आपण बरेचदा विश्व कप फुटबॉलचे सामने अगदी रात्रीचा दिवस करून उत्सुकतेने बघतो. यात आपल्याला बघायला मिळते की मैदानावरील खेळाडू जीवाची बाजी लावून खेळतातच पण अजून एक घटक मैदानाच्या बाहेर बसून तो सामना त्याच्या कल्पनाविश्वात खेळत असतो आणि मैदानावरील डावपेच आखत असतो. हा घटक म्हणजे संघाचा प्रशिक्षक. सामना चालू असताना तो खेळाडूंना झापतो, आरडाओरडा करतो व कुठल्याही खेळाडूला केव्हाही मैदानातून काढून घेतो आणि बदली खेळाडूला (रिप्लेसमेन्ट) सामन्यात उतरवतो. सामन्याच्या निकालाला सर्वस्वी प्रशिक्षकाला जबाबदार धरले जाते. सामना जिंकला तर त्याचा उदोउदो होतो पण सामना हरल्यास त्याला त्या देशाच्या नागरिकांकडून शिव्यांची लाखोली वाहिली जाते. जर त्याच्या संघाला स्पर्धेतून बाद व्हावे लागले तर तो तिथल्या तिथे प्रशिक्षकपदाचा राजीनामा देतो. संघाचा कर्णधार मात्र कायम राहतो. सध्या महाराष्ट्रात होत असलेल्या महापालिकांच्या निवडणुकीत काहीशी फुटबॉलसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रथमदर्शनी हा सामना महायुती विरुद्ध विरोधी पक्ष असा भासतो. पण प्रत्यक्षात हा सामना होत आहे मुख्यमंत्री फडणवीस विरुद्ध मराठी माध्यमे यांच्यात. फडणवीस हे जर भाजपचे प्रशिक्षक असतील तर विरोधी पक्षांचे प्रशिक्षकपद स्वीकारले आहे मराठी मीडियाने. हे दोघेही प्रत्यक्ष सामन्यातील खेळाडू नाहीत पण अंतिम जय -पराजयासाठी या दोघांना जबाबदार ठरवण्यात येईल.

विरोधी पक्ष नेतृत्वहीन अवस्थेत आहेत हे या माध्यमकर्मीना अत्यंत अस्वस्थ करत आहे. त्यामुळे त्यांनी विरोधकांच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी आपण होऊन स्वीकारली आहे. त्यांनी दोन ठाकरे बंधूची वीस वर्षानंतर झालेली युती या विषयाला प्रचंड हवा देऊन जणू हे दोघे जग जिंकायला उतरले आहेत आणि मुंबई महापालिका तेच जिंकणार अशी वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे.या बंधूद्वयाला त्यासाठी घोड्यावर बसवले आहे.जणू हे संताजी -धनाजी आहेत आणि भाजपचे चौखूर उधळलेल्या घोड्याना पाण्यात सुद्धा हे ‘घरबसे ‘ योद्धे दिसतात त्यामुळे ही घोडी पाणी पीत नाहीत असा सोयीस्कर समज करून देण्याचा आटापिटा चालू आहे. खेळाच्या भाषेत याला ‘माईंडगेम ‘ म्हणतात. विरुद्ध बाजूला फडणवीसांनी आपल्या ‘सोंगट्या ‘ हुशारीने उतरवल्या आहेत. आपल्याच युतीतील सहकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण लढती पेरल्या आहेत. त्यामुळे बळेबळे घोड्यावर बसवलेले ‘भाऊ ‘ आणि अन्य विरोधक यांच्यात भाजपविरोधी मते विभागली जातीलच त्याशिवाय विरोधी मतांचा मोठा ‘चंक ‘ आपल्याच मित्र पक्षांकडे जाईल याची खबरदारी घेतली आहे. थोडक्यात ‘छापा ‘ पडला किंवा ‘काटा ‘ पडला तरी जिंकणार फडणवीस म्हणजेच पर्यायाने महायुती.
हे देखील वाचा :
महापौर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री: देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास
मराठी माध्यमे मात्र ‘ठाकरे ब्रँड ‘ जिंकावा म्हणून देव पाण्यात घालून बसले आहेत. त्यासाठी विविध खोटे नाटे प्रायोजित ”सर्वेक्षणे ‘ प्रसिद्ध करून मुंबई महापालिका ‘ठाकरे बंधू ‘ जिंकणार असा भ्रम निर्माण करण्यात गुंग आहेत. त्यांना हे कळत नाही की भाजपच्या चतुर प्रशिक्षकाने ठाकरे बंधूची बचावफळी आधीच भेदली आहे. यामुळेच दोन्ही भावांचे अनेक शिलेदार ‘जय महाराष्ट्र ‘ करत महायुतीला सामील होत आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूचा ‘गोलपोस्ट’ आधीच उघडा पडला आहे कारण गोल रक्षकच अस्तित्वात नाही. यात माध्यमानी’कॉग्रेसला’ अनमार्कड ‘ ठेवले आहे. या रिकाम्या गोलावर हल्ले चढवण्यासाठी काँग्रेस संधीची वाटच पहात आहे. इकडे माध्यमानी आपली सर्व शक्ती भाजपला रोखण्यासाठी पणाला लावली आहे. दोघ भाऊ आपल्यामागे ‘संघ ‘ नसला तरी मीडिया रुपी प्रशिक्षकांच्या मदतीने आपण भाजपवर ‘गोल’ चढवू अशा पोकळ विश्वासाने लढत आहेत. वरील वस्तुस्थितीचा विचार करता सामन्याचा ‘निकाल’ काय लागेल हे सूर्य प्रकाशा इतके स्वच्छ आहे. पण सामन्याच्या निकालाची जबाबदारी मराठी माध्यमे घेणार नाहीत त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
हे देखील वाचा :
Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र, भाजपा-शिंदेसेनेसाठी धोक्याची घंटा ?
तसेही माध्यमापुढे योगेंद्र यादवचा आदर्श आहेच. त्याने तर कबुलीच देऊन टाकली की २०२०-२१चे शेतकरी आंदोलन हे अखिलेश यादव साठी उत्तर प्रदेश मध्ये ‘पीच ‘तयार करण्यासाठी केले होते. अखिलेश त्यावर नीट खेळू शकला नाही म्हणून योगेंद्र यादवने आपली जबाबदारी शिताफीने झटकून टाकली.मराठी माध्यमे सुद्धा पराभवासाठी मारून मुटकून ‘सेंटर फॉरवर्ड’ बनवलेल्या दोघां भावांना जबाबदार धरून मोकळी होतील.पण देवेंद्रजींशी आपणच फाईट दिल्याचा ‘नैतिक विजय’ मात्र ते जरूर साजरा करतील. त्यावेळी प्रत्यक्ष लढलेले दोन भाऊ मात्र ‘तेलही गेले, तुपही गेले’ म्हणून हात चोळत बसतील.
लेखक – रघुनंदन भागवत
