Iran मध्ये १९८९ पासून, अयातुल्लाह अली खामेनी यांची सत्ता आहे. इराणचे सर्वोच्च नेते म्हणून असलेले खामेनी हे देशाचे सर्वोच्च धार्मिक नेतेही आहेत. अयातुल्लाह खामेनी यांच्या अधिकारकाळात इराण अधिक कट्टरतावादाकडे ओढला गेल्याची टीका होते. या कट्टरतावादाचा सर्वात मोठा फटका या देशातील महिलांना बसला आहे. इराणमधील महिलांना १९६० आणि १९७० च्या दशकात अधिक स्वातंत्र्य होते, अधिकार होते. मात्र १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर येथील महिलांचे जीवन पूर्णपणे बदलले. सक्तीचा हिजाब आणि धार्मिक कायद्यांमुळे महिलांच्या स्वातंत्र्यावर लक्षणीय मर्यादा आल्या. १९९० च्या दशकापासून इराणमध्ये महिला चळवळ पुन्हा सक्रिय झाली पण खामेनी यांच्या कडक कायद्यापुढे ही चळवळ कायमच दडपून टाकण्यात आली. इराणमध्ये हिजाब विरोधात सर्वात मोठा लढा २०२२ मध्ये उभारण्यात आला. महसा अमिनी या तरुणीच्या मृत्यूनंतर इराणमधील या लढ्याला जगभरातील महिलांना पाठिंबा दिला.

मात्र हा लढाही खामेनी यांनी दडपून टाकला. पण इराणमधील महिला पुन्हा आपल्या हक्कांसाठी एकवटत आहेत. आता या महिलांनी कुठल्याही हिंसक आंदोलनाऐवजी महात्मा गांधी यांच्या शांतीच्या तत्वांचा अवलंब आपल्या या हक्कांच्या आंदोलनासाठी कऱण्यास सुरुवात केली आहे. कारण इराणच्या रस्त्यावर पुन्हा हजारोंच्या संख्येनं महिला आपल्या स्वातंत्र्यांच्या मागणीसाठी येऊ लागल्या आहेत. पण या महिला कुठलिही घोषणाबाजी किंवा हिंसाचार न करता हिजाब कायद्याला उघडपणे आव्हान देत आहेत. त्यात महसा अमिनी यांच्या मृत्युनंतर खामेनी प्रशासनानंही धडा घेतला आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक चिघळू नये म्हणून हा महिलांचा शांततापूर्ण लढा आक्रमक होणार नाही, अशी काळजी घेतली जात आहे.
हे देखील वाचा :
Iran : इराणमध्ये सर्वसामान्य महिलांना हिजाबसक्ती !
इराणच्या रस्त्यांवर पुन्हा मोठ्या संख्येनं महिला येत असून त्या आपल्या स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. मात्र हा लढा आत्तापर्यंत झालेल्या सर्व लढ्यांपेक्षा वेगळा आहे. कारण कोणत्याही घोषणाबाजीशिवाय, शस्त्रांशिवाय इराणच्या महिलांनी लढा सुरु केला आहे. त्यामुळेच महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा लढा सुरु असल्याचे बोलले जात आहे. आपल्या स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या या इराणी महिला आता उघडपणे त्यांचे स्कार्फ काढून कठोर हिजाब कायदे आणि धार्मिक निर्बंधांविरुद्ध शांतपणे आंदोलन करत आहेत. इराणमध्ये खामेनी यांचे शासन आहे. त्यांनी महिलांसाठी अनेक कडक कायदे लागू केले आहेत. त्यात सक्तीचा हिजाबही आहे. मात्र इराणच्या महिलांचा या सक्तीला विरोध आहे. १९७० च्या दशकात महिला मुक्तपणे इराणच्या रस्त्यावर वावरु शकत होत्या मात्र आत्ताच्या महिलांना हिजाबशिवाय घराच्या बाहेर पडले तर मारहाण होत आहे.

हे सर्व सरकारी नियम महिलांच्या शोषणासाठी असल्याचा आरोप इराणच्या महिलांचा आहे. त्याविरोधात अनेक आंदोलने झाली आहेत, आणि ती दडपून टाकण्यात आली आहेत. मात्र आता पुन्हा इराणच्या मोठ्या शहरांमधील महिला हिजाब सक्तीचा विरोध कऱण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. तेहरान, शिराझ आणि कुर्दिश प्रदेशात महिला हिजाबशिवाय रस्त्यावर फिरत आहेत. एवढंच नव्हे तर सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडिओही शेअर करीत असून आमचे स्वातंत्र्य आम्हाला हवे आहे, असे फलकही या महिला दाखवत असून हा त्यांचा शांततापूर्ण लढा असल्याचे सांगत आहेत. इराममध्ये २०२४ मध्ये लागू झालेल्या हिजाब आणि नम्रता कायद्यात हिजाब न घातल्याबद्दल मोठा दंड, फटके आणि अगदी दीर्घ तुरुंगवासाची शिक्षा देण्याची तरतूद आहे. २०२२ मध्ये महसा अमिनी या तरुणीच्या मृत्यूनंतर इऱाणमध्ये मोठे आंदोलन झाले होते.
हे देखील वाचा :
Iran-Israel War : इराण – इस्रायल संघर्षाचा भारतावर काय परिणाम ?
इराणमधील पत्रकारांच्या मते, येथील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. या असंतोषाचा उद्रेक कधीही होईल, अशी परिस्थिती आहे. असे झाल्यास या महिला आंदोलनची परिस्थिती हाताबाहेर जाणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यातच आता इराणमध्ये महिलांनी शांततापूर्ण आंदोलन सुरु केले आहे. यात किशोरवयीन मुली पोलिसांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत स्कार्फ काढून टाकत आहेत. काही महिला उघडपणे मोटारसायकल चालवतांनाही दिसत आहेत. या सर्वात इराणमधील तरुणींचा मोठा पुढाकार आहे. अशा तरुणींना अटक केल्यास पुन्हा हिंसाचार होईल, अशी भीती पोलीसांना आहे, त्यामुळे इराणचे पोलीस सध्यातरी महिलांच्या या शांततापूर्ण हिजाब विरोधी IRAN PROTEST कडे दुर्लक्ष करीत आहेत.
