Home » Iran Grandmothers : आंदोलनामागे इराणच्या आजी

Iran Grandmothers : आंदोलनामागे इराणच्या आजी

by Team Gajawaja
0 comment
Share

इराणमधील जनतेचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वोच्च नेते खामेनी यांच्या राजवटीविरुद्ध पेटलेली बंडाची आग देशभर पसरली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनला चिरडण्यासाठी आता अयातुल्ला खमेनी यांच्या नेतृत्वाखालील राजवटीने निदर्शकांना थेट फासावर लटकवण्यात येईल, अशी धमकी दिली आहे. निदर्शनांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांना देवाचे शत्रू मानले जाईल, असे सांगून खामेनी यांनी आंदोलकांना भावनिक सादही घातली आहे. मात्र या सर्वांचा कुठलाही परिणाम या आंदोलकांवर होतांना दिसत नाही. विशेषतः आता या आंदोलनात उतरलेल्या महिला या सोशल मिडियावर आपले बुरखे फाडून टाकण्याचे व्हिडिओ शेअर करीत आहेत. यामध्ये “मला मारून टाका… मी हिजाब घालणार नाही.” हे पर्शियन गाणं गाजत असून यावर रील बनवून इराणी मुली नाचत आहेत, आपला बुरखा काढून टाकत आहेत आणि आपल्या केसांना मोकळे सोडत आहेत. यातून त्या खामेनींच्या कट्टरवादाला उत्तर देत आहेत. ( Iran Grandmothers )

इराणच्या या तरुणी अचानक आपल्या हक्कांसाठी आक्रमक झाल्या नाहीत, तर त्यांना त्यांच्या घरातील ज्येष्ठ महिलांची साथ मिळाली आहे. इराणमधील निदर्शनांमध्ये काही दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात ती महिला इराणी राजवटीला आव्हान देत असून, “मला सरकारची भीती वाटत नाही; मी ४७ वर्षांपासून मृत आहे.” असे सांगतांना दिसत आहे. ( Iran Grandmothers )

इराणमध्ये इस्लामिक क्रांतीपूर्वी ज्या महिलांना स्वातंत्र्याचा श्वास घेतला, त्यापैकीच ही महिला आहे. पण आता त्याच महिलांच्या घरातील अन्य महिलांना हिजाब आणि अन्य बंधनांच्या विळख्यात रहावे लागत आहे. इराणमध्ये मुलींच्या लग्नाचे वयही कमी करण्यात आल्यामुळे या महिलांच्या संतापात भर पडली आहे. या सर्वांचाच राग व्यक्त करण्यासाठी आता येथील तरुणींच्या मागे त्यांच्याच घरातील ज्येष्ठ महिला उभ्या राहिल्या आहेत. इराणमध्ये सुरु असलेल्या उद्रेकामध्ये १९७९ मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीपूर्वी इराण कसा होता, याची चर्चा सुरु झाली आहे. यातच इराणचे शाह मोहम्मद रेझा पहलवी यांच्या कारकीर्दीत महिलांना कशाप्रकारे स्वातंत्र्य होते, याची छायाचित्रे सोशल मिडियाच्या माध्यमातून घरोघरात पाठवण्यात येत आहेत. ( Iran Grandmothers )

राजेशाहीमध्ये महिला हिजाबशिवाय इऱाणच्या रस्त्यावर मुक्तपणे फिरु शकत होत्या. त्यांना स्वातंत्र्य होते, आवडीचे शिक्षण घेण्याची मुभा होती. फारकाय इऱाणच्या महिलांचा एक फुटबॉल संघही होता. पण १९८९ मध्ये खामेनी हे इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते झाले आणि हा देश कट्टरतावाद्यांच्या हातात गेला. ८६ वर्षाचे खामेनी यांनी त्यांच्या ३६ वर्षाच्या कार्यकाळात इराणमधील सत्ता मुल्ला मौलवींच्या हातात दिली. त्याचे परिणाम आज इऱाणमध्ये दिसत आहेत. इथे महागाई, दुष्काळ आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय येथील महिलांचे जीवन हे एखाद्या काळरात्रीसारखे झाले आहे.

राजघराण्याच्या कार्यकाळात ज्या महिलांनी स्वातंत्र उपभोगले आहे, त्या आता आपल्या घरातील तरुणींना स्वातंत्र्यासाठी आंदोलन करा, रस्त्यावर उतरा म्हणून प्रोत्साहन देत आहेत. इस्लामिक क्रांतीपूर्वी इराण कसा होता, याचे अनेक व्हिडिओ आता सोशल मिडियावर फिरत आहेत. तेव्हा इराणच्या महिला युरोपसारख्या फॅशनेबल कपड्यांसारखे कपडे परिधान करायच्या तर पुरुष पाश्चात्यांसारखे सूटमध्ये दिसायचे. पहलवी राजवंश इराणमध्ये राज्य करत होता, तेव्हा इराण हा प्रतीयुरोप म्हणून ओळखला जात होता. १९२५ ते १९७९ पर्यंत चाललेल्या या राजवटीत, इराणचे आधुनिकीकरण झाले. तेहरानला “मध्य पूर्वेचे पॅरिस” म्हणून ओळखले जात होते. येथील महिला पॅरिसच्या महिलांना टक्कर देतील, अशा फॅशनेबल कपडे परिधान करत होत्या. महाविद्यालयात जात होत्या आणि हिजाबशिवाय रस्त्यावर मुक्तपणे फिरत होत्या. ( Iran Grandmothers )

=======

हे देखील वाचा : Iran Woman Protest : सिगरेटनं खामेनींची फोटो जाळून इराणी महिलांचा आगळा निषेध

=======

त्याच महिला आता सत्तरीच्या पार झाल्या आहेत, आणि त्यांना हिजाबशिवाय बाहेर पडता येत नाही. पण त्यातही त्यांना दुःख त्यांच्या कुटुंबातील तरुणवर्गासाठी आहे. त्यांनी जिथे स्वातंत्र्य अनुभवले, तिथेच त्यांच्या घरातील तरुणींना हिजाबशिवाय बाहेर गेल्यास चाबकाचे फटके खावे लागत आहेत. यामुळे इराणच्या या आजींनी आपल्या नातींना आंदोलनासाठी प्रवृत्त केले आहे. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीने इराणचा चेहरा पूर्णपणे बदलला. अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्या पुनरागमनानंतर येथील राजेशाही संपली. त्यानंतर इस्लामिक प्रजासत्ताक स्थापन झाले. यात पहिला बळी महिलंचा गेला. त्यांना हिजाब अनिवार्य झाला. रस्त्यावर एकटे गेल्यास चाबकाचे फटके, वा थेट फाशीवर लटकवले जाऊ लागले. यासाठी अनेकवेळा इराणमधील महिलांना आंदोलन केले, मात्र प्रत्येकवेळी त्यांचे आंदोलन क्रूरपणे चिरडून टाकण्यात आले. पण आत्ता इराणमधील महिलांच्या सर्वच पिढ्या एकत्रितपणे आंदोलनात उतरल्या असून कट्टरवादी खामेनी सरकारचा अंत केल्याशिवाय माघार घेणार नाही, असा त्यांचा संकल्प आहे. ( Iran Grandmothers )

सई बने.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.