अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलानंतर आपली वक्रदृष्टी ग्रीनलॅंडवर वळवली आहे. ट्रम्प यांनी ग्रीनलॅंडवर आपला हक्क असल्याचे सांगून ग्रीनलॅंडला अमेरिकेमध्ये सामील करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. या सर्वांवर जगभरात चर्चा होत असतांना ट्रम्प यांच्या चाहत्यांनी एक अजब प्रस्ताव पुढे आणला आहे. ट्रम्प यांच्या चाहत्यांच्या मते, ट्रम्प यांचा धाकटा मुलगा, बॅरन हा डेन्मार्कचा जावई होणार आहे. डॅनिश राजघराण्याच्या राजकुमारी सोबत बॅरनचे लग्न होणार असून बॅरनला हुंडा म्हणून ग्रीनलॅंड मिळणार आहे.

ट्रम्प यांचे चाहते फक्त हा अजब गजब प्रस्ताव देऊन शांत राहिले नाहीत, तर त्यांनी बॅरन ट्रम्प आणि डॅनिश राजकुमारी इसाबेला यांच्या लग्नाचे काल्पनिक फोटोही सोशल मिडियावर शेअर केले आहेत. ट्रम्प यांच्या या चाहत्यांच्या कल्पनेमागे खुद्द ट्रम्प यांचीच रणनिती असल्याचीही चर्चा आहे, त्यामुळे डेन्मार्कमध्ये ट्रम्प यांच्याविरोधातील धार अधिक वाढली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडबाबत डेन्मार्कला धमकी दिली आहे. ट्रम्पसोबत अन्य अमेरिकन नेते देखील ग्रीनलँडवर ताबा घेण्याबाबत विधाने करत आहेत. या त्यांच्या धमक्यांना आपण घाबरत नसल्याचे डेन्मार्क आणि ग्रीनलॅंडमधील सरकारनं स्पष्ट केले आहे.
पण आता ट्रम्पसोबत त्यांचे चाहतेही या दोन देशांना धमकवण्याची पुढे आले आहेत. त्यांनी त्यासाठी चक्क डोनाल्ड ट्रम्प यांच्या धाकट्या मुलाचा आधार घेतला आहे. या ट्रम्पच्या चाहत्यांनी एक योजनाच सुचवली आहे, त्यानुसार ट्रम्प यांचा धाकटा मुलगा बॅरन ट्रम्प आणि डॅनिश राजकुमारीचे लग्नच जुळवले आहे. डेन्मार्कची राजकुमारी इसाबेलाबरोबर बॅरनचे लग्न झाले की, ग्रीनलँड, अमेरिकेला हुंडा म्हणून मिळेल, असे या चाहत्यांनी सांगितले आहे. असे झाल्यास अमेरिका आणि ग्रीनलॅंड यांच्यामध्ये जो युद्धसंघर्ष होणार आहे, तो टाळला जाणार असल्याचा शोधही या ट्रम्प यांच्या चाहत्यांनी लावला आहे.
ग्रीनलँड हा डेन्मार्कचा एक स्वायत्त प्रदेश आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प ग्रीनलॅंड हा अमेरिकेसाठी महत्त्वाचा असल्याचे मानतात. अमेरिकेनं ग्रीनलॅंडला ताब्यात घेतले नाही तर, रशिया आणि चीन हे दोन देश त्यावर ताबा मिळवू शकतात. असे झाले तर, हे दोन देश अमेरिकेचे शेजारी होतील, आणि त्यांच्यापासून अमेरिकेला कायम धोका रहाणार आहे. यामुळेच अमेरिकेला आपले शेजारी निवडण्याचा अधिकार असून ग्रीनलॅंड अमेरिकेत सामील झाल्यावर भविष्यात अमेरिकेची सुरक्षा अभेद्य रहाणार असल्याचा अजब दावा डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. जेवढे ट्रम्प अजब दावे करत आहेत, त्यांच्यावर त्यांचे चाहतेही असून त्यांनी आता बॅरन आणि डॅनिश राजकुमारीचे लग्न लावले आहे. एवढा प्रस्ताव देऊन ट्रम्पचे चाहते शांत राहिले नाहीत, तर त्यांनी बॅरन आणि डॅनिश राजकुमारी इसाबेला यांच्या लग्नाचे काल्पनिक फोटो तयार केले आहेत. त्यात राजकुमारी इसाबेला ही शाही पोशाखामध्ये बॅरेनसोबत असून मागे ग्रीनलॅंडचा नकाशाही आहे, त्यातून इसाबेला हुंडा म्हणून ग्रीनलॅंडला अमेरिकेसोबत जोडणार हे सूचित करण्यात आले आहे.
=======
हे देखील वाचा : USA Targets Greenland : खनिजांच्या अपार साठ्यामुळे ट्रम्प यांना हवे आहे ग्रीनलॅंड
=======
डेन्मार्कची राजकुमारी इसाबेला ही राजा फ्रेडरिक आणि राणी मेरी यांची मुलगी आणि डॅनिश राजघराण्यातील एक प्रमुख सदस्य आहे. ती सध्या सिंहासनाच्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर बॅरन हा ट्रम्प यांचा सर्वात धाकटा मुलगा आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची तिसरी पत्नी मेलानिया यांचा विवाह २००५ मध्ये झाला. बॅरेन सध्या न्यू यॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमध्ये शिक्षण घेत असून त्याला ट्रम्प कुटुंबाच्या राजकीय वारशाचा संभाव्य चेहरा मानले जाते.
यात फक्त राजकुमारी इसाबेला नाही तर चीनच्या अध्यक्षांच्या मुलीचे नावही बॅरनसोबत जोडण्यात आले आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची एकुलती एक मुलगी, शी मिंगझे हिचे बॅरनसोबत लग्न लावण्याचा हा प्रस्ताव आहे. शी मिंगझे ही अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स राज्यातील विद्यापीठात शिक्षण घेत आहे. अशात ती अमेरिकेची सून झाली तर तिच्या सुरक्षेचा प्रश्नही रहाणार नाही, आणि चीन अमेरिकेसोबत वादही घालणार नाही, असा आणखी एका ट्रम्प यांच्या चाहत्यांचा प्रस्ताव आहे. या सर्वांसाठी या चाहत्यांनी ऑस्ट्रियातील हॅब्सबर्ग राजवंशाच्या काळातील एका घटनेचे उदाहरण दिले आहे.
सई बने
