्या सर्वत्र आगीचे लोट दिसत असून येथील सरकारी रुग्णालयाच्या बाहेर काळ्या कपड्यात बांधलेल्या मृतदेहाच्या रांगा आहेत. गेल्या अठरा दिवसापासून इराणी जनता सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या विरोधात रस्त्यावर निदर्शने करत आहे.

या निदर्शकांना रोखण्यासाठी खामेनी यांनी त्यांच्या बासीज सैनिकांना उतरवल्यामुळे हे आंदोलन अधिक चिघळले आहे. या बासीज सैनिकांनी निदर्शकांवर निर्दयपणे गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच तिथे मृतांचा आकडा अधिक वाढण्याची भीती असून यात अमेरिका निदर्शकांचा जीव वाचवण्याच्या निमित्तानं उडी मारणार हे निश्चित झाले आहे. इराणमध्ये चलनाच्या अवमूल्यनानंतर सुरु झालेल्या निदर्शनांमध्ये आता सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. इराणमधील ही निदर्शने हिंसक झाली असून यात आतापर्यंत २००० लोकांचा मृत्यू झाला आहे. खुद्द इराणच्या वरिष्ठ अधिका-यांनी ही माहिती दिली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. ( Ayatollah Khamenei )
दोन आठवड्यापासून सुरु असलेल्या या निदर्शकांना आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संदेश दिला आहे. देशभक्तांनो, निदर्शने करत रहा, तुमच्यासाठी पाठवलेली मदत रस्त्यात आहे. सरकारी इमारती ताब्यात घ्या, आणि तुमच्यावर अत्याचार करणा-यांची नावे लक्षात ठेवा, त्यांना आता किंमत मोजावी लागणार आहे. सोबतच ट्रम्प यांनी इराणी अधिकाऱ्यांसोबतच्या सर्व बैठका रद्द केल्याची घोषणाही केली. ट्रम्प यांच्या या संदेशामुळे इराणच्या रस्त्यावर उतरलेल्या निदर्शकांनी एकच जल्लेष केला असून अधिक जोमाने अयातुल्ला खामेनी यांचा निषेध सुरु केला आहे. या निदर्शकांना अटकाव करण्यासाठी इराणी सरकारचे अधिकारी आवाहन करीत आहेत. त्यांनी इराणमधील हिंसाचारासाठी अमेरिका आणि इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
इराणमधील प्रशासनाचे अधिकारी हे आरोप करत असतांना इराणी पत्रकारही निदर्शकांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत आता एक होऊ लागले आहेत. कार्यकर्त्या आणि पत्रकार मसीह अलिनेजाद यांनी निदर्शनांवर अत्याचार होत असून याबाबत आंतरराष्ट्रीय चर्चा आणि कारवाई होण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. ( Ayatollah Khamenei )

इराणमधील ही हिंसाचाराची परिस्थिती एवढी गंभीर आहे की, प्रशासनातील अधिका-यांनी १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर प्रथमच इराणच्या सर्व शहरांमध्ये सरकारविरोधात जनता रस्त्यावर उतरल्याचे सांगितले. याबाबत दखल घेण्यासारखी गंभीर बाब म्हणजे, हे आंदोलन हाताबाहेर जात असल्याचे ध्यानात आल्यावर बासीज सैन्य खामेनींच्या मदतीला आले असून त्यांनी शेकडो लोकांना ठार मारल्याची माहिती आहे. इराणमधील मानवाधिकार संघटनाही शेकडोंचा मृत्यू झाल्याचे सांगत आहेत. इराणमध्ये सध्या इंटरनेट पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा निश्चित सांगता येणार नाही. निदर्शकांनी वेगवेगळ्या शहरामधील सरकारी इमारती ताब्यात घ्यायला सुरुवात केल्यावर त्यांच्यावर गोळीबार केल्याच्या घटना घडल्या आहेत. ( Ayatollah Khamenei )
गेल्या दोन आठवड्यापासून या निदर्शनांमुळे इराण ठप्प झाल्यासारखा आहे. त्यातच अमेरिकेच्या लष्करी हवाई हल्ल्यांची भीती असल्यामुळे इराणमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या सर्वात निर्वासित युवराज रझा पहलवी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे इऱाणची इस्लामिक राजवट संपवण्याची मागणी आहे. तसेच इराणमधील दडपशाही थांबवण्याचे आवाहनही केले आहे. इथे हा मुद्दा लक्षात घ्यावा लागले की, आज ट्रम्प यांनी निदर्शकांना जे आवाहन केले आहे, त्याच पद्धतीनं रझा पहलवी हे निदर्शकांना आवाहन करत होते. या सर्वात इराणच्या रस्त्यांवरील परिस्थिती दारुण आहे. इराणची राजधानी तेहरानमधील रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा ढीग आहे. या ढिगाऱ्यात काही लोक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह शोधत असल्याचे दृश्य आहे. राजधानी तेहरानमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून येथील इंटरनेट सुविधाही बंद आहे. निदर्शक अंधारामध्ये खामेनींच्या विरोधात घोषणा देत असल्याचे चित्र इराणच्या बहुतांश रस्त्यावर दिसत आहे. ( Ayatollah Khamenei )
=======
हे देखील वाचा : USA VS Greenland : अमेरिकन सैन्याला कुत्र्यांचे भय
=======
या सर्वात इराणी सैनिक स्टारलिंकद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हिटी खंडित करण्यासाठी घरोघरी छापे टाकत आहेत. त्यामुळेच ट्रम्प संतापले असून त्यांनी इराणला अंतिम इशारा दिला आहे. दरम्यान, इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी अमेरिका किंवा इस्रायलने इराणवर हल्ला केला तर दोघांनीही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल असा इशारा दिला आहे. इराणमध्ये ही निदर्शने ज्यांच्या विरोधात होत आहेत, त्या अयातुल्ला खामेनी यांनी आपले कुटुंब सुरक्षेसाठी रशियामध्ये हलवल्याचीही माहिती आहे. म्हणूनच इराणमध्ये पुढच्या काही तासातच अमेरिका सैन्य कारवाई करणार हे निश्चित मान्यण्यात येत आहे.
सई बने
