रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये गेल्या चार वर्षापासून जास्त काळ सुरु असलेल्या युद्धाला संपवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकारानं चर्चा सुरु आहे. यासाठी ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यामध्ये बैठकही झाली. यातून काही सकारात्मक निर्णय येईल, अशी आशा करत असतानाच एक धक्कादायक बातमी आली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमी पुतिन यांच्या निवासस्थानावर एक मोठा ड्रोन हल्ला करण्यात आला. पुतिन यांच्या नोव्हगोरोड येथील निवासस्थानावर ९१ ड्रोनने झालेला हा हल्ला हवाई संरक्षणाने हाणून पाडला. पण या हल्ल्याची बातमी आल्यावर या दोन देशातील शांततेच्या वाटाघाटींना मोठा धक्का बसला आहे. यानंतर लेगच रशियानं प्रत्युत्तर आणि वाटाघाटीच्या धोरणावर पुनर्विचार करण्यात येत असल्याचे सांगितले तर युक्रेनने हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. शिवाय रशियाचं कीववर हल्ला करण्यासाठी काहीतरी कारण शोधत असल्याची ओरड केली आहे. या सर्वात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा
‘तुम्ही राक्षसाला जन्म दिलांय’ पुतीन यांच्या आईवडिलांना पत्र
रशिया-युक्रेन यांच्यामधील युद्धाच्या ज्वाळा कमी होण्याची शक्यताही मावळली आहे. कारण रशिया आणि युक्रेनमधील शांतता वार्ता सुरु असतानाच रशिया-युक्रेन युद्ध येत्या नव्या वर्षात अधिक घातक होणार असल्याची शंका आहे. त्याला कारण ठरले आहे ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर घरावर झालेला रात्रीचा ड्रोन हल्ला. व्लादिमीर पुतिन यांच्या नोव्हगोरोड येथील निवासस्थानावर तब्बल ९१ ड्रोनने हल्ला करण्यात आला. यावेळी पुतिन येथे विश्राम करत होते. त्यामुळे हा हल्ला पुतिन यांना मारण्यासाठीच झाला, असा आरोप रशियाकडून करण्यात येत आहे. युक्रेनने शांतता चर्चेदरम्यान हा हल्ला केल्यानं रशियामध्ये अधिक संताप व्यक्त होत आहे. व्लादिमीर पुतिन यांनी हा हल्ला झाल्यावर थेट अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर फोनवरुन बोलणे केले. यात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की या हल्ल्यासाठी सर्वस्वी जबाबदार असल्याचे सांगितले. शिवाय रशिया या हल्ल्यामुळे प्रतिहल्ला करण्यास सज्ज असल्याचेही सांगितले. या मुळे शांतताचर्चेसाठी पुढाकार घेणा-या डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे.

यासंदर्भात रशियाकडून आलेल्या माहितीनुसार शांततेची बोलणी चालू असतांना पुतिन यांना ठार कऱण्याचा प्रयत्न युक्रेनकडून कऱण्यात आला. युक्रेनला थेट पुतिन यांना संपवून युद्ध जिंकायचे होते. आता हा कट अयसस्वी झाल्यामुळे झेलेन्स्की कीववर हल्ला होणार असल्याची ओरड करत आहेत. झेलेन्स्कीचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पुतिनवरील या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील शांततेच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगभरातील अन्य राजकीय नेत्यांनी हे वेडेपणाचे पाऊल असल्याचे सांगितले आहे. ट्रम्प यांनी तर झेलेन्स्कीला टॉमहॉक क्षेपणास्त्रे दिली नाहीत, यासाठी मी देवाचे आभार मानतो, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यासर्वांतून स्पष्ट झाले आहे की, पुढच्या काही दिवसात रशियानं युक्रेनवर मोठा हल्ला केल्यास हे सर्व देश रशियाच्या बाजुने रहणार आहेत.
हे देखील वाचा
रशियावर युक्रेनची आणि व्हॅक्यूम बॉम्बची एन्ट्री
पुतिन यांच्या घरावर ड्रोन हल्ला झाला, ती वेळही खास होती. त्याचवेळी युद्ध संपवण्याबाबत फ्लोरिडामध्ये झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात तीन तासांची बैठक झाली. ट्रम्प यांनी मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये झेलेन्स्कीसाठी दुपारचे जेवण आयोजित केले. यानंतरच पुतिन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला केल्याची बातमी आल्यानं याबाबत अनेक शंकाही उपस्थित झाल्या आहेत. पुतिन यांच्या ज्या घरावर हा हल्ला करण्यात आला तिथे पुतिन यांची प्रेयसी अलिना काबाएवा आणि त्यांची मुले राहतात. या घराभोवती १२ पँटसिर-एस१ क्षेपणास्त्र प्रणाली तैनात आहे. ही प्रणाली जमिनीवरून हवेत हल्ला करण्यास सक्षम आहे. यासोबत वलदाई निवासस्थानाभोवती अनेक हवाई संरक्षण यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. हा हल्ला झाला हे उपग्रह प्रतिमांमध्येही दाखवण्यात आले आहे. यात उझिन नावाच्या संकुलाला वेढलेले किमान १२ ड्रोन दाखवले आहेत. घरावर एकसाथ ड्रोन दिसल्यावर मोठी खळबळ उडाली होती. आता या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून रशिया काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
