२०२५ हे वर्ष तसं मराठी इंडस्ट्रीसाठी फार खास राहिलं नाही. काही आयकॉनिक सिनेमे आले, जसे आता थांबायचं नाय, दशावतार, साबर बोंडं, गोंधळ, उत्तर आणि बरेच… पण बाकीचे नेहमीप्रमाणे आपटले. म्हणजे २०२५ या वर्षात ११० मराठी चित्रपट आले होते. पण या सर्वांची मिळून कमाई फक्त आणि फक्त ९९ कोटी ४६ लाख रुपये इतकीच झाली. त्यातसुद्धा फक्त दहा चित्रपटांनी म्हणजे ९ टक्के चित्रपटांनी जवळपास ७५ टक्के म्हणजे ७४.४६ कोटी रुपये कमाईचा वाटा उचलला. हिंदी आणि साउथच्या चित्रपटसृष्टीशी कमाईच्या बाबतीत आपली तुलना होऊ शकत नाही. पण रिजनल सिनेमाच्या तुलनेत फक्त महाराष्ट्रात तरी मराठी सिनेमाने चांगली कमाई करणं अपेक्षित होतं, जे होत नाही. दुसरीकडे पुष्पा-२ सारखा सिनेमा एकट्या मुंबई सर्किटमध्ये हो एकट्या मुंबई सर्किटमध्ये तब्बल २०० कोटींची कमाई करू शकतो, पण ११० मराठी चित्रपट मिळून अख्ख्या महाराष्ट्रात १०० कोटींचा आकडा सुद्धा पार करून शकत नाहीत. महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रमुख भारतीय भाषांच्या तुलनेत हे ९९ कोटी सर्वात कमी बॉक्स ऑफिस कलेक्शन ठरलं आहे. आज साउथच् सिनेमाच्या मग तमिळ तेलुगु, कन्नड, मल्याळम कोणताही घ्या… त्यांच्याएका चित्रपटाची कमाई जितकी असते, तितकी रक्कम अक्ख्या मराठी सिनेसृष्टीला संपूर्ण वर्षभरात मिळते, ही वस्तुस्थिती फार भयानक आहे.

आता म्हणायचं झालं तर मुंबई ही भारतातली सर्वात मोठी फिल्मसिटी आहे. सगळ्याच इंडस्ट्रीची लोकं आपला चित्रपट मुंबईत चालावा, यालाही प्राधान्य देतात. त्यातच मुंबई हे बॉलीवूडचं घरच आहे. त्यामुळे ही गोष्ट मराठी इंडस्ट्रीला मागे खेचायला कारणीभूत ठरतेच… पण यासोबतच आणखी काही कारणं ज्यामुळे मराठी चित्रपटांना आपल्याच घरात कमाई करायला स्ट्रगल करावं लागत आहे. त्यात एक म्हणजे महाराष्ट्रातलाच मराठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात हिंदी सिनेमाकडे वळलेला आहे. एकंदरीत मराठीमध्ये कंटेंट ड्रिव्हन चित्रपटांची परंपरा आहे. दुसरीकडे ऐतिहासिक, लव्हस्टोरी, कॉमेडी सामाजिक विषय… असा मराठी सिनेमाचा कल आहे. मराठीने action, सस्पेंस थ्रिलर यामध्ये कधीही हात घातला नाही. हेसुद्धा कारण असू शकतं की मराठी प्रेक्षकाची चव बदलली आहे. त्यांनाही action, सस्पेंस थ्रिलर, मोठमोठे सेट्स… मराठीत बघायचं असावं, पण ते मिळत नसल्याने मराठी प्रेक्षक साउथ आणि हिंदीकडे वळत असावा. दुसरी गोष्ट म्हणजे मराठी सिनेमांचं प्रमोशन मर्यादित, बजेट कमी आणि थिएटरमध्ये शो मिळण्याची लढाई आता आणखी कठीण होत चालली आहे. त्यामुळे मराठी सिनेमाने आतातरी आपला झोन बदलायला हवा. उदाहरण म्हणून सांगतो. गेल्या वर्षी मल्याळममध्ये दोन चित्रपट आले होते, एक थूडारम आणि एक लोका… थूडारमचं बजेट २८ कोटी आणि लोकाचं बजेट ३० कोटी… या दोन्ही चित्रपटांचा कंटेंट, execution तुम्ही बघा. तुम्हाला प्रचंड आवडेल. याच थूडारमने कमावले २३५ कोटी आणि लोकाने कमावले ३०४ कोटी… आणि हो… यांनी ८० टक्के कलेक्शन एकट्या केरळमधून काढलं आहे.
हे देखील वाचा
मराठी चित्रपटसृष्टीत बनलेला ‘हा’ सर्वोत्तम राजकीय सिनेमा.
मराठी सिनेमात आणखी एक घोडचूक होते, ती म्हणजे विनाकारणचे Clash ! म्हणजे डोक्यावर हिंदी आणि साउथचं भूत असताना मराठी फिल्ममेकर्स चांगले चित्रपट आणूनही clash करतात आणि त्याचं नुकसान दोन्ही फिल्ममेकर्ससोबत मराठी सृष्टीलाही भोगावं लागतं. उदाहरण द्यायचं झालं तर ७ फेब्रुवारीला… स ला ते स ला ना ते आणि एक राधा एक मीराने clash केलं होतं आणि त्याच दिवशी बॉलीवूडचे ४ चित्रपट रिलीज झाले होते. त्यानंतर २५ एप्रिलला झापुक झुपुक आणि देवमाणूस यांचं clash… त्या दिवशीसुद्धा ४ बॉलीवूडचे चित्रपट रिलीज झाले होते. नंतर १ मे ला महत्वाच्या दोन मराठी चित्रपटांनी clash केलं… ते म्हणजे आता थांबायचं नाय आणि गुलकंद… दोघांचा कंटेंट चांगला असूनही कलेक्शन १० कोटींच्या वरती गेलं नाही. १२ सप्टेंबर हा दिवससुद्धा मराठीच्या इतिहासातला clash डे ठरला… म्हणजे दशावतार, आरपार, बिन लग्नाची गोष्ट… तिन्ही मोठे चित्रपट… त्यात दिवशी बॉलीवूडचे ५ चित्रपट रिलीज झाले होते. पण दशावतारने त्यात survive केलं… नुसतच survive नाही, तर बॉक्स ऑफिसवर २८ कोटींची कमाईसुद्धा केली. बघा सात दिवस उलटले नाहीत की पुन्हा १९ सप्टेंबरला चार मराठी चित्रपट एकाच दिवशी आले… म्हणजे आधी दशावतार, आरपार, बिन लग्नाची गोष्ट थीएटरमध्ये सुरूच होते. त्याला जोड मिळाली आतली बातमी फुटली, कुर्ला टू वेंगुर्ला, अरण्य आणि साबर बोंडची… म्हणजे सात मराठी सिनेमे एकाच दिवशी झांगडगुत्ता घालून होते. पण इतक्या गोष्टी डोळ्यांसमोर असतानाही clash चं भूत मराठी चित्रपटसृष्टीच्या डोळ्यावरून अजूनही उतरलं नाही. येत्या १९ फेब्रुवारी २०२६ रोजी वीर मुरारबाजी आणि रणपती शिवराय स्वारी आग्रा हे दोन ऐतिहासिकपट clash करणार आहेत. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीने आधी स्वत:सोबत सुरु असलेली लढाई मिटवून नंतर हिंदी आणि साउथ वाल्यांशी लढा द्यायला हवा.

त्यातच मराठी चित्रपटसृष्टीत ग्रुपिज्म मोठ्या प्रमाणात पहायला मिळतं. म्हणजे ठराविक कलाकार फक्त ठराविक फिल्ममेकरसोबतच तुम्हाला काम करताना दिसतात. त्यामुळे मराठीत अंतर्गत clash सुद्धा आहेत, हे कळतं. त्यामुळे निर्मात्यांसाठी निश्चितच या सर्व गोष्टी आर्थिक नुकसानीच्याच आहेत. आणि निम्म्या निर्मात्यांना त्यांनी लावलेला पैसा मिळतच नाही. त्यातच मराठीत सुपरस्टार हा कल्चरच नाहीये. म्हणजे एकही कलाकार इथे सुपरस्टार हा tag मिळवू शकलेला नाही. एक एरा लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांनी गाजवला होता. पण आता मार्केटमध्ये हवा करेल असा एकही कलाकार आपल्याकडे नाही, हे दुर्दैव ! आता २०२६ कडून फार आशा आहेत, कारण या वर्षात दोन महत्त्वाचे आणि मोठे सिनेमे रिलीज होणार आहेत. ते म्हणजे राजा शिवाजी आणि खाशाबा ! त्यामुळे आतातरी मराठी इंडस्ट्री तग धरेल का ? हे महत्त्वाचं ठरेल. मराठी चित्रपटसृष्टीच्या एकंदरीत परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.
