Home » Marathi Legends : या तिन्ही मराठी दिग्गजांनी साऊथचं अख्खं मार्केट खाल्लय !

Marathi Legends : या तिन्ही मराठी दिग्गजांनी साऊथचं अख्खं मार्केट खाल्लय !

by Team Gajawaja
0 comment
Share

बॉलिवूडमध्ये एक छोटासा रोल मिळाल्यावर मराठी कलाकारांना मीपणा येतो, अशा कमेंट्स मराठी प्रेक्षक अनेकदा करत असतात. सध्या अनेक मराठी कलाकारांना बॉलिवूडच्या कोणत्या न कोणत्या चित्रपटात काही न काही रोल मिळतोच… यात एक नाव म्हणजे उपेंद्र लिमये… पण मराठीमध्येच असे तीन दिग्गज आहेत, ज्यांनी अख्खं साऊथ मार्केट खाल्लंय. त्यांनी मिळून तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये शंभरपेक्षा अधिक सुपर-डुपर हिट चित्रपट दिले आहेत. पण त्यांची चर्चा होत नाही आणि ते दिग्गज कलाकारसुद्धा ही गोष्ट मिरवत नाहीत. ते म्हणजे अभिनेते सयाजी शिंदे, सचिन खेडेकर आणि अतुल कुलकर्णी ! तिघांनीही साऊथच्या चित्रपटांमध्ये इतकं काम केलं आहे, की त्या इंडस्ट्रीत त्यांना एक मान एक ओळख मिळाली आहे. अनेक दिग्दर्शकांना ते आपल्या चित्रपटासाठी लकी वाटतात. व्हीलनपासून कित्येक सपोर्टिंग रोल्स त्यांनी केलेले आहेत. त्यामुळे टीव्हीवर जेव्हा साऊथचे सिनेमे लागतात, तेव्हा या तिन्ही कलाकारांना पाहून एक वेगळाच अभिमान वाटतो. इथे आणखी एक गोष्ट सांगण्यासारखी वाटते की, साउथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार रजनीकांत म्हणजेच शिवाजीराव रामोजीराव गायकवाड हेसुद्धा एक मराठी व्यक्तिमत्त्व आहेत. तर सुरुवातीला आपण सयाजी शिंदे यांच्याबद्दल जाणून घेऊया. साधी राहणी, पिळदार मिश्या आणि कडक Acting… हा व्हिलन तसा सगळ्यांनाच भावतो. 

आता विषय साऊथचा आहे, पण सयाजी शिंदे यांनी फक्त साऊथमध्येच नाही भारतातल्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे. मराठीपासून त्यांची सुरुवात झाली ती तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, हिंदी, बंगाली, भोजपुरी, गुजराती आणि इंग्लिशपर्यंत आलेली आहे. सयाजी यांची मराठी नाटकं आणि मुव्हीजमुळे एक ओळख तयार झालेली होती. त्यातच त्यांनी शूल या हिंदी चित्रपटात केलेला बच्चू यादव हा रोल बराच गाजला. यानंतर तमिळ-तेलुगू निर्मात्यांची नजर त्यांच्यावर पडली आणि २००० साली भारथी या तमिळ तर २००३ साली टॅगोर या तेलुगू मुव्हीमधून त्यांनी ऑफिशिअली साऊथमध्ये प्रवेश केला. सयाजी शिंदे यांचा साऊथच्या चित्रपटांचा काऊंट ऐकूनच तुम्ही हैराण व्हाल. सयाजी शिंदे यांनी आजपर्यंत १०७ तेलुगू,  ३९ तमिळ, १३ कन्नड आणि २ मल्याळम चित्रपट केले आहेत. तेलुगू सुपरस्टार महेश बाबू यांच्यासोबत ते अनेकदा दिसून आले आहेत. तेलुगूमध्ये तर त्यांचा एक सेपरेट फॅनबेस आहे. त्यांचे रोल्स इतके प्रभावशाली आहेत की, सहसा त्यांना त्यांच्या नावाने नाही तर त्यांनी पार पाडलेल्या भूमिकांच्या नावानेच ओळखलं जातात. असा एक जबरदस्त Aura त्यांनी साऊथमध्ये निर्माण करून ठेवला आहे.

 आता सचिन खेडेकर यांच्याकडे वळूया. काही लोकं सचिन खेडेकर यांना मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या मुव्हीपासून ओळखत असतील तर त्यांचे cult फॉलोवर्स त्यांना चिमणी पाखरंपासून ओळखतात. सयाजी शिंदे यांनी साऊथमध्ये जो जम बसवला आहे तोच सचिन खेडेकर यांनीसुद्धा… मराठी, हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, गुजराती या भाषांमध्ये त्यांनी आपल्या Intense Acting ची छाप सोडली आहे. हिंदीमध्ये तर त्यांनी वेगळी छाप सोडलेली आहे. अगदीच श्याम बेनेगल यांच्या नेताजी ‘सुभाषचंद्र बोस – द फॉरगॉटन हिरो’मध्ये स्वतः बोस यांची भूमिका त्यांनी साकारली होती. यानंतर त्यांना साऊथमधूनही विचारणा झाली आणि त्यांनी साऊथसुद्धा गाजवून सोडलं. त्यांनी २००५ साली पहिला साऊथ मुव्ही केला. पोलीस या मल्याळम मुव्हीमधून त्यांनी डेब्यु केलं. यानंतर २००९ साली सचिन खेडेकर यांनी तेलुगू आणि तमिळमध्ये डेब्यु केलं. त्यांचे जनथा गॅरेज, आला वैकुंठूपुरुमलू, सीता रामम, लकी भाष्कर हे चित्रपट बरेच गाजले. त्यांचा साऊथच्या चित्रपटांचा काऊंट पाहायचा झाला तर त्यांनी २४ तेलुगू, ५ तमिळ आणि ३ मल्याळम चित्रपट केले आहेत. 

आता मराठी इंडस्ट्रीतला तिसरा दिग्गज ज्याने साउथमध्ये Fan फॉलोविंग वाढवून ठेवली आहे, तो म्हणजे अतुल कुलकर्णी ! तशी अतुल कुलकर्णीला इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये हे राम आणि चांदनी बारमधून ओळख मिळाली, जेव्हा त्याला दोन्ही मुव्हीसाठी बेस्ट सपोर्टिंग Actor चा National अवार्ड मिळाला. रंग दे बसंतीच्या लक्ष्मण पांडेपासून ते नटरंगच्या गुणा कागलकरपर्यंत आपण किती दमदार Actor आहोत, हे अतुल कुलकर्णीने दाखवून दिलं. विशेष म्हणजे अतुलने साउथमधूनच आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला होता. त्याची पहिली फिल्म भूमी गीता कन्नड होती. यानंतर तमिळ, तेलुगु, मल्याळममध्ये तो झळकला. त्याने आतापर्यंत १३ मल्याळम, ११ तेलुगु, ११ तमिळ आणि ८ कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. २०१२ साली आलेल्या एडेगरिके या मुव्हीसाठी त्याला साउथच्या फिल्मफेअर अवार्ड्समध्ये बेस्ट सपोर्टिंग ACTOR चा अवार्ड मिळाला होता. या तीन मराठी कलाकारांव्यातिरिक्त महेश मांजरेकर, शरद केळकर, राधिका आपटे, श्रुती मराठे यांनी साउथमध्ये बरच काम केलं आहे. पण जो आदर सयाजी शिंदे, सचिन खेडेकर आणि अतुल कुलकर्णी यांनी कमावला. तो इतर कोणत्याही मराठी कलाकाराला कमावता आला नाही. 

हे देखील वाचा 

Marathi Cinema : ११० मराठी चित्रपटांनी फक्त ९९ कोटी कमावले…

सांगण्याचं तात्पर्य एवढंच की एखाद्या लीडिंग इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्हाला चित्रपट मिळतात, ओळख मिळते, तेव्हा त्याचा बाऊ करता कामा नये. नाहीतर आपण जे कमावलय, ते क्षणात गमावून बसतो. या तीन दिग्गजांचं साउथमध्ये इतक्यासाठीच वजन आहे, कारण त्यांनी आपल्या दमदार Acting च्या जोरावर नाव कमावलं आहे आणि त्याचा त्यांनी कधीच गाजावाजा केला नाही. आजच्या मराठी कलाकारांना फक्त याची जाणीव असायला हवी. 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.