इराण हा देश कट्टरतावादी देश म्हणून ओळखला जातो. पण आता तिथेच अती तिथे माती, असं वातावरण झालं आहे. इराणमध्ये सत्ताधारी कोणीही असलं तरी शासन चालतं ते, सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचेच. पण आता याच खामेनींच्या कट्टरतावादाला मोठ्याप्रमाणात विरोध सुरु झाला आहे. कारण इराणच्या रस्त्यावर गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात सामिल झालेले नागरिक मुल्लांपासून इराणला वाचवा, आम्हाला तुमची हुकूमशाही नको, अशा आशयाच्या घोषणा देत आहे. गेल्या तीन वर्षातील ही सर्वात मोठी निरदर्शने असल्याची माहिती आहे. इराणच्या नागरिकांमध्ये तेथील शासकांविरोधात वातावरण वाढत आहे. कारण या नागरिकांचे जीवन सध्या घसरती अर्थव्यवस्था आणि वाढती महागाई यामुळे बेजार झाले आहे. पण ही अर्थव्यवस्था सुधारण्यापेक्षा कट्टरतावादी विचारसरणीला येथे खतपाणी घालण्यात येत आहे. त्यामुळे इराणच्या तरुणवर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे, त्याचेच परिवर्तन या आंदोलनात झाले आहे. तेहरान, मशहाद आणि इतर शहरांमध्ये सुरु झालेल्या आंदोलनाचे लोण आता अन्य शहरातही पोहचले आहे. २०२२-२३ मध्ये महसा अमिनीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये असा मोठा उठाव झाला होता. तेव्हा हादरलेल्या खामेनी यांनी हा उठाव चिरडून टाकला, पण आता खामेनींची इराणवरील पकड कमजोर होत असून या आंदोलनात सामिल असलेल्या तरुणांची संख्या पाहता, आंदोलन चिरडले तर हा युवा वर्ग अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. ( Iran Protests )

Iran Protests
इराणमध्ये बुरखा विरोधात आंदोलन छेडणारी महसा अमिनी हिच्या मृत्यूनंतर इराणमध्ये तीव वर्षापूर्वी मोठं आंदोलन छेडलं गेलं. हे आंदोलन खामेनी यांनी ताकदिशी चिरडले. यात अनेक तरुणींना तरुंगात डांबण्यात आले, तर काहींचे मृत्यूही झाले. पण या आंदोलनानंतर आता पुन्हा संपूर्ण इराणमध्ये अशाच प्रकारचे आंदोलन पेटले आहे. गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या या आंदोलनात इऱाणमधील मुल्ला-मौलवींविरोधात संपात व्यक्त करण्यात येत आहे. हुकुमशहा आणि मौलवींनी इराणला देशोधडीला नेले असल्याच्या घोषणा हे आंदोलक देत आहेत. इराणमधील या आंदोलनात तरुणांचा अधिक भरणा असल्यामुळे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना हे थेट आव्हान असल्याचे मानण्यात येत आहे. ८६ वर्षीय खामेनी त्यांच्या सर्वात कठीण संघर्षाला तोंड देत असल्याचीही चर्चा आहे. ( Iran Protests )
खामेनी यांनी ज्या कट्टरतावादाला पोसले, तोच कट्टरतावाद या परिस्थितीला कारणीभूत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. सध्या इराणची अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत आहे. येथील तरुणांना नोक-या मिळत नाहीत. इराणी चलनाची विक्रमी घसरण झाली आहे. या सर्वात इराणच्या सेंट्रल बँकेच्या प्रमुखांनी राजीनामा दिला आहे. खमेनी यांच्या हुकुमशाहीमुळेच ही देशाची अवस्था झाली असून पुन्हा इराणमध्ये राजेशाही प्रस्थापित करावी अशी मागणी आंदोलक करीत आहेत. हे आंदोलनाचे लोण सेंट्रल बँकेचे प्रमुख मोहम्मद रेझा फरझिन यांच्या राजीनाम्यापासूनच सुरु झाले. मोहम्मद फरझिन यंनी राजीनामा दिल्याची माहिती मिळताच, राजधानी तेहरानमधील व्यापा-यांनी निदर्शने सुरू केली. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीमध्ये या भागातीलच व्यापा-यांनी मोठी भूमिका बजावली आहे. त्यानंतर इस्फहान, शिराझ आणि मशहद सारख्या प्रमुख शहरात निदर्शने सुरु झाली. बघता बघता अनेक लहान शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. अयातुल्ला अली खामेनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या भ्रष्ट्राचारालाही जनता वैतागली आहे, त्यामुळे अनेक व्यापारी या आंदोलनात सहभागी होत आहे. इराणमध्ये महागाई ४२% पेक्षा जास्त आहे. अन्न, औषध आणि इतर गरजा जीवनावश्यक वस्तू सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर असतांनाच सरकारमधील अधिकारी मात्र ऐशोआरामात जीवन जगत आहेत. त्यामुळे येथील जनतेमध्ये वाढत असलेला संपात आता आंदोलनाच्या रुपात व्यक्त होत आहे. ( Iran Protests )
=======
हे देखील वाचा : Asim Munir : सख्या पुतण्याला केलं जावई… मुनीरचा असाही प्रताप
=======
या सर्वात इराणमधील मौलवींच्या अतिरेकी कट्टरतावादाला तरुणवर्ग मोठ्याप्रमाणात वैतागला आहे. इराणी तरुण आता उघडपणे इस्लामिक नियमांचे उल्लंघन करत आहेत. डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात येथील किश बेटावर झालेल्या मॅरेथॉनमध्ये शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. हिजाबशिवाय आलेल्या या महिलांनी केस मोकळे ठेऊन मॅरेथॉनमध्ये धाव ठोकली. इराणध्ये हिजाबशिवाय वावरणा-या महिलांना सार्वजनिक जागी फटके मारण्यात येतात, पण याकडे दुर्लक्ष करुन धावणा-या या महिलांना पाहून येथील पोलीस यंत्रणाही मागे हटली होती. या सर्वांसोबत इराणमध्ये मुलभूत सुविधांकडे होत असलेले अयातुल्ला अली खामेनींचे दुर्लक्ष हे सर्वात मोठे असंतोषाचे कारण ठरले आहे. इराणच्या अनेक शहरांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून रहावे लागत आहे. योसाबत सुशिक्षीत अशा तरुणांना इराणमध्ये नोक-या नाहीत आणि अन्य देशात जाणा-या इराणी तरुणांकडे संशयानं बघण्यात येत आहे. या सर्वाला येथील कट्टरतावादाला खतपाणी घालणारे मौलवी असल्याचे मत तरुणांचे होत आहे. त्यामुळेच आता अयातुल्ला अली खामेनी यांच्या विरोधात इराणमध्ये गेल्या चार दिवसांपासून आंदोलन पेटले आहे. या आंदोलकांचा जोर पाहता पुढच्या काही दिवसात त्याची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. इऱाणची ही तरुण पिढी देशातील कट्टरतावादी सरकार बदलणार का, हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. ( Iran Protests )
सई बने
